शेतकऱ्यांच्या धानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम्याने लक्ष द्या ―नाना पटोले

भंडारा,दि.१३:आठवडा विशेष टीम― पावसाळी परिस्थितीमुळे धान खरेदी केंद्रावरील धानाची स्थिती अतिशय गंभीर आहे. उघड्यावर पडलेला धान पावसामुळे खराब होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यासाठी दोन दिवसात याचा निपटारा झाला पाहीजे. मिलर्सच्या सोयीने धानाची भरडाई केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल, याबाबतची दक्षता घेण्यात यावी. मिलर्सच्या मिलमध्ये धान साठवणूक करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
जिल्ह्यातील लाखनी व साकोली तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी, विविध कार्यकारी सहकारी संस्था, पोहरा, कृषी केंद्र पिंपळगाव, साईबाबा राईस मिल पळसगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती सानगडी येथे जावून धानाच्या सद्यस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, पणन अधिकारी थोरात, तहसिलदार बाळासाहेब टेळे, मलिक विराणी, तालुका कृषी अधिकारी गिदमारे उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे लवकरात लवकर करण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करा. त्यासाठी पिंपळगाव पॅर्टनचा उपयोग करा. यावेळी धान खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. यांची दक्षता घेण्याचे पणन अधिकाऱ्यांना सांगितले. बऱ्याच ठिकाणी साध्या काट्यावर धान खरेदी होत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले. धान खरेदी केंद्रांनी इलेक्ट्रॉनिक्स काट्यावरच धान मोजणी करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या. यासाठी योग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले. नियम व त्याचे पालन यांचे विश्लेषण तसेच झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करावा. लवकरच सचिवस्तरीय बैठक मुंबई येथे घेऊन त्यामध्ये याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बऱ्याच धान खरेदी केंद्राच्या इमारतींची अवस्था दयनीय आहे. तसेच धान साठवणुकीसाठी गोदामाची आवश्यकता असल्याने नवीन इमारत बांधा. पिंपळगाव धान खरेदी केंद्रात योग्य प्रणालीचा वापर करुन धान खरेदी होत आहे. त्याच आधारावर धान खरेदी करण्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. येत्या दोन दिवसात संपूर्ण धान खरेदी झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. धानाच्या साठवण क्षमतेत वाढ कशी करता येईल याकडे प्राथम्याने लक्ष देऊन मिलर्सनी लवकरात लवकर धान भरडाई करण्याची सूचना त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी टोकन देऊन धान खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गोदाम लवकरात लवकर खाली करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

साकोली येथे बांधावर बियाणे, खते व किटकनाशके वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ

साकोली येथे बांधावर बियाणे, खते व किटकनाशके वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गिदमारे, कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे अध्यक्ष मोरेश्वर बोरकर उपस्थित होते. यावेळी त्रिवेणी शेतकरी बचत गट वडद, आदर्श शेतकरी बचत गट सावरबंध, बहुउद्देशीय जण बियाणे शेतकरी पुरुष गट उसगाव या बचतगटांना शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते व किटकनाशके वितरित करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.