प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार ; म्हणाले कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार

मुंबई, दि.३०:आठवडा विशेष टीम― राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या श्री. संजय कुमार Sanjay Kumar यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री. अजय मेहता CS Ajoy Mehta यांच्याकडून आज पदभार स्विकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याप्रसंगी सहकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.

यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. मेहता यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव म्हणाले की, राज्य गेल्या चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जाईल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाचा राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळा सुरू झाला आहे. याकाळात रोगराईचे प्रमाण वाढू शकते तो रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.

मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या तुकडीचे असून आता पर्यंतच्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. १९८५ मध्ये अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांची त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.

१९९७ मध्ये उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेचे प्रकल्प समन्वयक, उर्जा नियामक आयोगाचे सचिव, पुणे महापालिका आयुक्त, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष, औरंगाबाद विभागीय आयुक्त, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले तर महिला व बालकल्याण, गृहनिर्माण या विभागांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button