संत वामनभाऊ महाराजांच्या लाखो भाविकांना 'त्या' पवित्र क्षणाची उत्सुकता !
पाटोदा:नानासाहेब डिडूळ―
(श्री क्षेत्र गहिनीनाथ गड) 'संत साहित्य हे एक वैचारिक ताकद असते !' असं म्हणतात. देशात महाराष्ट्राला संतांची वैभवशाली परंपरा असलेली भूमी म्हणून ओळखले जाते. या संत-महंतांनीच राज्याला भक्तीचा मार्ग दाखवला... मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील संत वामन भाऊ महाराजांच्या पवित्र पादुका यंदा लाँकडाऊन मुळे थेट हेलिकॉप्टरने पंढरपूरला पोहोचण्याचा इतिहासातील प्रथम योग येत असून; 'त्या' पवित्र ऐतिहासिक क्षणाची उत्सुकता राज्यभरातील भाऊंच्या लाखो भाविकांना लागली आहे.
नाथ संप्रदायाचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर. नाथांचे मूळ गुरु आदिनाथ; म्हणजेच शिव ! यांचा दत्त संप्रदायाशी निकटचा संबंध. पूजनीय असलेल्या या संप्रदायाचे प्रवर्तक मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ ! यात 84 सिद्धांचा उल्लेख असल्याचे समजते. सांप्रदायिक उपदेश, गुरु-शिष्य परंपरा, मंत्र,तंत्र, ध्यान, योग, ज्ञान, उपासना यांना महत्व !
महाराष्ट्रात नाथ परंपरा रुजली आहे. शिवशक्ती व दत्तात्रय हे नाथ संप्रदायातील दैवत. यासह विविध दैवतांचा उल्लेख आढळतो. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड हे नाथांचे सर्वात आद्य पवित्र स्थान.
या गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला आज पर्यंत देश आणि राज्यातील विविध मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री येण्याचा इतिहास असून राज्य व देशभरात संत वामनभाऊ महाराजांचे विविध जाती धर्माचे भक्त आहेत.
यंदा कोरोनाविषाणू मुळे सर्वत्र लाँकडाऊन स्थिती असल्याने श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील संत वामन भाऊंच्या पादुका वारकरी संप्रदायाच्या इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने पांडुरंगाच्या पंढरीला जाण्याचा योग येत आहे. 30 जून रोजी हे प्रस्थान होणार असल्याची माहिती गडाचे महंत विठ्ठल महाराज आणि माजी आ. भीमराव धोंडे यांनी दिलेली आहे.
भाऊंच्या पालखीची १२५ वर्षाची परंपरा आहे; परंतु कोरोणामुळे ही पायी दिंडी ची परंपरा खंडीत होत असून गहीनाथ गडावरून हेलिकॉप्टरने पादुका जाण्याचा इतिहास घडणार आहे. या संदर्भात सर्व कायदेशीर सोपस्कार गड जिल्हा प्रशासना समवेत केले जातील, अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, या पादुका हेलिकॉप्टरने पंढरीला जाण्याचा इतिहास घडणार असून, संत वामनभाऊ महाराजांच्या राज्य व देशभरातील लाखो भाविक- भक्तांना 'त्या' पवित्र क्षणाची उत्सुकता मात्र लागली आहे.
"संत वामनभाऊ महाराज आणि संत भगवानबाबांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनांना 'माणुसकी'च्या तत्वांची शिकवण दिली; त्यामुळे भाऊ- बाबा राज्यातील तमाम लाखो जणांचे दैवत ठरले आहेत... गहिनीनाथ गडावरील भाऊंच्या पादुकांचे प्रस्थान पंढरीला हेलिकॉप्टरने होणार असल्याचे समजते; हा विहंगम पवित्र योग केंव्हा येतोय, याची उत्सुकता आम्हा लाखो भाविक भक्तांना लागली आहे...!"
–रघुनाथ नेहरकर पारगावकर,
( भाऊ- बाबा भक्त )