सोयगाव तालुक्यात पहिली कापूस वेचणी ,नवरात्र उत्सवात शेतकऱ्यांना लक्ष्मीदर्शन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात मे अखेरीस आणि पाच जूनपर्यंत लागवड केलेल्या कापूस पिकांची पहिली वेचणी सुरू झालेली असून पहिल्याच वेचणीत शेतकऱ्यांना लक्ष्मीदर्शन होत आहे,परंतु कापसाच्या भावाबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याने होत असलेले लक्ष्मीदर्शन डोळ्यांचे पारणे फेडण्याइतपत असल्याचे चित्र आहे..
सोयगाव तालुक्यात यंदाच्या खरिपाच्या हंगामात ३४ हजार ७०८ हेक्टर वर कपाशी ची लागवड करण्यात आलेली आहे, परंतु सप्टेंबर महिन्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीच्या व सततच्या पावसाच्या नुकसानीत ऐन कापूस बहाराच्या कालावधीत कपाशी पिकांचे ६० टक्के नुकसान झालेले आहे,यासाठी महसूल आणि कृषी विभागांनी पंचनामे मोहीम हाती घेतली आहे,परंतु पंचनाम्या नंतरही सोयगाव तालुक्यात नुकसान भरपाई मिळणार नसल्याची शक्यता आहे… झालेला अतिवृष्टीचा पाऊस हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसचा झाला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांच्या पहिल्याच वेचणीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे त्यामुळे पहिल्या वेचणीत भरगच्च असलेला कापूस घरात आणण्याची शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे..

वेचणी साठी येतोय मोठा खर्च-

कपाशी पिकांच्या संगोपनासाठी झालेला खर्च आणि त्यानंतर पुन्हा वेचणी साठी प्रति किलो आठ रु याप्रमाणे भाव द्यावा लागत असून,मजूरांना खुशामत करावी लागत आहे.. दरम्यान पहिल्याच वेचणीचा कापूस घरात आणतांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येत असून मात्र विक्री साठी चा हमीभाव अद्यापही जाहीर झालेला नसल्याने खासगी व्यापारी पहिल्याच वेचणीचा कापूस मनमानी भाव देऊन खरेदी करत आहे…

यंदाच्या वर्षात शिमग्याच्या आधीच कपाशीचे सीमोल्लंघन

सोयगाव तालुक्यात यंदा शिमग्याच्या आधीच कपाशी पिकांची उत्पन्न येत असल्याने कपाशी पिकांनी शिमग्याची आधीच गावात सीमोल्लंघन केले आहे.. मात्र हमी भाव नसल्यानें शेतकऱ्यांचे लक्ष्मी दर्शन अपूर्ण राहण्याची शक्यता आहे
चौकट–सोयगाव तालुक्यात कपाशी उत्पन्नात मराठवाड्यात अग्रेसर आहे परंतु सोयगाव तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून कपाशीचे शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यात कापसाच्या विक्रीसाठी जावे लागते, त्यातही भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात जळगाव जिल्ह्यात कापूस विक्री करावा लागतो….
गाडीभर कपाशीच्या पहिलेच उत्पन्न आलेला शेतकरी समाधान गव्हांडे यांचे शी संपर्क साधला असता,पहिल्याच वेचणीत गाडीभर उत्पन्न मिळाले परंतु शासकीय खरेदी केंद्रा अभावी हा कापूस व्यापाऱ्याला द्यावा लागनार असल्याची प्रतिक्रिया समाधान गव्हांडे यांनी दिली आहे…

लक्ष्मी दर्शन पण भाव नाही

सोयगाव तालुक्यात कपाशीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना लक्ष्मीदर्शन झाले आहे परंतु शासनाने अद्यापही हमीभाव जाहीर केलेल्या नसल्याने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची कोंडी होत आहे….

जरंडीला सारे काही ! कुठेच जाण्याची गरज नाही..जिल्ह्य तील एकमेव स्वयंपूर्ण जरंडी गाव – पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांचे भावोद्गार

सोयगाव,दि.०५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अबब! जरंडीला सारेच काही,कुठेच जाण्याची गरज नाही…असे उदगार सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी शुक्रवारी दि.०६ जरंडी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या त्यावेळी ते जरंडी गावावर खुश होत बहोत खूब असे म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.

जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विक्रमी वृक्षलागवड मोहीम,जेष्ठ नागरिकांचा कक्ष,गावाच्या सुरक्षेसाठी गावात सी.सी.टी.व्ही कॅमेरे,आदी उपक्रम राबवून गावाचा कायापालट केला यासाठी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी जरंडी ग्राम पंचायतीला भेट देवून गावाच्या सुरक्षेसाठी व पोलिसांच्या मदतीसाठी राबविण्यात आलेल्या गावभर सी.सी.टी.व्ही कॅमेरा उपक्रमाचे कौतुक केले आहे,गावाच्या प्रत्येक कोपरा या कॅमेऱ्यात कैद झालेला असून रात्रीचा फायदा घेत काही अज्ञातांना या उपक्रमाचा धसका बसला असल्याचे सांगून जरंडी गाव सोयगाव पोलिसांचे पोलीस मित्र झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सरपंच वंदनाताई पाटील,राजेंद्र पाटील,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,ग्राम पंचायत सदस्य मधुकर पाटील,ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे,उपनिरीक्षक सतीश पंडित,पोलीस शिपाई रवींद्र तायडे,लिपिक संतोष पाटील,बालू तात्या,सिद्धार्थ मोरे,श्रीराम चौधरी,विजय चौधरी,आदींची उपस्थिती होती.

शेत मजुरावर रानडुक्कराचा हल्ला ;घोसला येथील घटना

घोसला,दि.०७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― घोसला ता.सोयगाव येथे शेतात पिकांना खते देण्याचे काम करतांना अचानक रानडुक्करने शेतात प्रवेश करून शेतात काम करणाऱ्या मजुरावर हल्ला चढविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली या घटनेत शेतमजूर गंभीर जखमी झाल्याने त्याचेवर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी जळगावला पाठविण्यात आले आहे.

चंद्रकांत एकनाथ बावस्कर(वय ४७) असे रानडुक्करच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेत मजुराचे नाव असून शेतात पिकांना खते देण्याचे काम करत असतांना अचानक शेतात आलेल्या चवताळलेल्या रान डुक्कराने त्याचेवर हल्ला चढवून त्यास चावा घेवून गंभीर जखमी केले आहे.या घटनेमुळे घोसला शिवारात शेत मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून ऐन खरिपाच्या मशागतीच्या कामांमध्ये खीळ बसली आहे.शेती शिवारात रान डुक्कराचे कळप मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

तीन सोसायट्यासाठी २३ उमेदवारी अर्ज दाखल ;आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

सोयगाव, दि.०५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील जाहीर झालेल्या पाच सेवासंस्थापैकी गलवाडा, निंभोरा, आणि उप्पलखेडा या तीन सोसायट्या चे २३ उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल झाले असून शुक्रवारी या पाच सेवा संस्था साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे परंतु अद्यापही फरदापुर आणि उमरविहिरे या दोन सोसायट्यांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नसल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली
सोयगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यासाठी फरदापुर, गलवाडा,निंभोरा,उप्पलखेडा,आणि उमरविहिरे या पाच सेवा संस्था च्या निवडणुका जाहीर झाल्या आहे त्यासाठी शुक्रवारी दि.६ उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून दि.९ छाननी हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील पाच सोसायट्या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूकांचा निरुत्साह आढळून येत असल्याने या पाचही सोसायट्या बिनविरोध च्या मार्गावर असल्याचे चित्र आहे तालुक्यात राजकारणात महत्वाचा ठसा उमटविणार्या फरदापुर सोसायटी साठी अद्यापही उमेदवारी अर्ज निरांक असून उमरविहिरे सोसायटी साठीही एकही अर्ज प्राप्त झालेला नाही
—-बँकेच्या ठरावाची वेळ निघून गेल्याने सोयगाव तालुक्यात सोसायटी निवडणुकांसाठो उत्साह राहिला नसल्याचे चित्र असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून केवळ घोसला आणि पळाशी या दोन सोसायट्या साठीच राजकीय चुरस असल्याचे चित्र आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीमुळे सोयगाव तालुक्यात सोसायट्या निवडणुकीसाठी चुरस मावळली आहे
-मागील दोन पंचवार्षिक जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवार देणारी सोसायटी उमरविहिरे सोसायटीची जिल्हा भर ओळख आहे परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडी साठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही शुक्रवारी अंतिम मुदतीच्या दिवशी उमरविहिरे आणि फरदापुर सोसायट्या चे चित्र स्पष्ट होईल अर्ज स्वीकृती साठी निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे,यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप रावणे, अशोक घनघाव,अशोक वाघ आदी कामकाज करत आहे

घोसला घरकुल प्रकरण – त्या ६१ वगळणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात येईल ;सरपंच सुवर्णाबाई वाघ यांचा विश्वास ,केंद्रीयमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या भेट

सोयगाव,दि.३१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―

प्रधानमंत्री आवास योजनेतून पडताळणी समितीने पात्र असलेल्या परंतु चुकीच्या पद्धतीने निकष लावलेल्या घोसला येथील त्या ६१ लाभार्थ्यांना आवास योजनेत समाविष्ट करण्याचा विश्वास सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी गुरुवारी केंद्रीयमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या भेटीनंतर स्पष्ट केल्याने तय ६१ पात्र असलेल्या परंतु तूर्तास वगळणी केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड प्रपत्रात घोसला ता.सोयगाव येथील २५५ लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली होती.यादी प्राप्त होताच पंचायत समितीच्या वतीने पडताळणी समितीकडून सदरील समाविष्ट लाभार्थ्यांच्या नावांची पडताळणी करून त्यांचे पक्के घरे व कच्ची घरे या वर्गवारीत पडताळणी करण्यात आली परंतु घोसला येथे पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पडताळणी साठी चुकीचा पद्धतीने निकष लावून पडताळणी करण्यात आलेल्या यादीतून ६१ नावांना कात्री लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.पडताळणी समितीची पडताळणी चुकीच्या निकषात झाल्याने पात्र असलेल्या ६१ जणांना समितीने योजनेतून बाद केल्याने त्या वगळलेल्या ६१ जणांचे घरकुलचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे चित्र आढळून आले सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांचेशी या प्रकरणात चर्चा करून हि नावे समाविष्ट करण्यासंबंधी मागणी केली यासाठी पुन्हा विशेष ग्रामसभेचा ठराव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद,यांना पाठविण्यात आलेला असून या प्रकरणी केंद्रीय मंत्री डॉ,भागवत कराड यांची भेट घेवून या नावांची घरकुल योजनेत पुन्हा समावेश करण्यासाठी मागणी निवेर्दनाद्वारे केली असता डॉ.भागवत कराड यांनी दिलेल्या आश्वासानावरून त्या ६१ जणांचा घरकुल योजनेत समाविष्ट होणार असल्याची माहिती सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी दिली आहे त्यामुळे घोसला गावातील त्या ६१ जणांना घरकुल योजनेसाठी दिलासा मिळाला आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी त्या ६१ लाभार्थ्यांची शिफारस करण्यात येणार असल्याने पहिल्या टप्प्यात घोसला गावासाठी १५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट्य प्राप्त झाले असून दुसऱ्या टप्प्यात उद्दिष्ट्य देतांना त्या ६१ लाभार्थ्यांचा विचार करण्यात येईल असेही संकेत प्राप्त झाले आहे.

निधन वार्ता- शिवाजी तुळशीराम वाघ यांचे निधन

सोयगाव,दि.२६: घोसला ता.सोयगाव येथील शिवाजी तुळशीराम वाघ(वय ७७) यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.घोसला येथील ज्ञानेश्वर वाघ यांचे ते काका होते.सायंकाळी त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घोसल्यात रोहींचा हल्ला ,एक गंभीर

घोसला,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―

घोसला ता.सोयगाव येथे गावालगत पायी चालणाऱ्या एक तरुणावर रोहीने जोरदार हल्ला चढवून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.गावात रोही शिरल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती.

घोसला ता.सोयगाव येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या भूषण पुंडलिक पाटील(वय २८) यांचेवर रोहीने जोरदार हल्ला चढवून त्यांच्या तोंडाला व शरीराच्या इतर ठिकाणी लचके तोडून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.याबाबत भूषण पाटील आणि वैभव युवरे दोघे पहाटे सहा वाजता रस्त्याने पायी जात असतांना त्यांचेवर गावालगत रोहीने जोरदार हल्ला चढविला यामध्ये भूषण पाटील या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्यास पाचोरा जि .जळगाव येथील खासगी दवाखान्यात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.

रोही गावात शिरल्याने खळबळ-

घोसला गावात गुरुवारी पहाटे जंगलातून आलेला रोही अचानक गावात शिरल्याने घोसला ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती.दरम्यान वनविभागाने या रोहींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

महादेवाच्या मंदिरात नंदी दुध पितो,अफवेने सोयगाव तालुक्यात उसळली महिलांची गर्दी ,ग्रामीण भागात अचानक मंदिरे रात्री फुल

सोयगाव,दि.०५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील–

महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दुध सेवन करत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात ग्रामीण भागात पसरताच अचानक सायंकाळी ग्रामीण भागातील महादेवाच्या मंदिरावर महिलांची मोठी गर्दी उसळली या घटनेच्या गर्दीमुळे उसळलेली गर्दीला आवर घालण्यासाठी अखेरीस सोयगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले .मात्र अख्रेर हि अफवा असल्याचे समोर आले आहे परंतु प्रत्यक्षदर्शी काही महिलांशी वार्तालाप केला असता अफवा पसरण्याच्या आधी दहा मिनिटे आधीच काही महिलांकडून नंदीने दुध वर्ज केल्याचे महिलांनी सांगितले व या सुखद घटनेचा महिलांना मोठा आनंद द्विगुणीत झाल्याचे काही महिलांच्या तोंडातून ऐकावयास मिळाले परंतु शेवटपर्यंत हिं अफवाच असल्याचे बोलले जात आहे.

सोयगाव तालुक्यात महादेवाच्या मंदिरावर नंदी दुधाचे आणि पाण्याचे सेवन करतोय अशी चक्क अफवा तालुकाभर पसरली होती त्यामुळे सोयगाव तालुक्यातील सर्वच महादेवाच्या मंदिरावर रात्री उशिरापर्यंत महिलांची गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले मात्र हि अफवा असल्याचे आणि काही महिलांना नंदीने दुध सेवन केल्याच्या आनंदाने त्यांना स्वर्ग दोन बोटे राहिला होता.आमखेडा आणि सोयगाव शहर भागात ऐनवेळी पोलीस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करावा लागला होता.वार्ता वाऱ्यासारखी पसरताच महिलांनी दुध,पाणी घेवून मंदिर परिसर गाठला व महिलांच्या हाताने नंदीच्या मूर्तीला दुध आणि पाणी देण्यात आले त्यातही काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाच्या नंदीला दुध आणि पाणी वर्ज केले त्यात काहींनी तर आमच्या हाताने नंदीने दुध पिल्याचे सांगितल्याने आणखीनच भर पडली होती.

———-अध्यात्मात श्रद्धेला मोल नाही———-

असे म्हणतात कि अध्यात्मात श्रद्धेला मोल नाही या मुळे अनेक महिलांनी श्रद्धा पोटी महादेबाच्या नंदीने दुध पिल्याचे सांगितले आहे तर दुसरीकडे यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असू शकते असेही काहींचे म्हणणे झाल्याने रात्रभर सोयगाव तालुक्यात या चर्चेने वेग घेतला होता.

———-सोयगाव तालुक्यात लाखो लिटर दुध महादेवाच्या पिंडीवर——-

नंदी दुध्सेवान करतो आय अफवेने सोयगाव तालुक्यातील महादेवाच्या मंदिरावर लाखो लिटर दुध सोडण्यात आले होते त्यामुळे हे अचानक झालेले दुध दर वाढीचे आंदोलन तर नाही न असेही चित्र दिसत होते.

सोयगाव आणि आमखेडा परिसरातील महादेवाच्या मंदिरावर अचानक महिलांची गर्दी झाल्याचे कळल्यावर मोठा बंदोबस्त घेवून मंदिर परिसरात गेलो तर त्या ठिकाणी महादेव मंदिरावरील नंदी दुध पीत असल्याची बातमी ऐकण्यात आली होती परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

– सुदाम शिरसाठ

पोलीस निरीक्षक सोयगाव

अखेर त्या बिबट्याने घेतला अखेरचा श्वास ,वनविभागावर दुखाचा डोंगर

सोयगाव,दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील(युवरे)―जरंडी शिवारात एकापाठोपाठ एक दोन बिबटे अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यानंतर पाहिल्या नर बिबट्याचा दि.२३ मृत्यू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी दि.२४ मादि बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळला होता.परंतु उपचारासाठी वेताळ वाडीच्या रोपवाटिकेत दाखल असलेल्या या मादी बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतल्याने सोयगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

जरंडी शिवारात दि.२४ पहाटे एका शेतात मादी बिबट अत्यावस्थ स्थितीत असल्याची माहिती वनविभागास मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील परिस्थितीवरून लगेचच रेस्क्यू टीम व डॉक्टरांना सूचित करण्यात आले व वनाधिकाऱ्यांनी बिबट्यास उपचाराकरिता लगेच वेताळवाडी रोपवाटिका याठिकाणी हलविले. त्याठिकाणी तीन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व सोयीसुविधाची व्यवस्था करून अत्याधुनिक पद्धतीने उपचार सुरू झाले. गेल्या 24 तासापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असताना अखेर शुक्रवारी बिबट्याने अखेरचा श्वास घेतला.

सदरील बिबट्याचे 03 डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले असून मृत्यूच्या नेमक्या कारणाच्या अभिप्रायासाठी सदरील वन्यप्राण्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळा, औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहे.सदर प्रकरणी वनविभागाने तपास सुरू केला असून यामधे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल यासंदर्भात कोणालाही कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास वनविभागास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवून त्यांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल.

———–वनविभागाने केली प्रयत्नांची पराकाष्ठा

वनविभागातील कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी 3 डॉक्टरांचे पथक व रेस्क्यू टीम यांना पाचारण करून उपचाराची साधने, औषधे, oxygen सिलेंडर व इतर सर्व आवश्यक सुविधांची उपलब्ध करून औरंगाबाद व गुजरात येथील डॉक्टरांशी संपर्क साधून वन्यप्राणी बिबट्याचे प्राण वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले..

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच स्तरावरून तपास सुरू झाला असून लवकरच या प्रकरणातील सर्व बाबीचा उलगडा होईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.या मादी बिबट्यावर डॉ. व्ही. व्ही. चव्हाण पशुधन विकास अधिकारी सोयगाव,डॉ. शाम चव्हाण पशुधन विकास अधिकारी सिल्लोड,डॉ. रोहित धुमाळ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा औरंगाबाद, वाय. व्ही. पाटील पशुधन पर्वेक्षक, ए. के. दाभाडे पशुधन पर्वेक्षक आदींच्या पथकांनी अथक प्रयत्न करून उपचार केले अखेरीस या बिबट्याने प्राण सोडला आहे.

या प्रकरणी सूर्यकांत मंकावर, उपवनसंरक्षक औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती पी.पी. पवार सहायक वन संरक्षक सिल्लोड ,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ,वनपाल ए.टी.पाटील,जी एन सपकाळ वनरक्षक नितेश मुलताने,जी.टी नागरगोजे, सुनील हिरेकर,एस. टी चेके,सुदाम राठोड,एम शिंदे,कृष्णा पाटील,रेस्क्यू टीमचे सदस्य आदीगुडे सर,श्रीकांत वाहुळे आदी पुढील तपास करत आहे.

कोट्यावधीची इमारत उद्घाटनाविना ,पंचायत समितीच्या आवारातील इमारतीचा उद्घाटना विनाच वापर सुरु

सोयगाव,दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अपूर्ण बांधकामा विना रखडलेल्या कोट्यावधी रु निधी खर्चून तयार झालेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पंचायत समितीच्या इमारतीला उद्घाटना साठी वेळच नसल्याने तीन महिन्यापासून रंगरंगोटी झालेल्या या इमारतीत लोकार्पणाशिवाय वापर सुरु झालेला असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोयगावला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विभागाकडून कोट्यावधी रु खर्चून इमारत बांधण्यात आलेली आहे या इमारातीत महिला बचत गटाच्या महिलांना महिला मॉल म्हणून व महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तू व खाद्य पदार्थ विक्रीसाठी मॉल सुरु करण्यासाठीही तरतूद करण्यात आलेली होती परंतु लोकार्पना शिवाय पंचायत समितीच्या कार्यालयाचे काही विभागांचे कामकाज या वास्तूत सुरु झालेले आहे.त्यामुळे तालुक्यातील महिलांना बचत गटाच्या वस्तू विक्रीचे प्रदर्शन करण्यासाठी अडचणी निर्माण झालेली आहे तीन महिन्यापासून या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी यांनी महिनाभरापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आढावा बैठकीची सुरुवात या इमारातीत केल्यानंतर या इमारतीला पंचायत समितीच्या कार्यालायचे स्वरूप प्राप्त झालेले आहे त्यामुळे महिला बचत गटांच्या महिलांना मात्र या इमारतीचा लाभ होत नसल्याचे उघड झाले असून या इमारतीच्या लोकार्पण साठी प्रशासनाकडे वेळच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सोयगाव नगरपंचायतीवर नामनिर्देशन सदस्यांमध्येही शिवसेनेचीच बाजी ,दोघांची बिनविरोध निवड

सोयगाव,दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील– सोयगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य नामनिर्देशित पदाच्या निवडीसाठी मंगळवारी पीठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली,दोन्ही पदांसाठी शिवसेनेचेच दोन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याने या दोन्ही पदांवर शिवसेनेनेच बाजी मारल्याने शिवसेनेचे अशोक खेडकर,लतीफ शहा यांची बिनविरोध निवड केल्याची घोषणा पीठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली.यावेळी सभागृहात शिवसेनेच्या नगराध्यक्षा आशाबी तडवी,उपनगराध्यक्षा सुरेखाबाई काळे यांचेसह पंधरा सदस्यांची उपस्थिती होती.

नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीनंतर मंगळवारी स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशित पदाच्या निवडणुकीतही शिवसेनेचे दोन्ही उमेदवार बिनविरोध आले आहे.त्यामुळे आता शिवसेनेच्या खात्यावर या दोन सदस्यांसह १७ संख्याबळ झाल्याने शिवसेना खंबीर बहुमतावर आली असून भाजपाकडे दोन संख्याबळ आहे.मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी सभेचे कामकाज पहिले.

शिवसेनेचा तिसरा विजय-

सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेचा हा सलग तिसरा विजय झालेला असून या आधी निवडणुकीत अकरा जागांवर विजय मिळवून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदही बिनविरोध हातात घेवून स्वीकृत सदस्यांमध्येही शिवसेनेनेच बाजी मारली आहे.त्यामुळे शिवसेनेचा नगरपंचायत निवडणुकीत हा सलग तिसरा विजय मानल्या जातो.

आठ सेवा संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता ,मतदार याद्या पाठविल्या

सोयगाव,दि.१४: सोयगाव तालुक्यात ३२ सेवा संस्थांपैकी आठ सेवा संस्थांच्या मतदार याद्या जिल्हा उपनिबंधक औरंगाबाद यांचेकडे पाठविण्यात आल्याने या आठ सेवा संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता निबंधक विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.अद्याप मात्र कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याची माहिती सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली आहे.

सोयगाव तालुक्यात ३२ विकास सेवा संस्थांची मुदत संपली आहे,त्यापैकी आठ सेवा संस्थांच्या मतदार याद्या औरंगाबादला पाठविण्यात आलेल्या आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात मुदत संपलेल्या आठ सेवा संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होण्याचे संकेत सहायक निबंधाक कार्यालयाकडून वर्तविण्यात येत आहे.सोयगाव तालुक्यात ३२ सेवा संस्था निवडणुकीसाठी पात्र आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात आठ सेवा संस्थांची निवडणूक कार्यक्रम येण्याची शक्यता आहे त्यामुळे सेवा संस्थांच्या निवडणुकामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरब्न तापले आहे.३२ सेवा संस्थांपैकी गोंदेगाव,बनोटी,फर्दापूर,हनुमंतखेडा,गलवाडा,निंभोरा,वाडी,उप्पलखेडा या आठ सेवा संस्थांच्या मतदार याद्या पाठविण्यात आलेली असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे या आठ सेवा संस्थांसाठी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.

ग्रामीण भागात वातावरण तापले-

ग्रामपंचायती प्रमाणेच सेवा संस्थांच्या निवडणुका होत असल्याने सेवा संस्थांच्या निवाद्नुकांनाही आत राजकीय किनार लागली आहे.त्यामुळे सेवा संस्था ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांचे गाव पातळी वरील कार्यकर्ते पुढे येत आहे.आठ सेवा संस्थांपैकी यामध्ये गोंदेगाव,बनोटी,फर्दापूर आणि हनुमंतखेडा या चार गावांचा तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा वाटा असल्याने या सेवा संस्थांच्या निवडणुकांवर राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

घोसल्याच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीत रुग्णाचा बेड कुजला ,सात वर्षापासून कुलुपबंद अवस्थेत घोसला येथील आरोग्य उपकेंद्र

घोसला,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सात वर्षापासून कोट्यावधी रु खर्चून उभारलेले घोसला ता.सोयगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील रुग्णाचा बेड चक्क कुजक्या अवस्थेत आढळून आल्याने सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे .या आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज उभारलेली टुमदार इमारत मात्र सात वर्षापासून ताबा घेण्याच्या कारणावरून धूळखात पडून असल्याने या आरोग्य उपकेंद्रात थेट रुग्णाचे बेड कुजले असतांनाही अद्यापही आरोग्य आणि तालुकाप्रशासानाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

घोसला ता.सोयगाव येथे सात वर्षापासून आरोग्य उपकेंद्रासाठी कोट्यावधी रु खर्चून इमारत उभारण्यात आली होती.मात्र उभारलेल्या या इमारतीचा ताबा अद्यापही संबंधित ठेकेदाराने आरोग्य विभागाला दिलेला नसल्याची माहिती हाती आलेली असून घोसला येथील आरोग्य उपकेंद्राचा कारभार इमारती अभावी कागदोपत्रीच सुरु असल्याची खळबळजनक माहिती हाती आलेली आहे.सात वर्षापासून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम निधीतून टुमदार इमारत उभारली आहे.परंतु शासनाच्या ताबा घेण्याच्या वादावरून या इमारतीची जागेवरच माती झाली आहे.तरीही ताबा घेण्यासाठी प्रशासन पुढे येत नसून संबंधित ठेकेदार ताबा देण्याची अडकाठी सोडत नसल्याचे कळाले आहे.घोसला गावाच्या बाजूलाच सात वर्षापासून धूळखात उभ्या असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीत वर्षभरापूर्वी आरोग्य विभागाने रुग्णाच्या सेवेसाठी बेड आणले होते परंतु ताबा दिल्याच्या कारणावरून या इमारतीत कारभारच सुरु न झाल्याने या इमारती मधील बेड अक्षरशः कुजले असून इमारतीची दुरवस्था होवून नव्याने बांधलेली इमारात वापरा विनाच मोडकळीस आल्याची स्थिती या आरोग्य उपकेंद्राची झालेली आहे.त्यामुळे या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी खर्च झालेल्या निधीवर पाणी सोडण्यात आलेले आहे.

इमारतीची दुरवस्था ,दरवाजे खिडक्या तोडल्या–

घोसला येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत धूळखात उभी असून या इमारतीच्या तावदाने,दरवाजे आणि खिडक्यांची अज्ञातांनी तोडफोड केली असून इमारत वापराच्या आधीच मातीत गेली असून नव्याने दुरुस्तीवर आलेली आहे.ठेकेदार आणि प्रशासनातील ताबा घेण्याच्या वादावर सात वर्षात तोडगाच निघालेला नसल्याने शासनाच्या या निधीला बुडत खात्याची कात्री लागलेली आहे.

आरोग्य केंद्राचे कामकाज कागदोपत्रीच–

घोसला आरोग्य उपकेंद्राचे कामकाज मात्र इमारत उभी राहिल्यापासून वास्तू ताब्यात न मिळाल्याने अखेरीस या उपकेंद्राचे कामकाज कागदोपत्रीच दाखविण्यात आलेले आहे.त्यामुळे रुग्णांना रुग्णसेवा तर दूरच परंतु या इमारतीत कधीही रुग्ण व आरोग्य कर्मचारी आढळून आलेले नाही असे ग्रामस्थ सांगतात त्यामुळे घोसला आरोग्य उपकेंद्रावर होणारा आरोग्याचा खर्च जातो कुठे असाही प्रश्न पडला आहे.

जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या १५१ ग्रामपंचायत सदस्यांना अंतिम नोटीसा ,सादर न केल्यास पद जाणार

सोयगाव,दि.०९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जानेवारी २०२१ मध्ये सोयगाव तालुक्यात झालेल्या ४० ग्रामपंचायतींच्या १५१ ग्राम पंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडणूक विभागाने अंतिम नोटीसा पाठविलेल्या आहे या नोटीसा मिळाल्याच्या मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात या सदस्यांची सुनावणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

सोयगाव तालुक्यात जानेवारी महिन्यात झालेल्या चाळीस ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून ३४ उमेदवार निवडून आलेले आहे त्यापैकी १० उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केलेले असून अनुसूचित जमातीच्या ५६ पैकी दोघांनी तर नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून ८९ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १६ सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले आहे त्यामुळे तब्बल १५१ ग्रामपंचायत सदस्यांवर आता जात वैधता सादर नसल्याने गंडांतर आलेले असून नोटीस मिळाल्याच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना सुनावणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.चाळीस ग्राम्पान्चायाती साठी सोयगाव तालुक्यात ३६० ग्राम पंचायत सदस्य निवडून आलेले आहे त्यापैकी १८१ ग्राम पंचायत सदस्य सर्वसाधारण गटातून निवडून आलेले आहे.

अपात्रतेची कारवाई होणार-

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्राम पंचायत सदस्यांवर मुदतीच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यास आता थेट अपात्रतेची कारवाई होणार आहे.त्यामुळे १५१ ग्राम पंचायत सदस्यांचे भवितव्य टांगणीवर आहे.

सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या आशाबी तडवी,उप नगराध्यक्ष पदी सुरेखाताई प्रभाकर काळे बिनविरोध

सोयगाव,दि.०८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखाबाई काळे यांचे दोघांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या आशाबी तडवी तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच सुरेखाबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्ष आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा बाई काळे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली .

अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा सत्कार केला.

पीठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित निवड सभेच्या प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी यापूर्वीच दि.१ फेब्रुवारीला शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा एकमेव अर्ज आला होता.त्यानंतर मंगळवारी उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्याच सुरेखाबाई काळे यांचा एकमेव अर्ज आला.यावर सूचक हर्शल काळे,तर अनुमोदक गजानन कुडके होते.त्यानंतर अर्जच न आल्याने सुरेखाबाई काळे यांची पीठासन अधिकारी संजीव मोरे यांनी उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड केल्याची घोषणा केली नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष पदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा एकही अर्ज न आल्याने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष पदी सुरेखाबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.राज्यभर नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्तेसह नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदही एकहाती घेतल्याने शिवसेनेचा हा दुसरा मोठा विजय समजल्या जातो.यावेळी सभागृहात शिवसेनेचे पंधरा नगरसेवक उपस्थित होते,परंतु सदस्यांमधून मतदान करण्याची वेळ न आल्याने दोन्ही पदाची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती पीठासन अधिकारी संजीव मोरे यांनी दिली.यावेळी तहसीलदार रमेश जसवंत,राहुल सूर्यवंशी,आदींनी प्रक्रिया पार पडली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड,तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे, तालुका संघटक दिलीप मचे, शहरप्रमुख संतोष बोडखे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील पाटील, शहरप्रमुख अमोल मापारी,तालुकाप्रमुख धृपताबाई सोनवणे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा जाधव,आदींची उपस्थिती होती.

सुरेखाबाई काळे यांची विजयाची हॅड्रीक-

शिवसेनेच्या सुरेखाबाई काळे यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून राजकीय विजयाची मालिकाच सुरु झालेली असून नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदापर्यंत हा त्यांचा तिसरा विजय असल्याने त्यांनी चार महिन्यातच राजकीय हॅड्रीक मारली आहे.

आई फाउंडेशन विश्वासआधाराचा, जिव्हाळा ग्रामविकस-शिक्षण प्रसारक मंडळ व माऊली ऑप्टिकल्स, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर संपन्न

औरंगाबाद दि.३०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― वडगाव(तिग्जी) सोयगाव जि संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये एकूण १०९ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात १० रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लवकरचं लायन्स क्लबद्वारे नेण्यात येणार आहे.शिबिराला गावाचा प्रतिसादही चांगला लाभला असून या प्रसंगी गावच्या महिला सरपंच पती आ.श्री.गोविंदा घोडे, उपसरपंच श्री.रावसाहेब सोमवंशी,पो.पाटील श्री.ललीत मोरे,तंटामुक्त अध्यक्ष श्री.नामदेव मोरे, शिबिर समन्वयक चि.जगदिश सोनवणे(आई फाऊंडेशन विश्वास आधाराचा), संजय पवार (जिव्हाळा ग्राम विकास शिक्षण प्रसारक मंडळ ह.खेडा) डॉ.राहूल पवार माऊलीऑप्टिकल्स,चाळीसगाव डॉ.ज्ञानेश्वर पवार माऊली ऑप्टिकल्स, चाळीसगाव, प्रविण जाधव,तुषार जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.