रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये तातडीची मदत ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

अलिबाग दि.५:आठवडा विशेष टीम― निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

तत्पूर्वी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे मुंबईहून बोटीने मांडवा येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी थळ येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, निसर्ग दिवसेंदिवस आपले रंग दाखवित असताना यंत्रणेनेही आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी उत्तम नियोजन ही काळाची गरज आहे. रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी या संकटाचा निश्चितच उत्तम मुकाबला केला. त्यामुळे कमीत कमी जीवितहानी झाली, त्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन करताना ते पुढे म्हणाले की, पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र नुकसान झालेल्या लोकांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत, व्हिडिओ काढून ठेवावेत. पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे आधी आपले घर आवरुन घ्यावे. नुकसानीचे काढलेले फोटो व व्हिडिओ पंचनामाच्या कार्यवाहीत ग्राह्य धरण्यात येतील. सर्वात आधी घर व परिसराची साफसफाई करून घ्यावी लागणार आहे. जेणेकरून पावसाच्या या दिवसात अस्वच्छतेमुळे परिसरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्वात जास्त नुकसान विजेच्या खाबांचे झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यासाठी शासन स्तरावरून मदत निश्चित केली जाईल. याबरोबरच ज्या नागरिकांचा या वादळामुळे अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासन त्यांच्या अन्नधान्याचा, जेवणाचा प्रश्न निश्चितच सोडविणार. जनतेच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे आहे.

बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरण केले.

यावेळी अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे, वय वर्ष 58 ही व्यक्ती चक्रीवादळामुळे वीजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.