पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

रायगड: नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यास कटिबद्ध –आदिती तटकरे

अलिबाग,जि.रायगड,दि.६:आठवडा विशेष टीम―

नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. आज माणगाव तालुक्यातील माणगाव, गोरेगाव, मोर्बा, सुर्ले आदिवासीवाडी, नागाव, वडवली, पुरार, वणी, नांदवी, इंदापूर आदि नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी करून बाधित नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाले असून वीजपुरवठाही खंडीत झालेला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करून सर्वांना तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत मिळेल. ज्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे, त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे.

विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू असून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आश्वासक वक्तव्य पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले आहे.

रायगड: पडलेल्या झाडांचे आणि बंद रस्त्यांचे फोटो अन् व्हिडिओ पाठविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अलिबाग, जि.रायगड, दि.६:आठवडा विशेष टीम― निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड असे नुकसान झाले आहे. विशेषत: अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी झाडे पडून जेथील रस्ते बंद झाले आहेत, याची माहिती प्रशासनाला तातडीने मिळावी यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हीडिओ 8275152363 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावेत. तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी.

नागरिकांनी वरील व्हॉटस्अप क्रमांकावर पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदविल्यानंतर प्रशासनातील संबंधित यंत्रणेला नागरिकाने नोंदविलेली ती तक्रार तात्काळ कळविण्यात येईल व झाड पडल्यामुळे बंद झालेला संबंधित रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात येईल. तरी रायगडकरांनी पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हीडिओ 8275152363 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावेत. तसेच 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये तातडीची मदत ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

अलिबाग दि.५:आठवडा विशेष टीम― निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

तत्पूर्वी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे मुंबईहून बोटीने मांडवा येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी थळ येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, निसर्ग दिवसेंदिवस आपले रंग दाखवित असताना यंत्रणेनेही आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी उत्तम नियोजन ही काळाची गरज आहे. रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी या संकटाचा निश्चितच उत्तम मुकाबला केला. त्यामुळे कमीत कमी जीवितहानी झाली, त्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन करताना ते पुढे म्हणाले की, पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र नुकसान झालेल्या लोकांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत, व्हिडिओ काढून ठेवावेत. पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे आधी आपले घर आवरुन घ्यावे. नुकसानीचे काढलेले फोटो व व्हिडिओ पंचनामाच्या कार्यवाहीत ग्राह्य धरण्यात येतील. सर्वात आधी घर व परिसराची साफसफाई करून घ्यावी लागणार आहे. जेणेकरून पावसाच्या या दिवसात अस्वच्छतेमुळे परिसरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्वात जास्त नुकसान विजेच्या खाबांचे झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यासाठी शासन स्तरावरून मदत निश्चित केली जाईल. याबरोबरच ज्या नागरिकांचा या वादळामुळे अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासन त्यांच्या अन्नधान्याचा, जेवणाचा प्रश्न निश्चितच सोडविणार. जनतेच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे आहे.

बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरण केले.

यावेळी अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे, वय वर्ष 58 ही व्यक्ती चक्रीवादळामुळे वीजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.