बीड:नानासाहेब डिडुळ―
महाराष्ट्रात विधानपरिषद सन १९५६ ला अस्तित्वात आल्या पासुन आज पर्यंत मातंग समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाने संधी दिली नाही किंवा राज्यपाल नियुक्त सदस्य केला नाही. त्यामुळे मा.राज्यपाल निर्देशित विधानपरिषद सदस्यत्वासाठी मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी सर्व राजकीय पक्षात हालचाली चालू झाल्या असून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात मातंग समाजाला विधानपरिषद सदस्यत्व मिळणार असे मत सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी बोलतांना सांगितले आहे.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की मातंग समाजाला महाराष्ट्र विधान परिषदेत आजपर्यंत संधी दिली गेलेली नाही. ही संधी जगद्विख्यात साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिल्यास त्या पक्षाचा इतिहास सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल यात मात्र तिळमात्र शंका नाही.
महाराष्ट्रातील संबंध मातंग समाज हा अनुसूचित जाती मधील नंबर दोन चा समाज आहे. समाजाचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असल्याने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात विधानपरिषदचे सदस्यत्व मिळाल्यास राजकीय पक्षाबद्दल आपुलकी मिळविण्यासाठी अनेक पक्ष मातंग समाजातील आपलाच प्रतिनिधी व्हावा यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. यासाठी अनेक लेखक,कलावंत,प्राध्यापक, वकिल, पत्रकार आणि बुध्दीजिवी वर्गाच्या संपर्कात राजकीय पक्षाचे नेते असल्याचे दिसत आहेत. असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात सन 1956 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आल्यानंतर अनुसूचित जातीतील मातंग समाज लोकसंख्येने क्रमांक दोन वर असतानाही आजतागायत विधानपरिषदे सारख्या महत्त्वाच्या असलेल्या वरिष्ठ सभागृहात मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुध्द उठाव केल्यामुळे मातंग समाजाला इंग्रजांनी गुन्हेगार जमात म्हणून घोषित केले. त्यामुळे हा समाज विकासा पासून कोसो दूर गेला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा मातंग समाजातील महापुरुष साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढ्यात अतिशय मोलाचे योगदान दिले. या समाजात आजपर्यंत अनेक साहित्यिक, कलावंत, खेळाडू तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात असंख्य नामवंत लोक होऊन गेले परंतु राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांमध्ये सुद्धा मातंग समाजातील या प्रज्ञावंतांचा विचार करण्यात आला नाही. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आघाडी सरकारमधील कोणत्याही पक्षाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यामुळे मातंग समाजात नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर जर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात ज्या पक्षाकडून मातंग समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळेल त्या पक्षाबद्दल समाजात आपुलकीचे वातावरण पसरून सामाजिक समतोल राहील.
दर दोन वर्षांनी विधानपरिषदेतील १/३ सभासद निवृत्त होत असतात. प्रत्येक वेळी मातंग समाजाला वाटते की यावेळी तरी संधी मिळेल. पण प्रत्येक वेळी मातंग समाजाच्या वाट्याला निराशाच येते. पण लोकशाहीला शिरसावंद्य माननारा हा समाज असल्यामुळे समाज बंड करुन उठत नाही. परंतु आता आपण समाजाच्या चांगुलपणाचा अंत न पाहता सामाजिक समतोल राखण्यासाठी समाजाला न्याय देणे गरजेचेआहे. असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले.