यवतमाळ:आठवडा विशेष टीम― पर्यावरणाचे संरक्षण करावयाचे असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. सध्या शहरात सिमेंटचे जंगल उभे झाले आहे. नागरी भागात जर वनांची उभारणी झाली तर शहरासाठी ते फुफ्फुस म्हणून काम करू शकते. त्यामुळे नागरी / शहरी भागात वनांचा निर्धार करण्याची वेळ आली आहे. या उद्देशाने वनमंत्री संजय राठोड यांनी केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संवाद साधला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून वनमंत्री श्री. राठोड व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य वनसंरक्षक आर.के.वानखडे, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानदास पिंगळे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनअधिकारी गौपाल आदी उपस्थित होते.
यवतमाळ शहरात वन विभागाने उभारलेल्या ‘ऑक्सीजन पार्क’ च्या धर्तीवर जिल्ह्यात इतरही नागरी भागात वनांची निर्मिती काळाची गरज आहे. लोकसहभागातून हे काम शक्य आहे. मानवाच्या शरीरात फुफ्फुसाचे जे कार्य आहे, तेच कार्य शहरात नागरी वनांचे राहू शकते. त्यामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी. राज्यातील ११ वनवृत्तांमध्ये सुसज्ज असे वन्यजीव संरक्षण दल तयार करण्याचे राज्याचे नियोजन आहे. या प्रस्तावास केंद्राने मान्यता द्यावी.
यवतमाळ जिल्हा हा वनांनी नटलेला जिल्हा आहे. वनविभागामार्फत येथे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात स्मृतीवन, सर्वधर्मवने, संस्कृती वृक्षांचे पूजन आदींचा समावेश आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या सर्व उपक्रमांत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले. यावेळी पुणे जिल्ह्यातील वारजे येथे उभारण्यात आलेल्या नागरी वनाबाबत पुण्याचे मुख्य वनसंरक्षक यांनी सादरीकरण केले. सदर कार्यक्रम हा वेबलिंकद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाने तयार केलेल्या होर्डींग्जचे जिल्हाधिकारी कार्यालयात वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.