यवतमाळ, दि.१४:आठवडा विशेष टीम― गत दोन – तीन दिवसांपासून जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात नऊ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यात सात पुरुष तर दोन महिलांचा समावेश असून एक रुग्ण पुसद येथील आणि आठ रुग्ण नेर येथील आहे.
आज (दि.14) नव्याने आलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये नेर येथील पुरुष (वय 57 वर्षे) आणि महिला (वय वर्षे 75) हे एकाच कुटुंबातील सदस्य आहे. तसेच नेर येथील 45 वर्षीय महिला आणि 21 वर्षीय युवक हे दोघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. याशिवाय नेर येथील 52 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय दोन युवक आणि 32 वर्षीय एका युवकाचा समावेश आहे. तर उर्वरीत एक पॉझेटिव्ह रुग्ण (वय 52 वर्षे) पुसद येथील आहे.
सध्यास्थितीत आयसोलेशन वार्डमध्ये 40 जण भरती असून यापैकी 34 ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 181 झाली असून यापैकी 144 जण बरे होवून घरी गेले आहे. तर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिंची संख्या जिल्ह्यात तीन आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2692 नमूने तपासणीसाठी पाठविले असून सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2511 जण नेगेटिव्ह आले आहे.
प्रशासनाचे आवाहन : राज्याच्या रेड झोनमधून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असून बाहेरून आलेल्या लोकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक लोकांनीसुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तात्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. जेणेकरून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होईल. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणुच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडलो तर मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.