औरंगाबाद: कोरोनामुक्त लोकचळवळीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा –जिल्हाधिकारी उदय चौधरी

→फेसबुक लाईव्हद्वारे प्रथमच औरंगाबादकरांशी साधला संवाद

औरंगाबादकरांचाही लाईव्हला भरपूर प्रतिसाद

औंरगाबाद, दि.२८:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून शारीरिक अंतर किमान सहा फुटाचे ठेवा. मास्कचा वापर करा. वारंवार हात साबणाने धुवा या त्रिसूत्रीचा वापर कराच, हा संदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज प्रथमच केलेल्या फेसबुक लाईव्हद्वारे औरंगाबादकरांशी संवाद साधताना दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुक्त लोकचळवळीसाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य केले आहे. परंतु अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे खबरदारी घ्यावीच लागेल. खबरदारीसाठी पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरिरातील आक्सिजनची पातळी तपासता येते. सातत्याने तपासल्यास संभाव्य धोका टळू शकतो. मात्र, यामुळे कोरोना होणारच नाही, असे नाही. हा केवळ खबरदारीचा उपाय आहे. याचा वैद्यकीय पातळीवर उपचार घेताना बऱ्याच प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी या ऑक्सिमीटरचा वापर करावा. वापर करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे श्री. चौधरी यांनी दाखवली. पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून आपले आरोग्य आपल्या हाती या प्रमाणे आपणच आपली तपासणी करून शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण, पल्स रेट तपासू शकता असेही श्री. चौधरी म्हणाले.
फेसबुक लाईव्हद्वारे प्रथमच संवाद साधत असलेल्या श्री. चौधरी यांना औरंगाबादकरांनीही थेट प्रश्न विचारले. श्री. चौधरी यांनी ही मनमोकळेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. यामध्ये ग्रामीण भागातील लॉकडाऊन, शहरातील बस सेवा, हॉटेल, उद्योग सेवा आदींबाबत प्रश्न विचारण्यात आली. बाहेरगावाहून आल्यानंतर किती दिवस घरात अलगीकरणात रहावे, असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर श्री. चौधरी यांनी बाहेर गावावरून येणाऱ्या व्यक्तीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार घरातच 14 दिवस अलगीकरणात रहावे, असे सांगितले.
औरंगाबाद शहर वगळता औरंगाबाद ग्रामीण क्षेत्रात उद्योग व्यवसायाला कुठल्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. परंतु जर व्यवसायासाठी संबंधित शहरातून ये-जा करत असतील तर मात्र, अडचण निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा, जि.प. यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत आहे. त्यांच्यावर संनियंत्रण करून या कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही श्री. चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
शेतकरी बांधवांना अडचणी येणार नाहीत, यासाठी यंत्रणा काम करत आहेत. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रे सुरू करावीत, असे निर्देशही त्यांनी लाईव्हद्वारे संबंधितांना दिलेत.
खासगी रुग्णालयातही महात्मा फुले जनआरोग्या योजनेच्या माध्यमातून आता नि:शुल्क उपचार 31 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहेत. परंतु काही रुग्णालये या योजनेंतर्गत नोंदणीकृत नसतील त्याठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच दर आकारणी करणे रुग्णालयास बंधनकारक असेल. याबाबत काही अडचण असल्यास आरोग्य विभागाच्या 104 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. ज्या रुग्णालयाने रुग्णांकडून अतिरिक्त दर आकारणी केली अशा रुग्णालयांकडून राज्य सरकारने रक्कम वसूल करून रुग्णांना परत केली आहे, त्यामुळे अधिकची दर आकारणी होत असेल तर प्रशासनास तत्काळ कळवावे, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच उपचारापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची ग्वाहीही श्री. चौधरी यांनी दिली.
शेतकऱ्यांना बांधावर खत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. औरंगाबाद शहर वगळता ग्रामीण भागात जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच अशा कठीण प्रसंगात सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी केले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.