मुंबई दि.२:आठवडा विशेष टीम― दि. ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या.
रेल्वेची वाहतूक ही उद्या असणाऱ्या वाऱ्याचा वेग तसेच त्या अनुषंगाने इतर सूचनांवर अवलंबून असेल. त्याचप्रमाणे कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभ्या केलेल्या रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संभाव्य वादळाने होणाऱ्या नुकसानीची मोजणी तसेच मदत कार्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे नऊ गट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्री.अभंग,निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.