आरोग्य यंत्रणा सुसज्ज, प्रशासकीय यंत्रणांतही समन्वय
औरंगाबाद दि.3:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा खंबीर आहे. एकमेकांच्या समन्वयातून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या आजाराचा जिल्ह्यातील फैलाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन स्वयंशिस्तीव्दारे कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी पुढे यावे. शिवाय कोणत्याही स्वरुपाचा आजार अंगावर न काढता तत्काळ आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जनतेला केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात औरंगाबाद जिल्ह्यात महसूल, मनपा, पोलिस तसेच आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अप्पर विभागीय आयुक्त डॉ.विजयकुमार फड, म्हाडाचे मुख्याधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, औषध वैद्यक शास्त्रविभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य आदींची उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले, मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद शहर, वाळूज परिसरावर माझे विशेष बारकाईने लक्ष असून सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्य करत आहेत. नागरिकांनी या कोरोना महामारीच्या परिसरात घाबरुन न जाता शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यावर भर द्यावा. प्रशासकीय यंत्रणा परस्पर समन्वयातून अधिक सक्षमपणे कार्य करत आहे. अनेक भागात प्रत्यक्ष जाऊन मी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोना आजार गंभीर असला तरी नागरिकांनी लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात व मुबलक अशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. जवळपास तीन हजार रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करता येईल, एवढी औरंगाबाद मनपाने तयारी केलेली आहे. कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व यंत्रणांना निर्देशित केलेले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी कोविड योध्दे मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा, उपचार उपलब्ध करुन देण्यावर भर देत आहेत. जिल्ह्यातील बरेचसे कोरोना रुग्ण बरे होऊन घरीदेखील परतलेले आहेत. मात्र, अजूनही काही लोक कोणत्याही प्रकारची खबरदारी घेत नसल्याने इतरांना त्याचा मोठ्याप्रमाणात धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून इतरांना जागृत करण्यावर भर द्यायला हवा. मास्कचा वापर, शारीरिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे आदी सवयी नागरिकांनी स्वयंशिस्तीने लावून घेणे आवश्यक असल्याचेही श्री. केंद्रेकर म्हणाले.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुरुवातीलाच प्रशासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, अधिकारी, कर्मचारी यांची कामगिरी, विविध विभागातील असलेला समन्वय आदी बाबी सांगितल्या. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये, यासाठी सर्वच यंत्रणा समन्वयातून मोठ्याप्रमाणात कार्य करत आहेत. शिवाय आरोग्य यंत्रणांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यावर प्रशासनाचा भर असून कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेत असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी देखील औरंगाबाद शहरात करण्यात आलेल्या सोयी सुविधा, नागरिकांचा सहभाग याबाबत माहिती दिली. तसेच महानगरपालिकेत 24 तास सुरु करण्यात आलेली वॉर रुम, शहरात मोठ्याप्रमाणात करण्यात येत असलेल्या चाचण्या याबाबत माहिती दिली. आगामी काळात या चाचण्या अधिक वाढविण्यात येतील. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु सद्यस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास ‘कर्फ्यू’ लावण्याशिवाय पर्याय ठरणार नसल्याचेही श्री. पांडेय म्हणाले.
पोलिस आयुक्त श्री. प्रसाद यांनीही शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वत: हून पुढाकार घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
कोरोनाचा लढा लढताना करावा लागत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपस्थित अधिका-यांनीदेखील प्रातिनिधिक स्वरुपात प्रशासकीय कामकाजाबाबत यावेळी माध्यमांना माहिती दिली. यामध्ये उपायुक्त श्रीमती ठाकूर यांनी कोरोना महामारी आम्हा सर्वांसाठीच नवे अव्हान होते. दररोज कामकाजात नवनवीन आव्हाने येत राहिली. सर्वच क्षेत्रात कोरोना आजाराची भिती पसरली होती. महसूल यंत्रणेपासून सर्वच विभागात ते सर्व सामान्य माणसापर्यंत या आजाराची भिती होती. परंतु जिल्ह्यातील आरोग्य विभागाने पहिल्या दिवसापासून ते आजतागायत कठोर परिश्रमातून अनेक रुग्ण बरे केले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांच्या मनातील भिती दूर झाली. तरीही माध्यमांनी ही सकारात्मक बाजू जनतेपुढे आणून जनतेतील भिती दूर करण्याचे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले.
अप्पर विभागीय आयुक्त डॉ. फड यांनीही त्यांना आलेल्या शंभर दिवसातील अनुभव सांगतांना नागरिकांनी सद्यकाळात अधिक सजग राहून स्वत:ची खबरदारी घ्यावी. मला काहीच होत नाही., अशा मानसिकतेत राहू नये. स्वत:ची काळजी घेतानाच इतरांची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन डॉ. फड यांनी केले. तसेच अन्नधान्याची ज्या गरजू नागरिकांना आवश्यकता आहे, अशा नागरिकांना स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन आवश्यक अन्नधान्याच्या 15 हजार कीटचे वाटपही प्रशासनाने केले असल्याचे डॉ. फड म्हणाले. म्हाडाचे मुख्याधिकारी श्री. शिंदे यांनीही मनपाच्या MHMH ॲपची उपयुक्तता यावेळी सांगितली. तसेच शहरात एक लाखाहून अधिक व्यक्तींचा डेटा या ॲपच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेला आहे, असे सांगितले. तर श्रीमती सूत्रावे यांनी संजय नगर भागात फैलावलेला कोरोनाचा प्रसार येथील नागरिकांच्या सहकार्यातून व सहभागातून आटोक्यात आला असल्याचे सांगितले.
उपजिल्हाधिकारी श्रीमती मैत्रेवार यांनीही महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य यंत्रणा, विभागीय आयुक्त आणि माध्यमे यातील समन्वयाची जबाबदारी सांभाळताना आलेले अनुभव यावेळी सांगितले. टीमवर्क मधून मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा यशस्वी झाल्याचे त्या म्हणाल्या.
आरोग्य यंत्रणा सक्षम: डॉ. येळीकर
औरंगाबादमध्ये मार्चच्या मध्यात कोरोना दाखल झाला. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य यंत्रणेतील कोविड योध्दे अथक परिश्रमातून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. घाटीमध्ये औषध वैद्यक विभागात 208 खाटांची तर सुपर स्पेशालिटी इमारतीत 248 खाटांची सुसज्ज अशा प्रमाणात सर्व सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तसेच घाटीत लवकरच प्लाज्मा थेरपीही सुरु होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या डॉ. भट्टाचार्य यांनीही रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे असे आवाहन यावेळी केले.