प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यरोजगार

...आता होणार 'ऑनलाईन' रोजगार मेळावे ; पहा काय म्हणाले नवाब मलिक

२५ हजार ४७ उमेदवार व ११५ उद्योगांचा सहभाग, तर १ हजार २११ उमेदवारांची निवड – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम―

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
  या मोहीमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण 14 ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन मेळाव्‍यांमध्‍ये एकूण 115 उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली 12 हजार 322 रिक्‍तपदे अधिसूचित केली. 25 हजार 047 उमेदवारांनी ऑनलाईन भाग घेतला व त्यापैकी 1 हजार 211 उमेदवारांची निवड झाली असून इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु आहे, अशी माहितीही मंत्री श्री.मलिक यांनी दिली.

  कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करून हे मेळावे घेतले गेले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथील जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी 1 ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला. नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी 2 तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी 4 ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.

  मंत्री श्री.मलिक म्हणाले की, या ऑनलाईन मेळाव्यांमध्ये सर्व रोजगार इच्छूक व ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार संबंधित उद्योगांकडे मुलाखतींचे नियोजन करुन, संगणक प्रणालीद्वारे एसएमएस पाठवून अवगत करण्यात येते. तसेच त्यांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हॉटस्ॲप, स्काईपद्वारे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कंपनीमध्ये ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जातात. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व बाबींचे समन्वय कौशल्य विकास कार्यालयांमार्फत केले जाते. महास्वयंम वेबसाईट यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यापुढील काळातही ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍याबाबत कॅलेंडर तयार करण्‍यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

  सर्व उमेदवार व उद्योग यांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री.मलिक यांनी केले आहे.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.