सोयगाव,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्याच्या ढगफुटीच्या पावसाने सोयगाव तालुक्यात हाहाकार माजविला असून सोयगाव शिवारात पाच आणि कंकराळा शिवारात एक अशी सहा जनावरे पुराच्या पाण्यात वाहून दगावली आहे.शुक्रवारी पहाटे महसूल विभागाने तातडीने या घटनांचा पंचनामा केला असून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.
सोयगावसह तालुक्यावर ढगफुटीचे संकट कोसळले आहे.या ढगफुटीच्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील नदी,नाले एक झाली असून या पावसात नद्यांच्या पात्राला दुथडी भरून पूर आले होते.या पुराच्या पाण्यात सोयगाव शिवारातील सुधाकर श्रीधर सोनवणे आणि शेख अजीज शेख हबीब या दोन शेतकऱ्यांचे शेतातील गोठ्यात बांधलेली पाच बैलजोड्या नाल्याच्या पुरात वाहून आल्या होत्या शुक्रवारी पहाटे या पुराच्या पाण्यातील मोहंदर नाल्यात या पाच जनावरांचे शव आढळून आले घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार सतीश देशमुख,तलाठी महादेव कदम यांच्या पथकांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे तब्बल ३ लाखाचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले असून दुसर्या अन्य घटनेत रावेरी शिवारातील विलास उबाळे यांचा शेतात बांधलेल्या रेड्यावर वीज कोसळून यामध्ये रेडा जागीच ठार झाला आहे.कंकराळा ता.सोयगाव येथील रावेरी शिवारात तलाठी महादेव कदम यांनी घटनेचा पंचनामा केला असून ढगफुटीच्या पावसात मृत झालेल्या सहा जनावरांवर पशुधन अधिकारी डॉ.मुंजाजी कंधारे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.काकडे यांच्या पथकांनी शवविच्छेदन करून या जनावरांना मृत घोषित केले होते.
सोयगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटात आणि चक्री वादळाच्या तडाख्यात सोयगाव परिसरातील अनेक गावांच्या घरांवरील पत्र उडाली आहे.गलवाडा,वेताळवाडी,सोनसवाडी,आमखेडा आदी भागात चक्री वादळात मोठे नुकसान झाले असून ढगफुटीच्या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक शेतात पाणीच पाणी साचले असल्याचे सोयगाव शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितले.