शिरूर मतदारसंघात चार सभांचा झंझावात
शिरूर दि.२४: डॉ. अमोल कोल्हे यांचा इमान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराजांशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड जातीतील लोकांना घेऊन केली आहे. डॉ. अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की डॉ. कोल्हे शिवरायांचे भक्त आहेत अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार आढळराव पाटील यांना सुनावले.
शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी आज तळेगाव ढमढेरे,मांढवगण खराटा ( तालुका शिरूर ) येथे जाहीर सभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. डॉ.कोल्हे आणि माझी मैत्री ही जुनी आहे. कोल्हे यांनी प्रसंगी घरदार विकून छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे यांचा इतिहास मांडला. मला अभिमान आहे की मी या सच्चा मावळ्यासाठी तुमचे आशीर्वाद मागतोय असे मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची या मतदारसंघात 2 दिवसांपूर्वी सभा झाली. त्याला गर्दी किती? तर जेमतेम. तीही २०० रुपये देऊन आणलेली.यावरून हवेचा रोख ओळखा असे मुंडे म्हणाले.डॉ.अमोल कोल्हे हा छत्रपतींचा मावळा आहे. या मावळ्याच्या गर्जनेने विरोधकांची पळता भुई थोडी झाली आहे. दिल्ली हदरवून सोडण्यासाठी या मावळ्याला लोकसभेत प्रचंड बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अशोकबापू पवार, दिलीपराव ढमढेरे, पोपटराव गावडे, प्रदीपदादा कंद आदीसह पदाधिकारी उपस्थीत होते.