सोयगाव वनपरिक्षेत्राची धडक मोहीम ,जंगलातांडा शिवारात शिकारीचे पाच जाळे जप्त ; शिकाऱ्यांचे मनसुबे उधळले

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव वनपरिक्षेत्रातील वनाधिकार्‍यांनी वनातील अवैध कृतींवर प्रतिबंध करण्यासाठी चांगलीच कंबर कसली असून धडक मोहीम हाती घेतली आहे त्याचाच परिणाम म्हणून मागील आठवडाभरात नानेगाव येथे जवळपास ५० हजार रुपयांचा सागवान वनोपज जप्त करण्यात आला त्यानंतर वेताळवाडीच्या घनदाट जंगलात अवैध शिकारीकरता लावण्यात आलेले नऊ जाळे जप्त करण्यात आले. सदर घटना ताजी असतानाच आज दिनांक दि. २७ रोजी परत जंगलातांडा शिवारात शिकारीचे ५ जाळे जप्त करण्यात आले. यावरून वनतस्करावर वनविभागाची करड़ी नजर असून वनविभागाच्या अतिशय दक्ष व तत्पर कारवाईने वनतस्कराचे चांगलेच धाबे दणाणले आहे..

सविस्तर वृत्त असे की, जंगलातांडा येथील राखीव वनातील कक्ष क्र. ४१९ मधे गस्त करीत असताना वनरक्षक बी एच पाटील व वनसेवक सरोदे यांना डोंगराच्या वरच्या दिशेने तीन अज्ञात इसम जाताना दिसून आले. वनाधिकाऱ्यांना पाहतात त्यांनी पळ काढला त्यामुळे वनरक्षक पाटील यांना त्यांच्यावर संशय आला व त्यांनी त्यांचा पाठलाग केला त्यावेळी त्यांनी हातातील पिशवी जमिनीवर टाकली व घटनास्थळावरून पसार झाले. वनाधिकाऱ्यांनी सदर आरोपींचा दूरवर पाठलाग केला परंतु ते हाती लागले नाही. त्यानंतर सदर पिशवीची पाहणी केली असता त्यात शिकारीचे 5 जाळे आढळून आले. वनरक्षक बी एच पाटील यांनी सदर जाळे जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री आर. जी सपकाळ यांना माहिती दिली त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तात्काळ आरोपीच्या शोधासाठी ठीकठिकाणी पथक रवाना केले असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

सोयगाव वनपरिक्षेत्रात लॉकडाऊनच्या काळातही सर्व वनकर्मचारी यांची नियमित गस्त सुरु आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड व शिकारीवर मोठा आळा बसला आहे. वनसंरक्षणाबाबत मा.उपवनसंरक्षक एस पी वडस्कर यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षक श्री डी आर वाकचौरे व वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव वनपरिक्षेत्रात कारवाईचे मोठे सत्रच सुरू आहे. त्यामुळे वनतस्कराना पळता भुई कमी झाली आहे. ऑपरेशन *वॉश ऑऊटमुळे* वन तस्करांना चांगलीच चपराक बसली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी सपकाळ यांनी दिला आहे..

“लॉकडाउनच्या काळातही वनकर्मचाऱ्यांची नियमित पायदळ गस्त सुरू असून वनविभाग वनतस्करावर करड़ी नजर ठेऊन आहे. सदर प्रकरणी रितसर कारवाई करण्यात आली असून आरोपींचा शोध घेणे सुरु आहे..”
―वनरक्षक बी एच पाटील

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.