सोयगाव,दि.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन मध्ये अडकलेला विवाह सोहळा अखेरीस तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर गुरुवारी शेतातच मजुरांच्या साक्षीने पार पडून विवाह बंधनात अडकलेल्या नवीन जोडप्यांनी चक्क विवाह होताच शेतातच कपाशी लागवडीचे काम हाती घेतले होते.
सोयगाव तालुक्यात घोसला गावातील अंतर्गत नातेसंबंधातून गावातच एक विवाहयोग जुळला,परंतु कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन मध्ये हा जुळलेला योग अडकला असतांना सलग तीन महिने लॉकडाऊनच्या पूर्णपणे शिथिलतेची या दोन्ही कुटुंबांना प्रतीक्षा होती अखेरीस खरिपाच्या पेरण्यांचा हंगाम डोक्यावर आला तरीही शिथिलता येत नसल्याचे पाहून वर-वधू कडील मंडळींनी बुधवारी मध्यरात्री मृगाचा पावूस पडताच गुरुवारीच शेतात विवाह लावून कपाशी लागवडीचा निर्णय घेतला होता.दोन्ही कुटुंबीय शेतकरी असल्याने या कुटुंबीयांकडे वेळ नव्हता त्यामुळे वर कडील मंडळींनी गुरुवारी कपाशी लागवडीसह विवाह सोहळा आटोपण्याचा निर्णय घेतला होता.घोसला शिवारातील अभिमान पाटील यांचा मुलगा ज्ञानेश्वर उगले आणि शांताराम बावस्कर यांची मुलगी अश्विनी बनास्कर यांचा जुळलेला विवाह योग गुरुवारी अकरा वाजता शेतातच उरकण्यात आला.या विवाह सोहळ्यासाठी शेतातील कपाशी लागवडीसाठी लावण्यात आलेले मजूरच वर्हाडी झाली अन विवाह शेतात लावण्यात आला.परंतु विवाहाच्या बंधनात अडकताच या नवीन जोडप्यांनी मात्र शेतात कपाशी लागवडी चे काम हाती घेवून एक आदर्श निर्माण करून दिला आहे.
शेती कामांचे दिवस ,घाईघाईत उरकला शेतकरी कुटुंबाचा विवाह सोहळा–
खरिपाच्या हन्मागाचे दिवस असतांना,आणि बुधवारी बरसलेल्या मृग पावसाच्या धारांनी शेतकऱ्यांची असलेली घाई पाहून या शेतकरी कुटुंबीयांनी शेतातच विवाह सोहळा उरकवून पेरण्यांचे कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला होता.
घरून आणलेली शिदोरीच ठरली विवाह सोहळ्याची मेजवानी
शेतात कपाशी लागवडीसाठी आलेल्या मजुरांनी दुपारची न्याहारी म्हणून आणलेली फडक्यातील भाकरीच या विवाह सोहळ्यातील शिदोरी ठरली असून राज्यातील या शेतकरी कुटुंबातील हा आदर्श विवाह सोहळा ठरला आहे.
सामाजिक आंतर पाळून संपन्न झाला विवाह-
शेतातील घोसला शिवारात झालेला या विवाह सोहळ्यात मात्र लॉकडाऊनच्या सर्वच नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती.सामाजिक अंतर,सॅनिटायझर आणि मास्क चा वापर करण्यात येवून हा मृगाच्या पावसातील विवाह सोहळा गावासह तालुक्याला आदर्शवत ठरवून गेला असल्याची चर्चा मात्र दिवसभर सुरु होती.