औरंगाबाद दि.३०:आठवडा विशेष टीम― राज्य शासनाच्या निर्दैशानुसार जिल्हयातील लॉकडाऊनचा कालावधी 31 जूलै 2020 च्या मध्य रात्रीपर्यत वाढवण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर
औरंगाबाद जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) या मनाई आदेश जारी केले असून हे आदेश यापुढे दिनांक 31 जूलै 2020 चे 24.00 वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील.
शासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गतच्या आदेशानुसार दिनांक 01.07.2020 पासून पुढील नियमावली व उपाययोजना लागू करण्यात येत आहे.
सदरील आदेशाच्या कालावधी दरम्यान अत्यावश्यक नसलेल्या सेवा/बाबीं जसे की, किरकोळ खरेदी, व्यायाम इत्यादी बाबींसाठी व्यक्तींची हालचाल मर्यादित राहील आणि त्यासाठी लोकांनी नजिकच्या भागात जाणे बंधनकारक राहील. तसेच बाहेर पडतांना फेसमास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आणि वैयक्तीक स्वच्छतेचे पालन करणे बंधनकारक राहील.
परिशिष्ठ-2 मध्ये नमूद केलेल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तसेच वैद्यकीय बाबी आणि मानवीय दृष्टीकोनातून अत्यावश्यक असलेल्या बाबींसाठी व्यक्तींची विना निर्बंध हालचाल चालू राहील.
कोव्हीड-19 च्या व्यवस्थापनासाठी परिशिष्ठ-1 मध्ये निर्दिष्ठ केलेले राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. यापुर्वी मान्यता दिलेल्या बाबीं आणि परिशिष्ठ-2 मध्ये नमूद केलेल्या बाबी यापुढे दिनांक 31 जुलै 2020 पर्यत लागू राहतील.
शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही,असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.
परिशिष्ट-1
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
सार्वजनिक ठिकाणे-
1. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करतांना फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे.
2. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान 6 फुट (दो गज की दुरी) ठेवावे. दुकानामध्ये ग्राहकाची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त असणार नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार/आस्थापना चालक यांचेवर राहील.
3. मोठया प्रमाणावर गर्दी होणारे ठिकाणे जसे की, संमेलने/परिषदा इ. प्रतिबंधीत असतील.
विवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल तसेच अंत्यविधीसाठी 50 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी असणार नाही.
4. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील व त्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
5. सार्वजनिक ठिकाणी पान, तबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान यांचे सेवन करण्यास मनाई राहील.
6. पान, तंबाखूची दुकाने, रेस्टॉरंट पुर्णपणे बंद राहतील.कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त सूचना
7. जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्त घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा. कामाचे ठिकाणी कार्यालये, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व व्यावसायीक आस्थापनामध्ये कामाच्या वेळात योग्य ते अंतर ठेवावे जेणे करुन गर्दी होणार नाही.
8. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडुन निर्गमित सूचनानुसार सर्व प्रवेश व निर्गम स्थानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
9. सर्व कामाच्या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळयादरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
10.दोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.
परिशिष्ट-2
A. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.
B. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र वगळता औरंगाबाद जिल्हयाच्या उर्वरित भागात विवक्षितरित्या प्रतिबंधीत बाबी वगळता इतर सर्व बाबी खालील नमूद केल्यानुसार वेळोवेळी लागू केलेल्या निर्बंधासह सुरु राहतील. नागरीकांच्या हालचालीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
दुचाकी – केवळ चालक , तीनचाकी- 1 + 2 आणि चारचाकी- 1 + 2 परवानगी आहे.
जिल्हयाअंतर्गत बस सेवा जास्तीत जास्त 50 टक्के कार्यक्षमतेनुसार, सामाजिक अंतर व सॅनिटाईझरच्या वापरासह चालु राहतील.आंतर जिल्हा हालचालीस निर्बध लागू राहतील.
अत्यावश्यक बाबी/सेवा न देणारी बाजारपेठ/दुकाने सकाळी 9.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यत चालू राहतील.
लग्न समारंभासाठी खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल शासन आदेश दिनांक 23 जून, 2020 मध्ये नमूद केलेल्या निर्बधासह चालू राहतील. मोकळया मैदानातील व्यायाम/शारिरीक क्रिया निर्बंधासह चालू राहील. वृत्तपत्राची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) चालु राहील.
शैक्षणीक संस्थांची कार्यालये / कर्मचारी (विद्यापिठे/महाविद्यालये/शाळा इ.) शिकविण्या व्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे की, ई साहित्याचा विकास, उत्तर पत्रिकाचे मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी चालू राहील.
केशकर्तनालय ब्युटी पार्लर, सलुन, स्पा दुकाने या कार्यालयाचे आदेश दिनांक 26.06.2020 मधील नमूद केलेल्या निर्बंधासह चालु राहतील.
विशिष्ठ आदेशाने परवानगी दिलेली इतर कोणत्याही बाबी चालू राहतील.