कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला बरा वाटणार नाही - अन्नत्याग, नवस, पायी वारी करणाऱ्या समर्थकांना धनंजय मुंडेंचे कोरोना वॉर्डातून आवाहन!

धनंजय मुंडे

मुंबई दि.१४:आठवडा विशेष टीम― राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यभरातुन त्यांचे समर्थक प्रार्थना, नवस, अन्नत्याग, पायी वाऱ्या करत आहेत; धनंजय मुंडे यांनी थेट कोरोना वॉर्डातून आपल्या या समर्थकांना असे काहीही न करण्याचे आवाहन केले आहे.

धनंजय मुंडेंनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून याबाबत अत्यंत भावनिक व संवेदनशील आवाहन करणारी पोस्ट केली असून, कोरोनातून लवकरात लवकर मुंडेंनी मुक्त व्हावे यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे काही समर्थक उपवास, नवस, पायी वाऱ्या आदी करत आहेत; काहीजण मुंबई कडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांचे हे प्रेम पाहून त्यांचे आपल्यावरील ऋण वाढतच जात असल्याचे ना. मुंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन येणार असून कोणीही पायी चालत वारी करणे, अन्नत्याग - उपवास करणे असे स्वतःला त्रास किंवा इजा करणारे यत्न करू नयेत, आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना असा त्रास झालेला आपल्याला कसा बरा वाटेल? असा सवालही ना. मुंडेंनी या पोस्टद्वारे केला आहे.

गुरुवारी रात्री उशिरा मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आणि याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ना. मुंडेंचा जनसंपर्क अत्यंत दांडगा असल्याने राज्यभरातून त्यांच्या समर्थक/चाहत्यांकडून सोशल मीडियासह विविध माध्यमातून प्रार्थना केल्या जात आहेत. काही ठिकाणी समर्थकांनी पायी वाऱ्या, अन्नत्याग असे काही प्रकार केल्याचेही समोर आले, त्यानंतर आपल्या समर्थक/कार्यकर्त्यांना 'सहकारी' म्हणणाऱ्या मुंडेंनी आपल्या समर्थकांना हे भावनिक आवाहन केले आहे.

कोणीही कसलाही त्रास करून न घेता, आहेत त्या ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे तसेच एकमेकांची काळजी घ्यावी, हेच आपल्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचे काम करतील असेही ना. मुंडेंनी म्हटले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.