पंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड ; जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मधील समावेशाने राष्ट्रीय राजकारणातही पाडणार छाप !

मुंबई दि.२७:ऋषिकेश विघ्ने― भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मध्ये पंकजाताई मुंडे यांचा समावेश झाला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समावेशाने आता राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे नेतृत्व अधिक झळाळून निघणार आहे. दरम्यान, या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष नड्डा यांचे आभार मानले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या नव्या कार्यकारिणीत पंकजाताई मुंडे यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पंकजाताई मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील एक धडाडीच्या व आक्रमक नेत्या म्हणून पाहिले जाते. उत्कृष्ट वक्त्या, संघटन कौशल्य व काम करण्याची हातोटी या गुणांमुळे समाजातील सर्व जाती धर्मात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सन २०१३ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. या काळात तत्कालिन काॅग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात त्यांनी काढलेली ‘एल्गार’ यात्रा चांगलीच गाजली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ मध्ये ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि याचाच परिणाम म्हणून २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली. दोन वेळा आमदार राहिलेल्या पंकजाताई मुंडे यांनी भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले. ग्रामविकास, जलसंधारण, महिला बालविकास व रोजगार हमी योजना आदी खात्याच्या माध्यमातून लोक कल्याणाच्या अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या. केवळ राजकारणातच नाही तर सामाजिक कार्यातही तितक्याच धडाडीने काम करणा-या पंकजाताई मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्यांच्या घटना विरोधात मोठी जनजागृती केली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचित पिडित घटकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत तसेच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून गोरगरिबांचे संसार उभा केले.

आता पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिल्याने इथेही त्यांच्या नेतृत्वाची चूणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. पंकजाताई मुंडे यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्रातील तमाम भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून बीड जिल्हयात परळीसह ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

नेतृत्वाचे मानले आभार

या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, सह सरचिटणीस व्हि. सतीश यांचे आभार मानले आहेत.


#मोठी बातमी…पंकजा मुंडेंची केंद्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार ?

दिल्ली/वृत्तसंस्था:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असल्याचे सूत्रांकडून समजते. दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे ,विनोद तावडे या दिग्गज नेत्यांसह शेलार व निलंगेकर यांना देखील स्थान मिळण्याचं निश्चित झाले आहे. याबाबत सूत्रांकडून विशेष माहिती मिळत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार असल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान , एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा गोपिनाथ मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

गोपिनाथ मुंडेंची कन्या प्रितमताई मुंडे यांची महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष पदी निवड

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची कन्या बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेणाऱ्या स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्येवर ही प्रमुख जबाबदारी दिल्यामुळे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.सोशल मीडिया सह इतर माध्यमांवर फक्त डॉ प्रितम मुंडे यांचेच नाव चर्चेत आले आहे.

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या ६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज गंगाखेड येथे रक्तदान शिबीर संपन्न

गंगाखेड दि.०३:आठवडा विशेष टीमसध्या कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासकीय रक्तपेढ्याकडे रक्तसाठा कमी झाला असुन मा.पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान श्रेष्ठदान यांचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि सुरक्षित पद्धतीने रक्तदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून कोणत्याही प्रकारची गर्दी होऊन न देण्याची काळजी घेऊन, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आले आहे.

आज नोंदणीकृत 82 व्यक्तींनी रक्तदान करून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना अभिवादन केले.वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन रक्तदान केल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार जनसेवक रामप्रभु ग्यानदेवराव मुंढे यांनी मानले आहेत.

गंगाखेड तालुक्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांना व क्वारटाईन केलेल्या नागरिकांना ३० ब्लॅंकेट – (चादर) व ४० बकेट हे साहित्य S.D.M.सुधीर पाटील व तहसीलदार सौरभ कंकाळ यांच्या कडे देण्यात आले आहेत.लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संघर्षाच्या अग्नितूनही बाहेर निघणार ; फक्त तुमची साथ पाहिजे–पंकजाताई मुंडे यांचा फेसबुकवरून ‘लाईव्ह’ संवाद

मुंबई दि.०३:आठवडा विशेष टीम― मी खचले नाही. स्वाभिमानी असणं हे सन्मानाचं लक्षण आहे. पराक्रम, परिश्रम, सत्य आणि संघर्ष ही शस्त्रे घेऊन भविष्याची वाटचाल करणार आहे, मला फक्त तुमची साथ हवी आहे, संघर्षाच्या अग्नितूनही आपण बाहेर निघू आणि अत्यंत आत्मविश्‍वासाने वाटचाल करू असे सांगत तुम्ही राहणार ना माझ्यासोबत ? अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला. वंचितांना न्याय देण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न मला पूर्ण करायचयं, मी उतणार नाही, मातणार नाही असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून विविध मुद्द्याद्वारे संवाद साधला. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी समर्पित सेवेचा यज्ञ करण्याचे आवाहन केले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आजचा दिवस काळाने आपल्यावर आणलेला आहे. आपल्या महत्वाच्या व्यक्तीला आजच्या दिवशी आपण गमावलं आहे. म्हणून ३ जून आपल्यासाठी काळा दिवस आहे. मुंडे साहेबांचे संस्कार असे होते की, हरायचे नाही, लढायचं, रुकायचे नाही, कोणापुढे कधीही झुकायच नाही, हे मुंडे साहेबांनी आपल्या सर्वांना शिकवले. मुंडे साहेबांच्या या शिकवणूकीला अनुसरुन जो जो संघर्ष करतो त्यासाठी हा एक प्रेरणा दिन आहे. मला आज खूप दु:ख होतय. कारण मी आज मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेवू शकले नाही. आज मुंबईत वादळाची स्थिती असल्याने नेटवर्क नाही, अशा नेटवर्कच्या समस्या अनेकदा येतात, पण तुमच्या माझ्यातील कनेक्शन कोणीही तोडू शकत नाही. मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी आहेत.

सामान्य माणसांसाठी लढणारा व्यक्ती म्हणजे मुंडे साहेब होते. लोकांसाठी मी संघर्षयात्रा काढली. मुंडे साहेबांच्या मृत्यूची उद्विग्नता सार्‍यांमध्ये दिसत होती. मुंडे साहेबांची विचारधारा घराघरांपर्यंत पोहचवून भाजपची सत्ता लोकांनी आणली. मी सत्तेत गेले तेव्हा खूप लोकांना आनंद झाला. मंत्रालयाचा मजला दुमदूमून जात होता. ९० टक्के लोकांचे प्रश्‍न सोडवले, मात्र १० टक्के लोकांचे प्रश्‍न मी सोडवू शकले नाही, त्याबद्दल त्यांची मी क्षमा मागते, ती खंत माझ्याही मनात आहे असेही पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. मी पराभवाने निराश होणारी नाही, गोपीनाथ मुंडेंचे रक्त माझ्यात आहे. आज माझ्यावर प्रेम करणार्‍यांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. पंकजा मुंडे आता काय करतील, पंकजाताईंचे राजकारणात स्थान काय? पंकजाताई आम्हाला भेटतील का? किंवा पक्षात पंकजाताईंचे स्थान काय? असे अनेक प्रश्‍न लोकांच्या मनात आहेत. पण माझ्या मनात एकही प्रश्‍न नाही. कारण माझ्याकडे प्रचंड आत्मविश्‍वास आहे की तुम्ही माझ्यासोबत असाल तर कोणतेही रणांगण माझ्यासाठी कधीही धोक्याचे असणार नाही. कारण तुम्हीच माझी कवचकुंडले आहेत.

नव्याने सुरवात करायची

पंकजा मुंडे दगाबाज असू शकत नाही. मी पक्ष सोडणार, आमुक तारखेला निर्णय जाहिर करणार असं सांगितलं जातं, मी असा काही निर्णय घ्यावा यासाठी हे केले जाते, पण विश्‍वास ठेवू नका, पंकजा मुंडे पक्ष सोडणार हे तुम्ही ठरवणारे कोण? पंकजा मुंडे काय करणार? हे पंकजा आणि कार्यकर्ते ठरवतील.
मी खचलेले नाही, मी करोनामुळे घरात आहे. प्रशासनाने मला विनंती केली. त्यामुळे मी गोपीनाथगडावर आले नाही.आपल्या लोकांना काही होवू द्यायचे नाही, सर्व जण सुरक्षित रहावेत म्हणून मी गोपीनाथगडावर आले नाही.तुम्हाला जरी वाटत असले की पंकजाताई काय करतात, पण मी खचून जाणार नाही, आपण नव्याने सुरुवात करायची आहे. भाजपामध्येच गोपीनाथ मुंडेंनी निवडणूक लढवली, पराजय झाला पण ते खचले नाहीत. आमदार म्हणून निवडून आले, शेतकर्‍यांच्या घरात जन्मलेले मुंडे साहेब देशाचे ग्रामविकास मंत्रीपदापर्यंत पोहचले हा इतिहास आहे.

स्वाभिमानी असणं सन्मानाचं लक्षण

सत्तेत असतानाही मला अनेकदा संघर्ष करावा लागला मात्र मी कधीही खचले नाही. परळीच्या पराभवाची चर्चा झाली पण परळीच्या विजयाची चर्चा झाली नाही. राजकारणात पराभव हा चाखावा लागतो. पराभवातूनच शिकता येते. मोठे नेते पराभूत झाले. माझ्या पराभवातून मी दुसर्‍या दिवशी बाहेर पडले, तुम्ही बाहेर पडणार आहात का? असा सवाल करत पंकजाताई म्हणाल्या, स्वाभिमानी असणं हे सन्मानाचं लक्षणं आहे. पद आणि प्रतिष्ठा माणसाला मोठे बनवते. मात्र काही माणसे असे असतात जे पद आणि प्रतिष्ठेला मोठे बनवतात. मला काही नाही पाहिजे, मला केवळ तुमची गरज आहे.

मी जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सामान्य माणसांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संवाद करते. सर्वपक्षीयांशी मी संवाद ठेवला आहे. सत्तेत नसताना सरकारशी संवाद साधून लोकांचे प्रश्‍न सोडवण्याचे माध्यम आज आपल्याकडे आहे.त्यासाठी मी प्रयत्न करतेय.पंकजाताई म्हणाल्या,आपण सर्वांनी अत्यंत आत्मविश्‍वासाने समाजात वावरायचे आहे. आता राजकारणात बदल झालेला आहे. मीडिया, सोशल मीडिया पॉवरफुल झालेला आहे. लोकांना वाट बघायची सवय राहिलेली नाही, पण नेता तो असतो, जो परिस्थितीच्या अधिन न जाता संयमाने निर्णय घेतो, वाटचाल करतो, तुम्ही सर्व जण माझ्या पाठीशी आहेत हा विश्‍वास मला प्रेरणा देतो. मी स्वत:च्या स्वार्थासाठी काही मागत नाही. प्रत्येकाला चांगली अन् वाईट वेळ येत असते. कारण तीच खरी परीक्षा असते, अशा काळात चांगुलपणा सोडू नये असेही त्यांनी सांगीतले.

सेवेच्या यज्ञात समर्पितपणे काम करु

कोरोनाच्या संकटात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने राज्यात अनेक भागात सेवेचा यज्ञ सुरु केला, त्या सर्वांचे मी खूप आभार मानते. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. या सेवेचा यज्ञात तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. तुमचा हात माझ्या डोक्यावर असल्याशिवाय मला दुसरे काही नको. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्न केला, आणि भविष्यातही करत राहिल. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर मी माझ्या मनावर दगड ठेवून काम करु शकते तर मी तुमच्यासाठी आयुष्य खर्ची घालू शकते असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

शांततेतच निर्णय घेता येतात

अनेकजण म्हणाले, ताई तुम्ही शांत का? पण शांततेतच निर्णय घेता येतात. शांतेततूनच भविष्याची प्लॅनिंग करता येते. मला आणि माझ्या घरच्यांना कोणत्याही पदावर जाण्याची लालसा नाही. मला तुम्हाला पदावर बसण्याची इच्छा आहे. तुम्हाला न्याय देता येईल यासाठी काम करायचे. भाषण करायची सवय तुटली म्हणून तुमच्याशी संभाषण करतेय. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सेवेचा यज्ञ सुरु केला आहे. सामान्य माणूस, अबला, नारी, झगडणारा तरुण, शेतकरी या सर्वांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

मी जे कमावलं ते तुमच्यामुळेच

तुमच्या आशिर्वादाने मी जगत आहे, मी जीवनात खूप काही गमावलंय ते कायमचं. पण जे कमावलं ते तुमच्यामुळेच. गोपीनाथगड आता आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आज तिथे आपण येवू शकलो नाही पण गड आपल्या घरी आला. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सार्‍यांनी घरातूनच साहेबांना अभिवादन केले. सकाळपासून अनेकांचे फोन आले. मुंडे साहेबांच्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत. त्यांच्या प्रतिमेसमोर दिवे लावले, त्यांना अभिवादन केले असे असंख्य लोकांनी सांगितले.


ऊसतोड कामगारांना घरी पोचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असतांना झारीतले शुक्राचार्य कोण? – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे आक्रमक

मुंबई दि. १५:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोचविण्याच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत. कामगारांना घरी पोचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असतांना विलंब होत असल्याने झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल करत कामगारांचा संयम सुटू देऊ नका, लवकर निर्णय घ्या असे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे, या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत, हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली आहे, परंतु निर्णयास विलंब होत असल्याने पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी ‘ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या, त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या.ते एका ठिकाणी पंधरा दिवस आहेत. जे ठणठणीत आहेत ते ही आजारी पडतील पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहेत. आज एक दोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जवाबदार ?? रॅडम टेस्ट करा हवं तर पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा, ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील ..त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत. एकही साधा शिंकला नाही मग काय चिंता आहे?..त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य??.आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा, हा विषय राज्याच्या अधिकारात आहे.’ असे म्हटले आहे.


पंकजाताई पालकमंत्री नसल्याचा पहिलाच फटका, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना बसला अन्‌ तुटपुंजा विमा पदरात पडला, आठवण येते याच नेतृत्वाची

बीड:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्याचं नेतृत्व भाजपा नेत्या पंकजाताई यांनी पाच वर्षे करत असताना जिल्ह्यात कशा प्रकारे विकासाची महाचळवळ उभा राहिली? एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पदरात पडली. पाच वर्षात करोडो रूपायांचा विमा सतत जिल्ह्याला मिळाला हे लोकांनी पाहिलं. मात्र त्या आता सत्तेच्या बाजुला जाताच पालकमंत्री नसल्याचा फटका जिल्ह्यात शेतकऱ्यांना बसला. 2019चा तुटपुंजा विमा … Read more

बीड जिल्हयातील बंद असलेली शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी―पंकजा मुंडे

थकीत रक्कमही बँक खात्यात जमा करण्याची केली मागणी

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून बीड जिल्हयात सुरू असलेली शासकीय कापूस खरेदी केंद्रे गेल्या दहा दिवसापासून बंद असल्याने कापूस उत्पादक शेतक-यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे, ही खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावी तसेच कापूस खरेदीचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावेत अशी मागणी करत पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे जिल्हयातील शेतक-यांच्या व्यथा मांडल्या आहेत.

मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली आहेत. त्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक व नुकसान होवू नये म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने २७ नोव्हेंबर पासून शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरु केली होती. बीड जिल्ह्यात साधारण २४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली तथापि ती सर्वच खरेदी केंद्र २० जानेवारी पासून बंद झाली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी भावाने खाजगी व्यापार्‍यांना कापूस विकावा लागत आहे, परिणामी शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होत आहे. बीड जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रात विक्री केलेल्या साधारण ३१ हजार शेतकर्‍यांपैकी १० हजार शेतकर्‍यांना त्यांचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. पाऊस नसल्याने अगोदरच दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान व पिळवणूक थांबविण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू होणे आवश्यक आहेत, कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावीत व प्रलंबित शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीचा मोबदला लगेचच त्यांच्या बँक खात्यात जमा करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असे पंकजाताई मुंडे यांनी निवेदनात नमुद केले आहे.


सावरगाव (घाट) येथे होणाऱ्या अभूतपूर्व दसरा मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा―ऋषिकेश विघ्ने

बीड:आठवडा विशेष टीम― दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव-घाट येथे होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्यास यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित (भाई) शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर परळी येथील गोपीनाथ गड येथून भव्य रॅली निघणार आहे.
मंगळवारी ८ ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी रॅली गोपीनाथ गड येथून सुरू होऊन तेलगाव ,बीड ,नायगाव ,सिरसाळा ,वडवणी,वंजारवाडी,तांबा राजुरी मार्गे भगवानभक्ती गड सावरगाव घाट ता.पाटोदा जि.बीड येथे दहा वाजण्याचा सुमारास पोहोचणार आहे.व त्यानंतर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा हा संपन्न होणार आहे.तरी बीड जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी या अभूतपूर्व दसरा मेळाव्यास येण्याचे आवाहन पाटोदा भाजपाचे युवा नेते ऋषिकेश विघ्ने यांनी केले आह.

वंजारी आरक्षणाचे आंदोलन पेटले: २८ ऑगस्टला बीड येथे मोर्चा ; विधानसभा निवडणूकीवर ३५० ग्रामपंचायतींचा बहिष्कार

बीड:आठवडा विशेष टीम―राज्यातील वंजारी समाजाची सध्याची लोकसंख्या २ टक्क्यांवरून १० टक्के टक्क्यांवर असून राज्य सरकारने १० टक्के आरक्षण दिले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू,अन्यथा आमच्या हक्काच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांशी टोकाचा संघर्ष करण्यासही वंजारी समाज तयार असल्याचा इशारा वंजारी आरक्षण कृती समितीनं दिला आहे.

याचाच एक भाग म्हणून दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बीड शहरात वंजारी आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे.

यवन आक्रमणाला कंटाळून इसवीसनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थानमधून वंजारी समाज महाराष्ट्रात आला.समाजातील ८० टक्के नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत.त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये ही वंजारी समाजातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.बीड सह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून वंजारी समाज मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यासह पर राज्यामध्ये ऊस तोडणीस जातो.वर्षानुवर्षे शेती आणि ऊस तोडणी करूनही समाजाची स्थिती बदललेली नाही.तसेच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या समाज मागासलेला आहे.समाजाला ओळख आणि एकजूट करण्याचे काम राष्ट्रसंत भगवान बाबा,ह.भ.प वामनभाऊ महाराज आणि त्यानंतर स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केले.

समाजाला आता वाढीव आरक्षणाची गरज असून दोन टक्क्यांवरून १० टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी वंजारी आरक्षण मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि राज्यातील वंजारी समाजाच्या लोकप्रतिनिधीना समाजाच्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.राज्य सरकारने वाढीव आरक्षण दिले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू,मात्र दिले नाही तर सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्यासही वंजारी समाज तयार आहे.आमच्या मागण्यांचा राज्य सरकारने सहानभूतीपूर्वक विचार करावा.शिवाय वाढीव आरक्षणाचा लढा हा कोणाच्याही विरोधात नसून तो समाजाच्या हितासाठी आहे.त्यामुळे समाजातील सर्व घटक वंजारी आरक्षण कृती समितीच्या सोबत आहेत.येणाऱ्या काळात आरक्षण लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूकीवर ३५० ग्रामपंचायतीचा बहिष्कार टाकण्याचा ठराव

वंजारी समाजाचे कमी केलेले आरक्षण आमचे आम्हाला पूर्णपणे द्यावे,विशेषतः हे आरक्षण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात यावे.अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा ३५० ग्रामपंचायत ने एकमुखी ठराव घेऊन दिला आहे.आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभर विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

वंजारी आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरात विशेष बैठका घेण्यात येत आहेत.दरम्यान राज्यात वंजारी आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले असून समाजातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी , कर्मचारी , नेते या आंदोलनामध्ये सहभागी होत असून त्या त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक आंदोलकांना मार्गदर्शन करीत आहेत.मार्गदर्शन करणारे जेष्ठ नागरिक सदरील आंदोलन अत्यंत शांत आणि संयमाने करण्याचे आवाहन करत असून आजपर्यंत झालेल्या विविध बैठका या अत्यंत शांततेत आणि संयमाने पार पडल्या आहेत.हाच आदर्श आंदोलन करताना देखील वंजारी समाज बांधव बाळगतील अशी अपेक्षा वंजारी आरक्षण कृती समितीच्यावतीने समन्वयकांनी केली आहे.

पंकजाताई मुंडे यांनी राजकारणात यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत ; लोकनेत्याच्या वर्ग मित्रांनीही दिले लेकीला आशीर्वाद !

परळी दि. १६:आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणात यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत अशी अशी सदिच्छा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या वर्गमित्रांनी ना. पंकजाताई मुंडे यांना दिली. परळीत आयोजित केलेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वर्गमित्र १४ व १५ ऑगस्ट … Read more

गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रेरणादायी राजकारणाची संघर्षमय वाटचाल

आठवडा विशेष टीम―काहींना जन्मतःच वारसा मिळतो समृद्ध जीवनाचा, तर काही आपलं जीवन स्वतः घडवतात. गोपीनाथ मुंडे म्हणजे स्वकर्तुत्वाने घडलेला माणूस,राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना राजकारणात गाठणारा अद्वितीय नेता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा या गावी एक सामान्य शेतकरी कुटूंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी झाला. वडील पांडुरंग मुंडे व आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी होते,आई वडिलांसोबत मुंडे साहेबांनी वयाच्या १४व्या वर्षी पंढरपूरची पाई वारी केली,त्यानंतर सलग सात वर्षे पंढरीची पाई वारी केली,त्यामुळे मुंडे साहेबांवर बालपणापासूनच अध्यात्मिक प्रभाव राहिला, त्यांची घरची परिस्थिती बेताची होती,१९६९मध्ये त्यांचे पितृछत्र हरपले; त्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आई व मोठे बंधु पंडितआण्णा यांनी उचलली,भाऊ पंडित अण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले.मुंडे साहेब शालेय जीवनात खुप हुशार नव्हते, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांनी ओळखलं म्हणून, शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई जवळ केली.

साहेबांच्या राजकीय भवितव्याची वाटचाल…

गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली ती महाविद्यालयीन जीवनात, महाविद्यालयात होणाऱ्या अंतर्गत निवडणुकांमद्ये मुंडे साहेब नेहमीच किंग मेकर ठरायचे,प्रत्येक निवडणूक ते सहजपणे जिंकायचे. अंबाजोगाईत शिक्षण घेत असताना त्यांची भेट झाली ती प्रमोद महाजन यांच्याशी,प्रमोद महाजन यांनी मुंडे साहेबांच्या विद्यार्थी दिशेतील नेतृत्व करण्याचे गन ओळखले आणि त्यांच्याशी मैत्री झाली व प्रमोद महाजन यांनी मुंडे साहेबांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
मुंडे-महाजन मैत्री पर्व अंबाजोगाई येथे महाविद्यालयात सुरू झालं आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ही मैत्री जपली,मुंडे महाजन या जोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवले,आणि भारतीय जनता पक्षाचा राज्यभर वटवृक्ष करण्याचं काम या जोडीने केलं. महाविद्यालयात असताना मुंडे साहेबांनी राजकारणाचे प्राथमिक धडे गिरवले, जनमाणसंमध्ये त्यांनी समाजकारण आणि राजकारणाची मोठं बांधण्याची सुरवात केली.गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष चांदया पासून बांध्यापर्यंत पोहचवला व घरा-घरात भाजपचा कार्यकर्ता बनविला व पक्षाचा वटवृक्ष वृध्दिंगत केला.मुंडे साहेबांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला, आणीबाणीला विरोध करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं, आणिबाणीतल्या तुरुंगात यशवंत केळकर यांच्यासारख्या कुशल संघटकांचे मार्गदर्शन मिळाले, प्रत्यक्ष राजकारणात भारतीय जनसंघापासुन वसंत भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले,आणि आणीबाणीनंतर मुंडे साहेबांच्या अंगी नेतृत्व गुण आणखी झळकले, मुंडे साहेबांनी भारतीय जनता युवा मोर्चामधून राजकारणात प्रवेश केला.१९७८मध्ये मुंडे साहेब पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले.१९८०मद्ये रेणापूर विधानसभा मतदार संघातून प्रथम आमदार म्हणून निवडून गेले, आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही, भाजपवर ब्राह्मणांचा पक्ष असा ठप्पा बसला होता, पण तो मुंडेसाहेबांच्या नेतृत्वामुळे पुसला गेला. भाजपला बहुजनांशी जोडायचे काम,स्वतःजातीने वंजारी असलेल्या मुंडे साहेबांनी ओबीसी समाज भाजपशी जोडला, त्यामुळे भाजपला राज्यात आपलं स्थान आणखी बळकट करता आलं.१९९५ मद्ये भाजप सेना राज्यात सत्तेवर आले आणि त्या सरकारमध्ये मुंडे साहेब राज्याचे गृहमंत्री झाले,मुंडे साहेब हे कुशल प्रशासक होते, केवळ कठोर निर्णय म्हणजे प्रशासक नसते,परिणामकारक क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयाची अमलबजावणी करणे,गृहमंत्री असताना गुन्हेगारी विरोधात धडक कार्यवाही केली, पोलिसांना अधिकार दिले, “एन्काऊंटर”हा शब्द त्याच काळात रूढ झाला, मुंबईतील टोळी युद्धाला व गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं.अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो.

साहेब असे ठरले पक्ष व मैत्रीचा दुवा…

पाहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर मुंडे साहेब हे भाजप सेने युतीमधला दुवा होते.दोन्ही पक्षामध्ये तणाव निर्माण झाला, तर ते शांत करण्याचं काम साहेब करायचे.बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते, बाळासाहेबांचा कुठलाही शब्द ते पडू द्यायचे नाहीत,मुंडे साहेबांच्या या मनमिळाऊ स्वभावामुळे युतीला महायुतीचे स्वरूप देण्याचं काम साहेबांनी केलं. खासदार राजू शेट्टी, रामदास आठवले, महादेव जानकर यांना जोडण्याचं काम साहेबांनी केलं, साहेबांनी युती अभेद्य राखण्यात मोठी भूमिका बजावली म्हणून आज आपल्याला भाजप सत्तेवर दिसत आहे. त्यामुळेच जेव्हा २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती तुटली तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची सर्वाना उणीव जाणवली.

साहेब अपरंपार मैत्री जपलेला माणूस…..

मुंडे साहेबांनी त्यांच्या दिलदार स्वभावामुळे अनेक मित्र जोडले.विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची असलेली मैत्री राजकारणात चर्चेचा विषय होता. विलासराव देशमुख काँग्रेसचे व मुंडे साहेब भाजपचे तरीही त्यांच्यात मतभेद कधी आला नाही, ते दोघेही विधानभवनापर्यंत एका गाडीने प्रवास करायचे ,त्यानंतर छगन भुजबळ हे ही साहेबांचे चांगले मित्र होते,त्यानंतर साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी मुंडे साहेबांचे खुप स्नेह होते स्वतः मुंडे साहेब राजेंना कुठलीही निवडणूक न लढवता त्यांना मंत्रिमंडळात येण्याचं आमंत्रण मुंडे साहेबांनी प्रथम दिले होते,राजू शेट्टी साहेब व मुंडे साहेब यांचे नेहमीच एका रथाचे दोन चाके असल्यागत होते,साहेब म्हणायचे राजू शेट्टी साहेब तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका घ्या मी ऊस तोडणाऱ्या मजुरांची भूमिका घेतो व त्यामुळे तर मुंडे व शेट्टी हे मैत्रीचं नात अगदी घट्ट झाले होते. पक्षीय चौकटीबाहेर आपली मैत्री जपली म्हणून साहेब सत्तेत नसले तरी मतदारसंघातील विकासकामे कधी थांबली नाहीत.

सर्वसामान्य जनतेच्या मनातील लोकनेते….

साहेबांच्या व्यक्तिमत्वातील गुणवैशिष्ट्ये अत्यंत वाखण्यासरखी होती, ते सत्तेत असले के अन नसले काय साहेब येणार म्हटल्यावर सर्वसामान्य जनतेच्या मनावर किती उत्साह होता, लोक आकाशाकडे डोळे करून बसायचे आता आमच्या साहेबांचे हेलिकॉप्टर येईल. स्वतःभोवती लोकांचा घोळका कायम ठेवण्याची टाकत असणारे मुंडे साहेब हे एकमेव नेते होते, त्या लोकसंपर्काच्या बळावर त्यांनी गेलेली सत्ता पुन्हा परत संपादन केली.या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांच्या हातात हातात सत्ता नाही म्हणून त्यांची उपेक्षा करण्याची किंवा दखल न घेण्याची हिंमत कुणी करू शकले नाही, राजकारणात जनतेच्या समस्यांची जविण अचूक असावी लागते.सामाजिक मानसशास्त्र आणि जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण होती,म्हणूनच सर्वसामान्य जनतेने साहेबांच्या लोकनेता असे विशेषण त्यांना त्यांच्या या असामान्य गुणवत्तेमुळे लाभले होते.मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असो,की सहकारी साखर कारखानदारी असो,की असंघटीत ऊसतोड मजुरांचा मुद्दा असो, की सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हिताचा मुद्दा असो, मुंडे साहेब यांचे या विषयातील अचूक निर्णय त्यांना राजकारणात अग्रेसर होण्यासाठी साह्यभूत ठरले होते.

समस्यांची अचूक जण असलेला लोकनेता….

महाराष्ट्रात झालेल्या सामाजिक चळवळीच्या वेळी गोपीनाथ मुंडेनी घेतलेले निर्णय आणि भूमिका यामुळे साहेब एका मतदार संघापुरते किंवा बीड जिल्ह्याचे नेते नव्हते तर ते राज्याचे लोकनेते झाले.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ सुरू झाली आणि या विषयात लॉंग मार्ग निघाला.मंडल आयोगाचा विषय आला तेव्हा महाराष्ट्र राज्यातून पहिला पाठिंबा मुंडे साहेबांनी दिला होता, सामाजिक न्यायाचा मानदंड मानल्या जाणाऱ्या ये दोन आंदोलनात मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात भाजपला नवी ओळख मिळाली. त्यांच्यावर जातीयवादी पक्ष अशी टीका करणाऱ्यांची तोंड बंद झाली,ज्या वेळी महाराष्ट्रात गणपती दूध पीत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बडे बडे नेते स्वतःच्या हाताने गणपतीला दूध पाजायला सरसावले तेव्हा मुंडे साहेबांनी “माझा असल्या अंधश्रद्देवर विश्वास नाही” असे सांगून योग्य भूमिका घेतली होती, सगळा महाराष्ट्र अंधश्रद्धेकडे पाहत होता तेव्हा विज्ञाननिष्ठा भूमिका मांडणारे गोपीनाथ मुंडे हे पहिले नेते होते.
मराठवाद्यात पाऊस पडलेला नसतानाही केवळ नगर नाशिक जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला पाणी सोडले ,गोदाकाठच्या शेकडो गावात पाणी घुसले,अतोनात नुकसान झाले,त्या वेळी त्या प्रश्नांची अचुक जण दाखवत साहेबांनी गोदापरिक्रमेचा कार्यक्रम जाहीर केला. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली.
साहेबांनी आयुष्यभर एक स्वप्न पाहिले होते ते की बीड जिल्ह्यातील माझा ऊसतोड मजुर, माझ्या ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता मला बंद करायचाय,या कोयत्याच्या जागी मला इंजिनिअर,डॉक्टर, वकील शिक्षक सरकारी नोकरदार बनवायचे आहेत ,माई माझ्या शेवटच्या स्वसापर्यंत मजुरांची निर्णयक भूमिका घेणार आहे असे म्हणायचे.

डोळ्यासमोर महामानवांचा आदर्श होता…

राज्यभर व देशात मुंडे साहेबांची ओळख ओबीसी नेते म्हणून होती,परंतु त्यांनी ज्या महान व्यक्तिमत्वाचा आदर्श राज्यकारभार, जनतेच्या हिताची निर्णायक भूमिका डोळ्यासमोर घेऊन काम करत होते,साहेबांनी छत्रपती शिवराय यांची राज्यकारभार करण्याची शैली व जनतेचे हीतसाहेबांनी ओळखले, त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहु महाराज,यांचे जीवनपट अभ्यास साहेबांचे कार्य चालू होते.
साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत एकविसाव्या शतकातील आद्य संत भगवान बाबा यांना श्रद्धास्थान मानून जिल्ह्यातील विकासाची धुरा हाती घेतली होती, साहेब नेहमीच भगवान बाबांच्या समाधीवर माथा टेकवूनच कुठल्याही कार्याला सुरवात करत होते.साहेबांचा भगवान गडावरील दसरा मेळावा हा राज्यभर कौतुकाची बाब बनली होती, या मेळाव्यात साहेबांवर प्रेम करणारी गोर गरीब जनता, ऊसतोड कामगार दिन दलित सर्वसामान्य जनता या मेळाव्याला साहेबांचा धगधगता आवाज ऐकण्यासाठी दरवर्षी भगवानगडावर माथा टेकवण्यासाठी येतात… भगवानगड व मुंडे कुटुंब हे एक वेगळं समीकरण साहेबांनी जुळून आणले होते.

गड आला पण सिंह गेला… साहेबांचा शेवटचा झंझावत…

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंडे साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढलं,देशात भाजपची सत्ता आली पाहिजे हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दांडगा प्रचार केला,शेवटी साहेबांच्या प्रयत्नाला यश आले व २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला व राज्यात महायुतीचे ४२ खासदार निवडून आले, व देशात केंद्रीय ग्रामविकास मंत्री असे महत्त्वाच खात मिळाले.इतकी वर्षे सत्तेत येण्यासाठी साहेबांनी संघर्ष केला परंतु सत्तेत आल्यावर मुंडे साहेबांना सत्तेची फळे मात्र चाखता आली नाहीत.
२९ जून २०१४ रोजी साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री म्हणून शपथ घेतली होती, व या विजयानंतर मुंडेसाहेबांच्या स्वागताची भव्यदिव्य तयारी बीड जिल्ह्यातील जनतेने केली होती, जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला केंद्रात मंत्रिपद मिळाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता,साहेब३ जून२०१४ रोजी दिल्ली वरून जिल्ह्यात येणार होते, भगवान बाबांच्या समाधीवर मस्तक टेकवणार होते,परंतु काळाने घाला घातला आणि मुंडे साहेब ३ जून २०१४ च्या पाहटे दिल्ली विमानतळाकडे जात असतानात्यांच्या गाडीला एका टॅक्सीने जोरात धडक दिली ,तेव्हा साहेबांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं पणत्याच वेळी त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांन त्यांचं निधन झालं, आणि एका झुंजार नेत्याचा शेवट झाला. भाजपच्या संघर्षच्या काळात उभा राहणाऱ्या गोपीनाथराव मुंडे साहेबांना काळान सत्ता उपभोगू दिली नाही. त्यांच्या अंतविधीसाठी जमलेल्या लाखोंचा जमाव त्यांच्या जनसंपर्काची आणि लोकप्रियतेची ग्वाही देत होता, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता,ती गर्दी साक्ष होती गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या लोकसमर्पक आयुष्याची…!
महाराष्ट्रान गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या रूपान एक झुंजार नेता गमावला होता. एक असा नेता ज्याला जनतेची नाड ठाऊक होती. ज्याला लोकांच्या समस्या कळत होत्या. आणि जो सक्षम होता त्या समस्या दुर करण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही.
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय..!
साहेबांवर प्रेम करणारी सर्वसामान्य जनता एवढी होती की साहेबांचा त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्य नसायचे म्हणून साहेब नेहमीच सभेत एक वाक्य आवर्जून उल्लेख करायचे “मी जरी तुमच्यापर्यंत पोहचत नसलो तरी…….माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय..!”हे शब्द सर्वसामान्य जनतेच्या मनातले कधीही न विसरणारे आहेत.

साहेबांची राजकीय जबाबदारी व नेतृत्व…

१९७८- बीड जिल्ह्यापरिषदेवर सदस्य म्हणून विजयी.
◆ (१९८०-१९८५) विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून विजय.
◆ १९८० -महाराष्ट्र राज्य भारतीय युवा मोर्चाचे पाहिले अध्यक्ष म्हणून निवड.
◆ १९८२ -भाजप राज्य सरचिटणीस पद..
◆ १९८६- महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्षपद..
◆ १९८७ -कर्जमुक्ती मोर्चाचे नेतृत्व..
◆ (१९९०-१९९५)-विधानसभा आमदार म्हणून विजयी
◆ (१९९२-१९९५) – विरोधी पक्षनेते पद…
◆ (१९९५-१९९९)-विधानसभा आमदार म्हणून विजयी
◆ (१९९५-१९९९)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा व गृहमंत्री म्हणून शपथ…
◆ (२००४-२००९)- विधानसभा आमदार म्हणून विजयी.
◆ (२००९-२०१४)- बीड लोकसभेचे खासदार म्हणून प्रथम विजयी.
◆ (२७ जून २०१२)- संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत न्यूयॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व
◆ २०१४ -खासदार म्हणून दुसऱ्या वेळेस निवडून आले.
◆ (२९ जून २०१४)- केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली.
◆ ३जून२०१४ रोजी कार अपघातात निधन.

―इंजि.दत्ता बळीराम हुले
(बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड मजुरांचा मुलगा)
मो.९९६०१३५६३४

औरंगाबादच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― देशाचे माजी केंद्रीय कॅबिनेट ग्रामविकास मंत्री लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ५० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सिडको मार्फत या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे.बुधवारी नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढला आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय … Read more

सचिन सावंत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; ‘मुंडे,महाजन’ यांच्याबद्दलच वक्तव्य पडले महागात

मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिवंगत गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केली होती.परंतु मुंडे समर्थकांमध्ये पसरलेल्या असंतोषामुळे त्यांनी ती ट्विट डिलीट केल्याचे समोर येत आहे.लोकसभेच्या निवडणूका चालू असताना सामाजिक शांतता भंगाचा प्रकार काँग्रेस प्रवक्त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केल्याचे समोर येत आहे.

काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर “महात्मा गांधी,इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी गेले…..महाजन आणि मुंढे कशासाठी गेले?” अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

स्व.प्रमोद महाजन व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे समर्थक ह्या ट्विट मुळे खूप संतापले आहेत.सर्व स्थरावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

परळीच्या वेशीत जातीधर्माचे किळसवाणे राजकारण चालणार नाही―पंकजा मुंडे

बर्दापूर, घाटनांदूर, उजनी पाटी येथे ना. पंकजाताई मुंडेंच्या झंझावाती सभा

खा.प्रीतमताई मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे केले आवाहन

बीड दि. १०: खा.प्रीतमताई मुंडे यांनी त्यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात हजारो कोटींचे राष्ट्री महामार्ग आणले, रेल्वे बीडच्या वेशीत आली आहे. बीड जिल्ह्यात आलेली विकासाची गंगा पाहून सैरभैर झालेल्या विरोधकांकडे आता मुद्देच उरले नाहीत त्यामुळे ते जाती-धर्माची ढाल पुढे करत आहेत. परंतु, परळीच्या वेशीत हे जातीपातीचे राजकारण चालणार नसल्याचा इशारा ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला. परळी मतदार संघातील बर्दापूर, घाटनांदूर, उजनी पाटी येथे आज झालेल्या त्यांच्या झंझावाती सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा सुदृढ करण्यासाठी खा. प्रीतमताई मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बुधवारी सायंकाळी ही प्रचारसभा पार पडली. जिल्हाभरात ना. पंकजाताई मुंडेंच्या सभांना मिळणारा उदंड प्रतिसादाचा शिरस्ता बर्दापूर, घाटनांदूर व उजनी पाटी येथेही पहावयास मिळाला. सभेला ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना पंकाजाताई म्हणाल्या कि, स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा राजकीय उदय रेणापूर मतदार संघातून झाला. त्यावेळी बर्दापूर त्या मतदार संघात होते. मुंडे साहेबांनी या भागातील जनतेची ४० वर्षे सेवा केली. त्यांना तसेच प्रेम इथल्या जनतेनेही दिले. आजवर बर्दापूरमधील एकही मतदान केंद्र आम्हाला मायनस (वजा) झालेले नाही. त्यांच्यानंतर प्रीतमताई मुंडे या खासदार झाल्या. पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात हजारो कोटींची विकासकामे खेचून आणली. राष्ट्रीय महामार्ग तर जवळपास पूर्ण होत आलेच आहे, तर नगर बीड परळी रेल्वेसाठी आतापर्यंत २,८०० कोटींचा निधी आला आहे. ग्रामविकास खाते माझ्याकडेच आहे आणि परळी मतदार संघही माझा आहे. त्यामुळे साहजिकच आमच्या काळात या भागावर विविध अनुदान आणि योजनांचा वर्षाव झाला आहे. एकट्या बर्दापूर ग्राम पंचायतला सहा कोटींचा निधी मिळाला आहे, एवढा तर मागच्या ४० वर्षात एकत्रितरित्या देखील मिळाला नसेल. घरोघर शौचालये झाली, चुलीसमोर बसणाऱ्या महिला आता गॅससमोर बसू लागल्या आहेत.

त्यांना जातीशिवाय कांहीच आठवत नाही

जिल्ह्यात विकासाची गंगा खळखळून वाहत असताना विरोधातील कुठले मुद्देच शिल्लक नसल्याने विरोधक आता बिथरले आहेत. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आता जातीपातीचे घाणेरडे राजकारण खेळण्यास सुरुवात केली. आहे. परंतु, याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात त्यामुळे परळीच्या वेशीत जातीपातीचे किळसवाणे राजकारण चालणार नाही असे त्यांनी सुनावले. ‘ते’ लोक पाहुण्यारावळ्याचे संबंध शोधात तुमच्यापर्यंत येतील. पण विकासाच्या बाबतीत आम्ही जातपात पाहणार नाही असे त्यांना ठणकावून सांगा आणि चहापाणी करून वाटे लावा असा सल्लाही पंकजाताईंनी दिला. माझी बहिण खा. प्रीतमताई मुंडे ही उच्च शिक्षीत आहे, समंजस आहे. कुठलाही बडेजाव करत नाही. सर्वसामान्यात मिसळते. तिच्याकडे विकासाची दृष्टी आहे. तिच्या माध्यमातून होणारी विकासकामे अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी तिला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन ना. पंकाजाताई मुंडे यांनी केले.

बचत गटांमुळे महिला सक्षम

बचत गटांच्या माध्यमातून मतदारसंघातील महिला सक्षम झाल्या आहेत, परिणामी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बचतगटे अधिक सशक्त करण्यासाठी बर्दापूर परिसरातील जवळपास ३० बचतगटांना आतापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यातही बचत गटांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून हातात खेळणारा पैसा महिलांनी योग्य ठिकाणी लावावा, नवऱ्याच्या हाती पैसे देऊ नयेत असा मिश्कील सल्लाही पंकजाताईंनी दिला.

हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है?

आजवर कधीही इकडे न आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार आता फक्त मत मागण्यासाठी इकडे येतील. ते आले कि त्यांना विचारा, ‘हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? इकडे तुमचे काहीच नाही. आम्ही फक्त विकासालाच मत देणार असे त्यांना निक्षून सांगा असे आवाहन पंकजाताईंनी केले.

ही तर चांडाळ चौकडी – मुळूक

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील टीमचा उल्लेख अलिबाबा चाळीस चोर असा केला. हाच धागा पकडून पंकजाताई म्हणाल्या, चाळीस कुठे हो? ही तर चांडाळ चौकडी आहे. यांच्या कुरापतींना कंटाळून राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्यासोबत येत विकासाची कास धरत आहेत असे त्यांनी सांगितले.

या सभेस माजी आमदार गोविंदराव केंद्रे, प्रवीण घुगे, रमेश आडसकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, गयाताई कराड, हाबूबाई, अविनाश मोरे, संजय गिराम, विशाल मोरे, शामराव आपेट, बाबू पटेल, कुरेशी, गणेश कराड, प्रदीप गंगणे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


केवळ स्वार्थासाठी विरोधक सत्ता परिवर्तन यात्रा काढत आहेत -पंकजाताई मुंडे

ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला औरंगाबादच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दृढ विश्वास!

पाया मजबूत असलेले भाजपचे सरकारच सत्तेवर येणार

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा केवळ सत्ता मिळविण्यासाठी – विरोधकांवर हल्लाबोल

औरंगाबाद दि. २३ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जनतेच्या प्रश्नांवर संघर्षयात्रा काढली ती वंचित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सत्तेविरुद्ध सामान्यांमध्ये असलेल्या रोशाला वाचा फोडण्यासाठी पण आज काही मंडळी केवळ सत्ता मिळवण्यासाठी यात्रा काढत आहेत. सत्तेशिवाय ते राहूच शकत नाहीत. ज्यांना एवढी वर्षे सत्ता असताना विकासाचे परिवर्तन घडवता आले नाही ते आता स्वार्थासाठी सत्ता परिवर्तन यात्रा काढत आहेत असा हल्लाबोल करून येणा-या निवडणूकीत पाया मजबुत असलेले भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आहे असा दृढ विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.

औरंगाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्हयाच्या शक्तीकेंद्र प्रमुख व बूथप्रमुखांच्या क्लस्टर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. त्या म्हणाल्या,राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही तळागातील सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी विविध योजना राबवल्या आहेत, त्याचा प्रसार आणि प्रचार जनतेपर्यंत पोहोचवा. आज राज्यातील प्रत्येक व्यक्तीला भाजप सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ मिळत आहे आणि म्हणून विरोधकांनी आमची धास्ती घेतली आहे. आज परळीत जे समारोप सभा घेत आहेत त्यांचा राजकारणातून कायमचा समारोप केल्या शिवाय थांबणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बीड – परभणी -जालना- औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्व जागा जिंकून विरोधकांना झेंडा फडकवण्याची संधी मिळू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यकर्ता हा विजयाचा शिल्पकार

पुढे बोलताना ना.पंकजाताई म्हणाल्या, कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा असून तोच खरा विजयाचा शिल्पकार आहे. विजयाचा मजबूत पाया रचण्याची वेळ आली आहे.
कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने भाजप आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. एक पक्ष जो परिवाराचा आहे पण भाजप हाच परिवार आहे. देश प्रथम नंतर पक्ष अशी समर्पित वैभवशाली परंपरा लाभलेल्या भाजपा सरकारने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आपण आज जनतेपर्यंत पोहोचवत आहोत ,पुढची सत्ताही तुमचीच असून जी कामे राहिली आहेत ती आम्हीच पूर्ण करू हा विश्वास तुम्ही जनतेला द्या असे आवाहन ना.मुंडेंनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , हरिभाऊ बागडे ,बबनराव लोणीकर ,संभाजी पाटील निलंगेकर , खा.प्रितमताई मुंडे ,सुजितसिंह ठाकूर भाऊराव देशमुख ,भागवत कराड , प्रवीण घुगे , गोविंदराव केंद्रे आदीसह पक्षाचे आमदार ,जिल्हाध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होती.