कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाबीड शहरब्रेकिंग न्युज

बीडकरांनो बातमी पहा..! बीड शहरात ८ दिवसासाठी संपूर्ण संचारबंदी

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.०१:आठवडा विशेष टीम― बीड शहरामध्ये नव्याने करोना विषाणूची लागण झालेले तीन रुग्ण आढळले असून बीड शहरात covid-19 चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण शहरांमध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक असल्यामुळे बीड शहरातील इतर भागांमध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार बीड शहरात आठ दिवसांसाठी (०९ जुलै रोजी रात्री १२.०० वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येऊन कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे व खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

1. वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमा विषयक सेवा 24 तास सुरू राहतील.

2.बीड शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही

3. अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालय वगळता (महसूल ,पोलीस ,ग्रामविकास ,नगरविकास ,कृषी व आरोग्य) बीड शहरातील सर्व आस्थापना ,बँका (शासकीय व खाजगी आस्थापना) इत्यादी बंद राहतील. वरील सहा विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळख पत्राद्वारे शहरांतर्गत प्रवास करू शकतील

4.बीड शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही , परंतु मेडिकल इमर्जन्सी मधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी covid19.mhpolice.in
या वेबसाईटवर भरून पास प्राप्त करून घ्यावा.

5.बीड शहरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप तात्काळ डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील. करोना विषाणू चे अनुषंगाने ताप ,सर्दी ,खोकला डोकेदुखी ,श्वसनास त्रास इत्यादी लक्षणे आढळून आल्यास सदरील ॲपमध्ये self-assessment या सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी.

6.बीड शहरात फक्त फिरते दूध विक्रेते यांना परवानगी राहील. कोणत्याही दुकानदारा मार्फत दूध विक्री केली जाणार नाही अथवा दुकान उघडणार नाही.त्यांनी दुधाची पाकिटांची होम डिलिव्हरी करावी व ती करत असताना covid-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे.

7.जार वाटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडून उपलब्ध भांड्यामध्ये पाणी द्यावे आणि त्या वेळेस covid-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न घेता त्याच जार मध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी. तसेच सर्व वाटर सप्लायर्स कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेऊन सेवा पुरवावी.

8.परवानाधारक भाजी व फळ विक्रेते यांना पूर्वीप्रमाणे परवानगी राहील, परंतु त्यांनी घरोघरी जाऊनच विक्री करावी.

9.घरगुती गॅस घरपोच सेवा देताना त्या कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेले कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून सेवा द्यावी.

10. मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा द्यावी.

11. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेते यांनी दवाखान्याची ओळखपत्र अथवा ऑनलाइन पास द्वारे बीड शहर अंतर्गत प्रवासास परवानगी देण्यात येत आहे.

12. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे बाबतचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येईल.
सदरील आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे मा. जिल्हाधिकारी बीड यांनी दि.०१/०७/२०२० रोजी आदेशित केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.