रत्नागिरी दि. 08:आठवडा विशेष टीम― गेल्या 80 वर्षात असं वादळ बघितलं नाही. सारं होत्याचं नव्हतं झालं यात. हे स्मारक इथं नसतं तर अनेकांचे जीव धोक्यात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकानं आमचे जीव वाचवले, आंबडवे चे भागुराम सपकाळ सांगत होते.
निसर्ग वादळ अतिशय मोठं होतं. त्याच्या तीव्रतेचा पहिला फटका कोकण किनारपट्टीला बसला, याच भागात मंडणगड तालुक्यात उंचावरील डोंगर वस्ती म्हणजे आंबडवे हे गाव . सर्वांना परिचयाचे आहे ते संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव म्हणून.
डॉ. आंबेडकर यांचं शिक्षण झालेल्या या गावात एक स्मारक आता उभरण्यात आलयं. डोंगरमाथ्यावर रस्त्याच्या एका बाजूने मुलांचे वस्तीगृह ओलांडल्यावर गावाची सुरुवात होते. पुढे डोंगर उतारावर असणारं हे छोटे दुमदार गाव. गावात उरल्यात फक्त निसर्गाने दिलेल्या वादळखुणा.
जिल्ह्याचे पालकमंत्री ऍ़ड. अनिल परब यांनी या गावाला भेट दिली. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर स्मारकात थांबलेल्या काही जणांशी संवाद साधला.
भागुराम सकपाळ यांनी नेमकेपणानं काय घडलं ते कथन केलं. माझे हे गाव, नोकरीसाठी मुंबईत होतो, निवृत्ती पासून गावातच आहे. गेल्या 80 वर्षात असं वादळ प्रथमच आलं सांगताना ते म्हणाले की हे रात्री घडलं असतं तर अनेक जणांचे जीव गेले असते आणि या स्मारकात सर्व गावकऱ्यांनी आसरा घेतल्याने सर्व बचावल्याचे ते ते म्हणाले.
गावात असणाऱ्या प्रत्येक घरावरील छत आता शिल्लक नाही . काहींच्या घरावर पत्रे होते तर काहींच्या घरावर कौल. आता गावभर त्याचे तुकडे विखुरलेले आहेत. साधारण 200 मीटर वर असणारी जिल्हा परिषद शाळा देखील पत्रे उडालेल्या स्थितीत आहे.
पालकमंत्री ऍ़ड. परब यांनी सर्वांशी संवाद साधला. लवकरात लवकर मदत मिळेल असा शब्द दिला. तातडीने लागणाऱ्या वस्तूंमध्ये घरावर किमान प्लॅस्टिक अच्छादन, कंदिलांसाठी रॉकेल लागणार आहे. कारण प्रचंड गतीच्या निसर्गाने विविध यंत्रणा पूर्णपणे उध्वस्त केलीय. वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागणार आहे.
वादळानंतर गावची अवस्था आणि त्यावर शिल्लक वादळखुणांमुळे काय घडलं याची कल्पना येते. अशा स्थितीत कोरोडांना आयुष्याची दिशा दाखविणाऱ्या व आयुष्य बदलणाऱ्या महामानवाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्मारकाने लोकांचे जीव वाचवले हेच खरं. याच भावनेतून स्मारकातील प्रतिमांना वंदन करून पुढच्या गावाकडे आम्ही निघालो.
निसर्ग चक्रीवादळ
रायगड: नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यास कटिबद्ध –आदिती तटकरे
अलिबाग,जि.रायगड,दि.६:आठवडा विशेष टीम―
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. आज माणगाव तालुक्यातील माणगाव, गोरेगाव, मोर्बा, सुर्ले आदिवासीवाडी, नागाव, वडवली, पुरार, वणी, नांदवी, इंदापूर आदि नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी करून बाधित नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाले असून वीजपुरवठाही खंडीत झालेला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करून सर्वांना तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत मिळेल. ज्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे, त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे.
विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू असून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आश्वासक वक्तव्य पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले आहे.
निसर्ग चक्रीवादळ : अकोले तालुक्यातील नुकसानग्रस्त चौधरी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वितरण
शिर्डी:आठवडा विशेष टीम― निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याच्या विविध भागात घरांचे तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले परिसरातील नुकसानीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेबत थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून केली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
अकोले तालुक्यातील लहित बु. येथील सागर पांडुरंग चौधरी यांच्या घराची भिंत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील वारसांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आमदार डॉ.किरण लहामटे यांच्याहस्ते शासकीय मदतीपेाटी सानुग्रह अनुदानाचा चार लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
चक्रीवादळामुळे घराची भिंत पडून मृत्यू झाल्यानंतर चौधरी कुटुंबातील वारसांना फक्त एका दिवसात शासकीय मदत मिळवून देऊन महसूल विभागाने गतिमान प्रशासनाची जाणीव करुन दिल्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
मंत्री महोदयांनी यावेळी चौधरी कुटुंबाच्या घराच्या व परिसरातील झालेल्या नुकसानीची पाहणीसुद्धा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप गोसावी, नायब तहसीलदार श्री.महाले, तलाठी श्री.कुंदेकर, मंगेश फाफाळे उपस्थित होते.
‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
नाशिक दि.३:आठवडा विशेष टीम― हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ ३ जून किंवा ४ जून रोजी नाशिक जिल्ह्यात येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील काही भागात नागरिकांना अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी दोन दिवस घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ हे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर, संचालक डॉ. अभय यावलकर, नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या संपर्कात असून यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून योग्य त्या उपाययोजना करण्यातबाबत सूचना दिलेल्या आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, आयएमडी हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ ३ जून किंवा ४ जून रोजी नाशिक जिल्ह्यात दाखल होऊन यामुळे जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, घराच्या बाहेर पडू नये. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे, घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी घरात प्रथमोपचार किट, लागणारी आवश्यक औषधे व आजारी रुग्णांची औषधे सुरक्षित जवळ ठेवावी. विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटरसाठी इंधनाचा पुरवठा असावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. विनाकारण घराबाहेर न पडता व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन असलेले नागरिक यांच्यासाठी सुरक्षित स्थळे निश्चित करावी व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत नियोजन करावे तसेच अधिक माहितीसाठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.