ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे – साखर संघ दरम्यान बैठक
कामगारांच्या मजूरीत वाढ करण्यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत झाली चर्चा !
मुंबई दि.१०:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना मी न्याय मिळवून देणारच आहे, तोपर्यंत कोयता म्यान ठेवावा. माझ्यासाठी ऊसतोड मजूर हा जिव्हाळ्याचा विषय आहे, राजकारणाचा नाही असे स्पष्ट करत
कामगारांना वेठीस धरून राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ऊसतोड कामगार लवादाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या दरम्यान आज साखर भवन येथे एक बैठक पार पडली. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत न्याय्य वाढ करण्यासह अन्य महत्त्वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे आबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, केशवराव आंधळे, श्रीमंत जायभाये व विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जो लवाद आहे, त्यावर मी आणि कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून ना. जयंत पाटील आहेत. या विषयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करू. कामगारांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तोपर्यंत कोयते म्यान ठेवा. मजूरांचा विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे, राजकारणाचा नाही. कामगारांचे मुद्दे मांडताना ते आक्रमकपणे मांडले जावेत, आक्रस्ताळेपणे नाही. तथापि, मजूरांना वेठीस धरून कुणी राजकीय हस्तक्षेप करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असे सांगून ऊसतोड कामगार महामंडळाचा विषय जसा हवा तसा हाताळता आला नाही याबद्दल खंत वाटते असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पंकजाताईंनी केले सुशीला मोराळे यांचे कौतुक !
या बैठकीला बीडमधून सुशीलाताई मोराळे हया एकट्या महिला उपस्थित होत्या. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलतांना त्यांच्या उपस्थितीची दखल घेऊन कौतुक केले.
या मागण्यांवर झाली चर्चा
—————————
राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनाकडून प्राप्त झालेल्या निवेदनावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ करावी यासह ऊस वाहतूक दरात वाढ करणे,मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करणे,ऊसतोडणी मजूरांना पाच लाखाचे विमा कवच दयावे व त्याचा विमा हप्ता ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून किंवा कामगार खात्यामार्फत भरणा करावा, यात कोविडचा ही समावेश व्हावा, ऊसतोड मजूरांच्या बैलांसाठी कारखाना परिसरात पशुवैदयकीय दवाखान्याची व्यवस्था करावी, कारखान्यावर स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था करणे, कारखाना परिसरात पक्के घरकुल व शौचालये पुरविणे, मजूरांच्या मुलांकरिता प्रत्येक तालुक्यात निवासी शाळा व वस्तिगृहाची व्यवस्था करणे, मजूरांसाठी उन्नती योजनेची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करणे, मजूरांना ६० वर्षे वयानंतर पेन्शन योजना सुरु करणे, ऊसतोड कामगारांच्या मुलींचे विवाह लहान वयात होतात,हे आढळून आलेले आहे, त्यामुळे त्या मुलींचे लग्न वय वर्षे 18 झाल्यानंतर व्हावे त्याला शासनाने कन्यादान अशी खास योजना करावी आणि ऊसतोड कामगारांचा दर तीन वर्षांनी करार करावा अशा मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.