वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरूंना काँग्रेसचे निवेदन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रास संशोधकासह कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावेत अशा मागणीचे निवेदन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना काँग्रेस कार्यकर्त्यांचे वतीने गुरूवार,दिनांक 2 जुलै रोजी देण्यात आले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना काँग्रेस कार्यकर्त्यांचे वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,धारूर येथील सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई येथे आणुन तत्कालीन मंत्री स्व.विमलताई मुंदडा यांनी परिसरातील शेतक-यांना एक आशेचा किरण दाखविला होता.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अंबाजोगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र धुमधडाक्यात सुरू होऊन विविध प्रजातीतील सीताफळाचे वाण येथे तयार झाले.सीताफळातील विविध वाणातील धारूर-६ या वाणास मोठ्या प्रमाणात मागणी आहे.शेतकरी वर्गाला त्याचा मोठया प्रमाणात फायदा झाला.आज येथे ब-याच वर्षांपासून संशोधक नसल्यामुळे करोडो रूपये खर्च करून बांधलेले सीताफळ संशोधन केंद्र अडगळीत पडले आहे.अंबाजोगाई शहराच्या उत्तर पश्चिमेला असलेला धारूर तालुका,वडवणी तसेच परळी तालुका हा डोंगराळ भाग असून सीताफळ उत्पादनासाठी पोषक परिसर आहे.येथील सीताफळ संशोधन केंद्र सुरू झाले व परिसरातील शेतक-यांच्या अपेक्षा वाढल्या मात्र सद्य परिस्थितीत या केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने शेतक-यांना म्हणावा तसा फायदा होत नाही.या केंद्राला कायमस्वरूपी संशोधक देण्यात यावा तसेच येथील रिक्त पदांवर तत्काळ भरणा करून संशोधन विस्ताराला शेतकरी हिताच्या दृष्टीने चालना देणे आवश्यक आहे.यासाठी तात्काळ अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात संशोधकासह इतर कर्मचारी वर्गाची भरती करण्यात यावी ही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना भेटून करण्यात आली.यावेळी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख हे उपस्थित होते.सदरील निवेदनावर अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक संजय बालासाहेब वाघमारे,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.अनंतराव जगतकर,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष
वसंतराव मोरे,काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अॅड.तारेखअली उस्मानी,
माजी जिल्हा सरचिटणीस भगवानराव ढगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.