सोयगाव,दि.१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
गुजरात राज्यात कामासाठी गेलेल्या ११ मजुरांना रविवारी मध्यरात्री सुखरूप गावी न्हावीतांडा येथे परत आणण्यास अखेरीस गावाच्या पोलीस पाटील मुलचंद राठोड यांचा संघर्ष यशस्वी झालेला आहे.या मजुरांना गुजरात शासनाने मोफत सोयगाव तालुक्यातील त्यांच्या गावात मोफत आणून सोडले आहे.या मजुरांची सोमवारी जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात आली असून त्यांना १४ दिवस होमकोरोटाईन करण्यात आले आहे.
सोयगाव तालुक्यातील न्हावीतांडा या गावातील ११ मजूर गुजरातमध्ये पोट भरण्यासाठी गेलेले असतांना कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन मध्ये हे मजूर तब्बल ७२ दिवसांपासून अडकली होती.
गावाचे पोलीस पाटील मुलचंद राठोड यांनी महिनाभरापासून सोयगाव पोलीस आणि तहसील कार्यालयाच्या मध्यस्थीने अखेरीस या मजुरांची गुजरात मधून सुटका करण्यात यशस्वी झाले आहे.तहसीलदार प्रवीण पांडे यांनी याकामात मोलाची कामगिरी बजाविली असून गुजरात प्रशासनाशी तहसीलदार पांडे यांनी स्वतः संपर्क साधून या मजुरांना राज्यात मोफत सोडण्याबाबत पाठपुरावा केला होता अखेरीस रविवारी मध्यरात्री या मजुरांना गुजरात प्रशासनाने सोयगाव तालुक्यातील त्यांच्या मुळगावी न्हावीतांडा येथे मोफत बससेवेतून पोहचविले आहे.सोमवारी या मजुरांची पुन्हा कोविड-१९ ची तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी करून त्यांना १४ दिवस कोरोटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.अखेरीस मुळगावी परतल्यावर अडकलेल्या मजुरांनी सुटकेचा श्वास सोडला होता.