औरंगाबाद जिल्हाप्रशासकीयब्रेकिंग न्युज

राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद मध्ये 1 ते 31 जूलै पर्यंत निर्बंध लागू

ग्रामिण भागातील संसर्गाला रोखण्यासाठी वाळूज परिसरात 4 ते 12 जूलै दरम्यान कर्फ्यू

औरंगाबाद दि. 29:आठवडा विशेष टीम― राज्य शासनाने 1 ते 31 जूलै पर्यंत लॉकडाऊन बाबत जारी केलेले निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू असणार आहे. त्यानूसार आतापर्यंत जे सुरु होते त्या सेवा त्याच नियमाने सुरु राहतील आणि ज्या बाबींवर निर्बंध ठेवण्यात आले होते ते 31 जूलै पर्यंत कायम राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा व शहर भागात राज्य शासनाने जारी केलेल्या 1 ते 31 जूलै पर्यंतच्या निर्बंधाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. चौधरी बोलत होते यावेळी महानगर पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते.
राज्य शासनाने 1 ते 31 जूलै पर्यंत लॉकडाऊनबाबतचे निर्देश जाहीर केलेले आहे. त्यातील सर्व नियम, आदेश औरंगाबादलाही लागू आहेत. शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगून श्री. चौधरी म्हणाले, मनपा क्षेत्रात सर्व दुकाने 9 ते 5 या वेळेत ज्याप्रमाणे सुरु आहेत ती तशीच सुरु राहतील मात्र मॉल, मोठे मार्केट बंद राहतील. रेस्टॉरंट 31 जूलै पर्यंत बंदच राहणार असून घरपोच सेवा सुरू राहतील. मद्य विक्री दुकानेही 31 जूलै पर्यंत बंद राहणार असून ऑनलाइन मद्यविक्री घरपोच सेवा सुरु राहणार आहे.
या नविन नियमावलीत आता शहरातील सलुन, ब्युटीपार्लर या व्यावसायिकांना नियमांचे पालन करुन दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शैक्षणीक संस्थांमधील शिक्षकेतर ,आस्थापनाविषयक कामे सुरु करता येणार आहेत. मात्र शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस शिकवणे बंद राहणार आहे. वाहतूक व प्रवास हे नियमाधीन राहूनच करता येणार आहे. जिल्हा प्रवेश बंदी असून प्रवास पास घेऊनच प्रवास करता येईल. तसेच मनपा क्षेत्रात वाहतूकीवर पोलीस नियंत्रण राहील. टु व्हीलर वर एक, तीन चाकीत दोन आणि चारचाकी वाहनात ड्रायव्हर सह दोन जणांना परवानगी राहील.
तसेच विभागीय आयुक्तांकडे लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने विस्ताराने चर्चा झाली असल्याचे सांगूण जिल्हाधिकारी यांनी वाळूजसह परिसरात 4 ते 12 जूलै या कालावधीत कर्फ्यू लावण्यात येणार असल्याचे सांगितले. या निर्णयाला लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला असून ग्रामीण भागातील संसर्गात वाळूज परिसर व त्या भागातील सात ग्रामपंचायत क्षेत्रात रुग्ण संख्या वाढीचा वेग रोखण्यासाठी हा कर्फ्यू लावण्यात येणार आहे. त्या कालावधीत या भागातील सर्व दुकाने, वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. दुध, औषधे वगळता इतर दुकाने बंद राहतील. तसेच या कालावधीत वाळूज – औरंगाबाद आणि औरंगाबाद – वाळूज प्रवास पूर्ण बंद राहील. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कारणाने कुणालाही प्रवास करता येणार नाही. आवश्यक कारणानेही पासशिवाय प्रवास करण्यास निर्बंध राहील. या कर्फ्यूमध्ये उद्योजकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होत कमीत कमी मनुष्यबळावर काम करत या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे उद्योजकांना, कंपनी व्यवस्थापकांना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शहरातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनतेने स्वंयशिस्तीचे पालन करणे, प्रतिबंधात्मक नियम पाळणे, गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे यासाठी अधिक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या आजच्या बैठकीत नियमांचे पालन करण्याच्यादृष्टीने जनप्रबोधन करुन जनसहभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणेमार्फत पूर्ण प्रयत्न करण्यावर एकमत झाले आहे. त्यानंतरही जर परिस्थिती नियंत्रणात राहीली नाही तर शहरात 10 जूलै नंतर कर्फ्यू लावण्याबाबत विचार करण्यात येईल. जनतेने नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रयत्नशील रहावे अन्यथा संपूर्ण शहरात किंवा बाधित क्षेत्रात कर्फ्यू लावावा लागेल, असे जिल्हाधिकारी श्री. चौधरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button