लिंबागणेश दि.१८:आठवडा विशेष टीम―
अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रूग्णालय बीड हे 20 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रीय सहभागी असून स्व.विमलताई मुंदडा आरोग्यमंत्री असताना ते विशेष अधिकारी म्हणून त्यांचे काम पाहत होते. त्यादरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली होती. त्यानंतर त्यांनी ना.पंकजाताई मुंडे, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड यांच्या कार्यकाळात केज उप रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक कार्यकारी पदी असताना शासनाची फसवणूक करून मुख्य सचिव यांना त्यांच्यावरील अवैध गर्भपात प्रकरणी उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायालयात आरोप कायम केलेले आहेत, हि गोष्ट लपवून पंकजाताई मुंडे यांची दिशाभुल करून बीड जिल्हा शल्यचिकित्सक पद मिळवलेले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी पोलीस उपअधिक्षक ,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा बीड यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय, औरंगाबाद यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना व आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांनी दि.27/02/2019 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार करताना डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रूग्णालय बीड हे राजकारणात सक्रीय, अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी, फौजदारी खटला, त्यांना अटक झाली असून त्यांच्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये आरोप कायम स्वरूप प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच शासकीय पदावर असताना केज तालुक्यातील तांबवा जि.प.गटातून निवडणूक लढवलेली होती. तसेच सत्ताधारी पक्षाचे शासकीय सेवेत असताना सक्रीय काम करत असून त्यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येवून त्यांच्यावर प्रशासकीय व फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार धनंजय मुंडे यांनी देखील केली होती.
बीड जिल्हा आरोग्य विभागाला मिळालेल्या 33 कोटी रूपयांच्या खरेदी व गुंतवणूक प्रकरणी मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून याप्रकरणी प्रमुख संशयित डॉ.अशोक थोरात असून त्यांनी या निधीचा स्वतः वर कार्यवाही होवू नये तसेच उपसंचालक पद मिळावे यासाठी गैर-व्यवहार करण्यात आल्याचा आरोग्य विभागातील तज्ञांचा संशय असून संबंधीत प्रकरणी डॉ.अशोक थोरात यांनी मोठ्या प्रमाणावर कमाई केली असून ती त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सुध्दा केल्याचा संशय असून याप्रकरणी डॉ.अशोक थोरात व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधीत दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किसान सभा बीड तालुकाध्यक्ष तथा दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे बीड तालुकाध्यक्ष तसेच दक्ष नागरिक जनकल्याण समिती बीड चे सदस्य असलेले डॉ.गणेश ढवळे यांनी दिला आहे.