अमरावती, दि.१३:आठवडा विशेष टीम― ‘कोविड-19’मुळे राज्यात सर्वत्र रोजगाराची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांवरसुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी वन विभागाच्या अखत्यारित येणारी सर्व कामे स्थानिक आदिवासींच्या सहाय्याने करावी. या माध्यमातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊन वने व वन्यजीव संवर्धनासाठी मदत होईल, असे राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी आज येथे सांगितले.
मेळघाटातील दोन दिवसीय दौऱ्यात आज (दि. 13 जून) दुसऱ्या दिवशी चिखलदरा, आमझरी, सिमाडोह, कोलकास या वनपरिक्षेत्राची पाहणी व विकास कामांचा आढावा मंत्री महोदयांनी सिमाडोह पर्यटन संकूलात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, शिव बाला, जिल्हा वन अधिकारी पियुषा जगताप यांच्यासह अनेक वन अधिकारी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी गुगामल वन विभागा अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा येथील विश्रामगृहाची पाहणी मंत्री महोदयांनी केली. तेथील 150 वर्षे जुन्या कॅक्टस वृक्षाची पाहणी करुन जैवविविधते संदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर वन उद्यानातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शहिद स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. त्याठिकाणी आंबा रोपाचे वृक्षारोपण त्यांचे हस्ते करण्यात आले. जंगल सफारीसाठी पर्यटकांसाठी उपलब्ध होणाऱ्या पर्यावरण स्नेही सायकल बुकींग केंद्राचे उदघाटन व शहापुर येथील प्रस्तावित मधुमक्षिका पालन केंद्राची पाहणी वन मंत्र्यांनी यावेळी केली.
श्री. राठोड म्हणाले की, मेळघाट हे वनपरिक्षेत्र जंगलाने वापलेले असून विपूल वनसंपदा व जैवविविधता याठिकाणी आढळून येते. ही वनसंपदा नेहमी टिकून राहण्यासाठी वनविभागाने त्यांच्याकडे अस्तित्वात असलेले प्रकल्प, उपक्रम आदी प्राधान्याने पूर्ण करावीत. वाघ हा जंगलाचा राजा असून त्याच्यामुळेच जंगल सुरक्षित आहे, त्यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. तसेच अभ्यासक, पर्यटक यांच्यासाठी नियमांचे बंधन घालून जंगलाचे वैविध्य व महत्व जनतेपर्यंत पोहोचावे.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील गोरगरीब मजूर बांधवांवर रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मेळघाटातील आदिवासी बांधव सुध्दा या संकटापासून दूर नाही. वन विभागाने वने व वन्यजीव संवर्धनासाठी तसेच मानव-वन्यजीव संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या कामे सोपवून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. मेळघाटातील गावांत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. आदिवासी बांधवांच्या वन हक्क पट्ट्यांचा विषय हा राज्यस्तरावरील महत्वाचा प्रश्न असून येत्या कालावधीत या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमझरी येथील निसर्ग पर्यटन संकूल येथे मंत्री महोदयांनी भेट देऊन पाहणी केली. वन विभागाव्दारे निर्माण करण्यात आलेल्या होम स्टे उपक्रमाचे पोलीस पाटील उर्मीला मोतीलाल धिकार यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. आमझरी पर्यटन संकूलात उभारण्यात आलेल्या रोप-वे या साहसी प्रात्यक्षिक खेळाची पाहणी केली तसेच प्रात्यक्षिक केलेल्या आदिवासी युवक-युवतींना मंत्री महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानंतर सिमाडोह पर्यटन संकुलाची पाहणी केली. सिमाडोह येथील आदिवासी बांधवांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आदिवासी बांधवांच्या तक्रारींचे निराकरण तत्काळ करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. तद्नंतर कोलकास पर्यटन संकुलाची पाहणी मंत्री महोदयांनी केली.
अमरावतीच्या बांबू गार्डनची वन मंत्र्यांकडून पाहणी
मेळघाट दौरा प्रसंगी सायंकाळी पाचच्या सुमारास वडाळी स्थित बांबू गार्डनला वनमंत्री संजय राठोड यांनी भेट दिली. 174 बांबूच्या प्रजाती असलेले भारतातील हे पहिले बांबू उद्यान असल्याची माहिती वनविभागाने त्यांना यावेळी दिली. यावेळी मंत्री महोदयांनी ट्रॅकुला गनची पाहणी करुन त्याचे प्रात्यक्षिक केले. बांबू गार्डन येथील बांबूच्या विविध प्रजाती, रोपवाटीका, बांबू माहिती केंद्र, तसेच कॅक्टस गार्डची पाहणी त्यांनी यावेळी केली व त्यासंदर्भात विशेषत: जाणून घेतली.
यावेळी नगरसेवक दिनेश बुब, सोमेश्वर पुसतरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक प्रदीप चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, शिव बाला, जिल्हा वन अधिकारी पियुषा जगताप यांच्यासह अनेक वन अधिकारी व वन्यजीव अभ्यासक आदी उपस्थित होते.