होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा कीट वाटणार की ग्रामपंचायतची भरती करणार ? ऊसतोड मजुरांचा सवाल ! – डॉ ढवळे

पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची संघटीत गुन्हेगारी मोडीत काढा

जिल्हाधिकारी यांचा वचक राहीला नाही, १४ दिवस झाले सरपंच, ग्रामसेवक फिरकलेच नाहीत ―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश दि.०७:आठवडा विशेष टीमबीड तालुक्यातील मौजे बेलगांव येथिल साखर कारखान्यावरून गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करुन देणे सोडाच आज दि.७/०५/२०२० रोजी वार गुरुवार दुपारी १२ वाजेपर्यंत कुणीही भेटायला आले नाहीत, आठवड्यापूर्वी पालकमंत्री मुंडे यांनी घोषणा केलेले मोफत कीराणा कीट ८ दिवस झाले तरी आमच्यापर्यंत पोहोचले नाही ,होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा किट वाटणार आहात कि ग्रांमपंचायतची भरती करणार असा संतप्त सवाल ऊसतोड मजुरांनी केला आहे.

विशाल काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

मो.नं.९३५९२१११८६

आम्ही जवाहर कारखान्यावरुन येऊन १४ दिवस झाले, सरपंच, ग्रामसेवक भेटलेच नाहीत, ग्रां.पं.शिपाई बापु थोरात यांनी सांगितले सरपंचांनी गावठाणा बाहेर रहायचे सांगितले आहे. आज १४ दिवस झाले आम्हाला सरपंच, ग्रामसेवक भेटायला आलेच नाहीत. तलाठी दोन वेळेस आले पण इथं लाईट, पिण्याचे पाणी काहीच सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही म्हणाले तुमचं तुम्ही बघा.

सविता काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

आम्हाला पिण्याच्या पाण्याची, लाईटची कसलीही सोय केली नाही, १४ दिवस झाले २ कीलोमीटर डोंगरातुन तलावाखालच्या झ-यातुन पाणी आणावे लागते ,ऊन्हातान्हात लहान लेकरांचे हाल होत आहेत, १४ दिवसात धान्य दिले नाही, लाईटची सोय नसल्याने विंचू काट्याची भिती वाटते. पालकमंत्री मुंडे साहेबांनी मोफत किराणा किट देऊ म्हणलेले आठवड उलटुन गेला.अजुन काहीच दिले नाही. आम्हाला आमच्या गावातील घरी जाण्याची परवानगी द्यावी.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश

पालकमंत्री मुंडे साहेबांनी ऊसतोड मजुरांना मोफत किराणा किट देण्याची घोषणा होऊन आज ८ दिवस झाले, दि.५ तारखेला अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना लेखी आदेश ५ तारखेला दिले आहेत. परंतु सरपंच, ग्रामसेवक, आणि तलाठी हे त्यांच्या संघटनेच्या जोरावर संघटीत गुन्हेगारी करत आहेत ती पालकमंत्र्यांनी मोडीत काढावी.
दि. २३/०४/२०२० रोजी जिल्हाधिकारी बीड तथा अध्यक्ष राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण यांनी ग्रामसेवक, तलाठी यांनी मुख्यालयी रहावे अन्यथा राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचा कनिष्ठ स्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांना धाक राहीला नाही त्यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केली जाते.त्याबद्दल राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.आणि २ दिवसांच्या आत मोफत किराणा किट वाटप करण्यात यावे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य , कार्यकारीणी आधिकारी , जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अन्नपुरवठा व पुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


राज्यातील ९० टक्के ऊसतोड मजुर परतीच्या वाटेवर ; बीड जिल्ह्यात १८ हजार ऊसतोड मजूर आतापर्यंत गावी पोहचले !

उर्वरित मजूर येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोचतील – धनंजय मुंडे

बीड दि.२२:आठवडा विशेष टीम― राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळवून दिली. आज (दि.२२) सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारी नुसार, राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास ९०% मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले असून, बीड जिल्ह्यातील १८ हजार मजूर आपापल्या गावी पोचले आहेत.

उर्वरित सर्व ऊसतोड मजूर बांधव येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोचतील अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

बीड जिल्हा सीमा प्रवेशाच्या चेकपोस्टवर अधिकृत नोंद झालेले १८ हजार ऊसतोड मजूर आपापल्या गावी परतले असून उदयगिरी शुगर्स बामणी जि. सांगली येथून परळीत आलेल्या १८ पैकी दोन व्यक्तींना ताप व घशात खवखव असे लक्षण आढळून आले. त्यांना तात्काळ आंबेजोगाई येथे कोरोना चाचणी (स्वॅब टेस्ट) साठी पाठवले असून उर्वरित व्यक्तींना परळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

राज्यात विभागनिहाय पश्चिम महाराष्ट्र १ लाख २४ हजार, नागपूर विभाग ५ हजार, तर मराठवाड्यात जवळपास दोन हजार असे एकूण १ लाख ३१ हजार ऊसतोड मजूर अडकलेले असून, काहीजण परतीच्या प्रवासात अडकलेले होते. त्यांपैकी आतापर्यंत १८,०६७ मजुर गावी परतले आहेत, त्यांना धान्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक प्रशासनाला दिल्या असून, स्थानिक प्रशासनासह ना. मुंडे स्वतः व त्यांचे कार्यालय तसेच पदाधिकारी या बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान बाहेरून परतलेल्या ऊसतोड मजुरांना गावकरी व प्रशासनातील स्थानिक कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी. ऊसतोड मजूर बांधवांनी आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती व लहान मुले यांच्याशी जवळचा संपर्क टाळावा, तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

ऊसतोड कामगारांना घरी पोचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असतांना झारीतले शुक्राचार्य कोण? – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे आक्रमक

मुंबई दि. १५:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोचविण्याच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत. कामगारांना घरी पोचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असतांना विलंब होत असल्याने झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल करत कामगारांचा संयम सुटू देऊ नका, लवकर निर्णय घ्या असे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे, या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत, हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली आहे, परंतु निर्णयास विलंब होत असल्याने पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी ‘ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या, त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या.ते एका ठिकाणी पंधरा दिवस आहेत. जे ठणठणीत आहेत ते ही आजारी पडतील पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहेत. आज एक दोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जवाबदार ?? रॅडम टेस्ट करा हवं तर पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा, ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील ..त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत. एकही साधा शिंकला नाही मग काय चिंता आहे?..त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य??.आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा, हा विषय राज्याच्या अधिकारात आहे.’ असे म्हटले आहे.