पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येईल― मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विषाणू प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण

रत्नागिरी, दि.९:आठवडा विशेष टीम― रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे. यापुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 कोटी 7 लाख रुपये खर्चाने विषाणू प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे, याचे उद्घाटन आज झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे ते म्हणाले.

तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजूरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या 14 दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे व उपकरणे यासाठी 80 लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी 15 लाखांचा खर्च झाला. अतिशय गतिमान पद्धतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले.

लॉकडाऊन सुरु झाला त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु आहे असे सांगून ते म्हणाले की कोव्हीड-१९ चे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात केवळ 2 प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या 85 झाली आहे. संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत.

नागरिकांना तपासणीसाठी फार दूर जावे लागणार नाही यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे यापुढील काम सरकारचे असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

अनेक चाचण्या शक्य
या ठिकाणी प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने कोव्हीड नंतर विषाणूने होणाऱ्या एच.आय.व्ही, जनेटिक ओळख आदि सोबत कर्करोगाच्या चाचण्या देखील शक्य होणार आहेत. यासाठी ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना आणि रत्नागिरीला एकाच दिवशी मंजूरी प्राप्त झाली आणि रत्नागिरीची प्रयोगशाळा विक्रमी वेळेत सुरु झाली याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधानसचिव प्रदीप व्यास मुंबईतून तर सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि प्रसाद लाड हे रत्नागिरीतून व आमदार भास्कर जाधव चिपळूणमधून या कार्यक्रमात सहभागी झाले.

प्रारंभी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत माहिती दिली. याप्रसंगी रिमेाटने उद्घाटन झाल्यावर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत तयार करण्यात आलेला एक वृत्तपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे फेसबुक वर थेट प्रसारणही करण्यात आले.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी आदिंची या कार्यक्रमास उपस्थिती होती. कान्हुराज बगाटे यांनी आभार प्रदर्शन केले.

आंबडवेत डॉ. आंबेडकर स्मारकाने वाचवले अनेकाना वादळात

रत्नागिरी दि. 08:आठवडा विशेष टीम― गेल्या 80 वर्षात असं वादळ बघितलं नाही. सारं होत्याचं नव्हतं झालं यात. हे स्मारक इथं नसतं तर अनेकांचे जीव धोक्यात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकानं आमचे जीव वाचवले, आंबडवे चे भागुराम सपकाळ सांगत होते.
निसर्ग वादळ अतिशय मोठं होतं. त्याच्या तीव्रतेचा पहिला फटका कोकण किनारपट्टीला बसला, याच भागात मंडणगड तालुक्यात उंचावरील डोंगर वस्ती म्हणजे आंबडवे हे गाव . सर्वांना परिचयाचे आहे ते संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव म्हणून.
डॉ. आंबेडकर यांचं शिक्षण झालेल्या या गावात एक स्मारक आता उभरण्यात आलयं. डोंगरमाथ्यावर रस्त्याच्या एका बाजूने मुलांचे वस्तीगृह ओलांडल्यावर गावाची सुरुवात होते. पुढे डोंगर उतारावर असणारं हे छोटे दुमदार गाव. गावात उरल्यात फक्त निसर्गाने दिलेल्या वादळखुणा.
जिल्ह्याचे पालकमंत्री ऍ़ड. अनिल परब यांनी या गावाला भेट दिली. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर स्मारकात थांबलेल्या काही जणांशी संवाद साधला.
भागुराम सकपाळ यांनी नेमकेपणानं काय घडलं ते कथन केलं. माझे हे गाव, नोकरीसाठी मुंबईत होतो, निवृत्ती पासून गावातच आहे. गेल्या 80 वर्षात असं वादळ प्रथमच आलं सांगताना ते म्हणाले की हे रात्री घडलं असतं तर अनेक जणांचे जीव गेले असते आणि या स्मारकात सर्व गावकऱ्यांनी आसरा घेतल्याने सर्व बचावल्याचे ते ते म्हणाले.
गावात असणाऱ्या प्रत्येक घरावरील छत आता शिल्लक नाही . काहींच्या घरावर पत्रे होते तर काहींच्या घरावर कौल. आता गावभर त्याचे तुकडे विखुरलेले आहेत. साधारण 200 मीटर वर असणारी जिल्हा परिषद शाळा देखील पत्रे उडालेल्या स्थितीत आहे.
पालकमंत्री ऍ़ड. परब यांनी सर्वांशी संवाद साधला. लवकरात लवकर मदत मिळेल असा शब्द दिला. तातडीने लागणाऱ्या वस्तूंमध्ये घरावर किमान प्लॅस्टिक अच्छादन, कंदिलांसाठी रॉकेल लागणार आहे. कारण प्रचंड गतीच्या निसर्गाने विविध यंत्रणा पूर्णपणे उध्वस्त केलीय. वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागणार आहे.
वादळानंतर गावची अवस्था आणि त्यावर शिल्लक वादळखुणांमुळे काय घडलं याची कल्पना येते. अशा स्थितीत कोरोडांना आयुष्याची दिशा दाखविणाऱ्या व आयुष्य बदलणाऱ्या महामानवाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्मारकाने लोकांचे जीव वाचवले हेच खरं. याच भावनेतून स्मारकातील प्रतिमांना वंदन करून पुढच्या गावाकडे आम्ही निघालो.