बीड जिल्हासामाजिक

अंबाजोगाईत मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय महामेळावा संपन्न

मराठा समाजाने शेतीपुरक उद्योगातून आर्थिक विकास साधावा-माजी आ.अमरसिंह पंडीत

समाजाला नवा दृष्टीकोण व दिशा देण्याचे काम रेशीमगाठीने करावे- अर्जुनराव जाहेर पाटील

अंबाजोगाई : शेती व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्टयाचा होवू लागल्याने शेतकर्‍यांनी शेतीपुरक उद्योगातून आर्थिक विकास साधावा.शेती सोबतच व्यवसाय करणार्‍या मराठा समाजातील कर्तबगार मुलांचे विवाह होण्यासाठी वधु-वर परिचय मेळावे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी आ.अमरसिंह पंडीत यांनी केले.तर मराठा समाजात आजही अनेक अंधश्रद्धा जोपासल्या जातात. तेंव्हा अशा अंधश्रद्धा व कर्मकांड यांना तिलांजली देवून विज्ञानवादी बना, नौकरीची अपेक्षा न करता स्वतःचा उद्योग व्यवसाय करा, लग्नावरील खर्च कमी करा,विवाह सोहळा साधेपणाने करा,कष्ट व मेहनत करा,मराठा तरूणांनो आळस झटका असे सांगुन मराठा समाजाला नवा दृष्टीकोन व दिशा देण्याचे काम रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्राने करावे अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव जाहेर पाटील यांनी व्यक्त केली.

अंबाजोगाईतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था,संचलित रेशिमगाठी मराठा वधु- वर सुचक केंद्रामार्फत रविवार,दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता साधना मंगल कार्यालय, साखर कारखाना रोड अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी मराठा समाजातील इच्छुक वधू-वर व पालकांचा परिचय महामेळावा आयोजित करण्यात आला होता.या महामेळाव्याचे उदघाटन छत्रपती राजश्री शाहू बँकेचे चेअरमन अर्जुनराव जाहेर पाटील (बीड)यांच्या हस्ते झाले. तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमरसिंह पंडित (गेवराई) हे होते. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून दत्तात्रय (आबा) पाटील(माजी सभापती, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती) तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पृथ्विराज साठे(केज), अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर (केज),बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे (अंबाजोगाई),बीड जिल्हा बँकेचे संचालक ऋषिकेश आडसकर (केज),अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दाजिसाहेब लोमटे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे (केज),नगरसेवक बबनभैय्या लोमटे (गटनेते न.प. अंबाजोगाई),बीड जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे (अंबाजोगाई),पंचायत समितीचे उपसभापती तानाजीराव देशमुख (अंबाजोगाई), दत्तासाहेब जगताप, केज पं.स.चे सभापती संदीप पाटील,केज कृऊबाचे सभापती संभाजीराव इंगळे (केज),महामेळाव्याचे संयोजक भरतराव पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी राजमाता जिजाऊ,छञपती शिवराय व आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमापुजन,अभिवादन व दीपप्रज्ज्वलनाने तसेच गायक सुभाष शेप,आसाराम जोशी, मंजुषा देशपांडे व महादेव माने यांनी गायिलेल्या जिजाऊ वंदना,स्वागतपर महाराष्ट्र गिताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.त्यानंतर रेशिमगाठी मराठा वधु- वर सुचक केंद्रामार्फत मान्यवरांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना संयोजक भरतराव पतंगे म्हणाले की,छञपती राजर्षी शाहु महाराज सेवाभावी संस्थेच्या रेशीमगाठी मराठा वधु-वर सुचक केंद्रामार्फत होत असलेल्या पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्यास आपण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार मानले.एक वर्षापुर्वी रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्र आम्ही सामाजिक बांधिलकी समोर ठेवून सुरू केले. मराठा समाजाने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले,शुभेच्छा दिल्या व सहकार्याचा हात पुढे केला.त्यांच्या या सहकार्यामुळेच हा उपक्रम आज साजरा होत आहे.

मराठा समाजातील विवाह सोहळे हे अति थाटमाट न करता साधेपणाने, कमी खर्चात साजरे व्हावेत.लग्नावरील खर्च कमी व्हावा अशी लोकभावना आहे. शेतकरी कुटुंबात आपल्या मुली देण्यास मुलींचे पालक तयार नाहीत.खुप शिकुन मोठे झालेले मराठा समाजातील मुले हे शेतीपासुन दुर गेले आहेत.शेती ही नाही आणि नौकरीही नाही अशा परिस्थितीत मराठा समाजातील मुलांच्या विवाहाचे प्रश्न निर्माण झाले आहे.या प्रश्नावर संवादाच्या माध्यमातून उत्तर मिळावे इच्छुक वराला चांगली वधु मिळावी व चांगल्या उपवर वधुला कर्तबगार वर मिळावा मग तो वर शेती करणारा,स्वतःचा व्यवसाय करणारा प्रसंगी नौकरी करणारा असावा.हीच भूमिका व विधायक हेतु ठेवून रेशीमगाठी वधु-वर सुचक केंद्र काम करत आहे.समाजासमोर मराठा वधु-वर महामेळाव्यातून हीच भूमिका ठेवण्याचे काम आपल्या सहकार्याने आम्ही करीत आहोत. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात.त्याबद्दल भरतराव पतंगे यांनी सर्वांचे मनःपुर्वक आभार मानले.यावेळी स्वागताध्यक्ष दत्तात्रय पाटील यावेळी यांनी पुण्या-मुंबईच्या धर्तीवर अंबाजोगाईत वधु-वर परिचय केंद्राच्या माध्यमातून हा महामेळावा होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विवाह जुळविणे ही अवघड बाब असल्याचे सांगुन मराठा समाजात मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. तर मुलांचा खालावला आहे.त्यामुळे लग्न जमवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.दिवसेंदिवस लग्नावर वाढणारा खर्च हा वधु पित्याला कर्जाच्या खाईत लोटणारा आहे.तेंव्हा समाजाने विवाह वरील खर्च कमी करावा असे आवाहन पाटील यांनी केले.या प्रसंगी माजी आ.पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, रमेशराव आडसकर, डॉ.अंजलीताई घाडगे आदींनी स्वागतपर मनोगत व्यक्त करून मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचालन अविनाश भारती,ज्योती शिंदे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार दत्ताञय कदम यांनी मानले.या महामेळाव्यात 375 नियोजित वधु-वर यांचा परिचय,पालकांची ओळख व वधु-वर यांच्या परिचयपञाचे (बायोडाटा) अदान-प्रदान व परिचय झाला. महामेळाव्याच्या आयोजनासाठी विविध समित्या गठन करण्यात आल्या होत्या. राज्यस्तरीय मराठा समाजातील वधू वर व पालक परिचय महामेळाव्यास मराठा समाज बांधव,वधु-वर यांचे पालक,महिला, इच्छुक वधु-वर,विविध क्षेञातील मान्यवर हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यस्तरीय मराठा समाजातील वधू वर व पालक परिचय महामेळाव्याच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा महामेळाव्याचे स्वागताध्यक्ष दत्तात्रय (आबा) पाटील यांचे मार्गदर्शनाखाली रेशिमगाठी मराठा वधू-वर सुचक केंद्राचे भरतराव पतंगे (अध्यक्ष),अरूणराव काळे (उपाध्यक्ष),गणेश पतंगे (सचिव), रघुनाथराव जगताप (सहसचिव),दत्ताञय कदम (कोषाध्यक्ष), सदाशिवराव सोनवणे (सदस्य),रामकिशन बडे (सदस्य),अमित पतंगे तसेच सकळ मराठा समाज बांधव,मराठा सेवा संघ,मराठा महासंघ,संध्या मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला.

1 Comment

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.