अंबाजोगाई तालुक्यात “मिशन झिरो डेथ” मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी ; शिक्षक,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी ताई करताहेत ग्रामीण आरोग्याची माहिती संकलित

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
“मिशन झिरो डेथ” मोहिमेअंतर्गत अंबाजोगाई तालुक्यात घरोघरी जाऊन शिक्षक,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी ताई हे आरोग्य तपासणी करीत आहेत.त्यामुळे आता ग्रामीण आरोग्याची माहिती संकलित होणार असून या माहिती आधारे कोविड संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.या मोहीमे चा पहिला टप्पा पुर्णत्वाकडे जात आहे अशी माहिती अंबाजोगाईचे गटशिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी “मिशन झिरो डेथ” हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.तात्काळ त्यांनी शिक्षक,आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी ताई सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यामुळे सोमवार,दिनांक १९ एप्रिल २०२१ पासून ते १० मे २०२१ या कालावधीत ६० ग्रामसेवक,१११० शिक्षक,शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी,२५१ आंगणवाडी ताई,१८८ आशा स्वयंसेविका मिळून संयुक्तपणे अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील ३७,९१५ कुटुंबांचे व १ लाख ९१ हजार ११६ एवढ्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करणार आहेत.हे सर्वेक्षण तीन टप्प्यांत होणार आहे.अंबाजोगाई तालुक्यातील ११२ गावातून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन नोंदी घेत आहेत.यामुळे लवकरच ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची खरी वस्तुस्थिती समोर येऊन यामुळे आरोग्य विभागास मदत होणार आहे.मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यात दररोजच दिडशेच्यावर कोरोना संसर्ग झालेले रूग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडून रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये,यासाठी बीड जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी “मिशन झिरो डेथ” ही मोहीम राबवून प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे.हे शिक्षक त्या गावातील आशा स्वयंसेविका व अंगणवाडी ताई यांच्या मदतीने घरोघरी जाऊन कुटूंब प्रमुखाकडून कुटूंबातील प्रत्येकाची आरोग्य विषयक माहिती घेत आहेत.या सर्वेक्षणात कोणास काही आजार आहे का ? असल्यास या बाबतची नोंद केली जात आहे.रूग्ण व त्याचा सहवासीत याची तसेच सर्दी,ताप,खोकला आदी लक्षणे,इतर कोणते आजार आहेत काय.? असल्यास औषधोपचार सुरू आहेत काय.नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत आहे.तसेच कोविड प्रतिबंधक लस घेतली का ? अशी विचारणा करून कुटूंबात कुणी कोविड पॉझिटिव्ह आहेत का.असल्यास उपचार कुठे सुरू आहेत,बाधित कुटूंबिय व इतर सदस्य हे होम आयसोलेशनचे नियम पाळतात का याबाबत ची माहिती घेण्यात येऊन होम आयसोलेशन असलेल्या घरावर स्टिकर लावण्यात येत आहेत.यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती प्रशासनाच्या समोर येणार आहे.ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.तर सध्या ग्रामीण भागात ही लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.प्रशासन लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करीत आहेत.

सर्वेक्षणाकरीता सहकार्य करावे
=============
बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी “मिशन झिरो डेथ” हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.तात्काळ त्यांनी शिक्षक,आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी ताई यांच्या संयुक्त पथकाद्वारे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार अंबाजोगाई तालुक्यात गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोणसीकर यांचे मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामसेवक,गटशिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद,डॉ.बालासाहेब लोमटे यांचे मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका आणि महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी हुंडेकर यांचे मार्गदर्शनाखाली सर्व अंगणवाडी ताई यांच्या संयुक्त योगदानातून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिलेल्या दिशादर्शक सूचनांचे पालन करून अंबाजोगाई तालुक्यात “मिशन झिरो डेथ” ही मोहीम प्रभावीपणे राबविणे सुरू आहे.संशयित रूग्णांचे गावातच होम आयसोलेशन करणे,सहव्याधी,वयोवृद्ध,मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणारांना गरजेनुसार अँटीजेन व आरटीपिसीआर टेस्ट करून त्यांना तात्काळ पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा पुरविण्यात येत आहे.ही मोहीम राबविण्यात आल्याने ग्रामीण भागातील बाधित रूग्णांचा शोध घेणे शक्य होत आहे.त्यामुळे सर्वेक्षणाकरीता जनतेने सहकार्य करावे.

– चंदन कुलकर्णी
(गटशिक्षण अधिकारी,अंबाजोगाई.)


पंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड ; जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मधील समावेशाने राष्ट्रीय राजकारणातही पाडणार छाप !

मुंबई दि.२७:ऋषिकेश विघ्ने― भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मध्ये पंकजाताई मुंडे यांचा समावेश झाला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समावेशाने आता राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे नेतृत्व अधिक झळाळून निघणार आहे. दरम्यान, या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष नड्डा यांचे आभार मानले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या नव्या कार्यकारिणीत पंकजाताई मुंडे यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पंकजाताई मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील एक धडाडीच्या व आक्रमक नेत्या म्हणून पाहिले जाते. उत्कृष्ट वक्त्या, संघटन कौशल्य व काम करण्याची हातोटी या गुणांमुळे समाजातील सर्व जाती धर्मात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सन २०१३ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. या काळात तत्कालिन काॅग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात त्यांनी काढलेली ‘एल्गार’ यात्रा चांगलीच गाजली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ मध्ये ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि याचाच परिणाम म्हणून २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली. दोन वेळा आमदार राहिलेल्या पंकजाताई मुंडे यांनी भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले. ग्रामविकास, जलसंधारण, महिला बालविकास व रोजगार हमी योजना आदी खात्याच्या माध्यमातून लोक कल्याणाच्या अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या. केवळ राजकारणातच नाही तर सामाजिक कार्यातही तितक्याच धडाडीने काम करणा-या पंकजाताई मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्यांच्या घटना विरोधात मोठी जनजागृती केली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचित पिडित घटकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत तसेच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून गोरगरिबांचे संसार उभा केले.

आता पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिल्याने इथेही त्यांच्या नेतृत्वाची चूणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. पंकजाताई मुंडे यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्रातील तमाम भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून बीड जिल्हयात परळीसह ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

नेतृत्वाचे मानले आभार

या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, सह सरचिटणीस व्हि. सतीश यांचे आभार मानले आहेत.


पिकांचे पंचनामे ,पिककर्ज मंजुरी प्रकरणे विषयीचे प्रश्न तात्काळ सोडवावेत अन्यथा बँकेसमोर उपोषण – भाजपा जिल्हाउपाध्यक्ष ॲड सुधीर घुमरे

पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन, ऊडीद, मुग कापुस या पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन या पावसाच्या तडाख्यामुळे खरीपांच्या पिकांचा हातातोंडाशी आलेला घास शेतकर्‍यांच्या तोंडातुन निघुण गेल्यासारखी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवाल दिल झाला असुन यामुळे आज भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ लोकनेत्या पंकजाताई मुंडे ,खासदार डॉ प्रितमताई मुंडे ,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पाटोदा यांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुधीर घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे नेते बाळासाहेब पवार भाजपचे युवा नेते पारगाव गण प्रमुख शामजी हुले, सरपंच संतोषजी नेहरकर भाजपचे युवा नेते संपत नागरगोजे उपसरपंच प्रवीण देवडे यांनी लेखी निवेदन नायब तहसीलदार टाक साहेब यांना देऊन वरील मागण्यांची तात्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे संबंधित गावातील सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना आदेशीत करून याचा अहवाल जिल्हाधिकारी बीड यांना सादर करण्यात यावा तसेच पाटोदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असुन शेतकरी बँकेत हेलपाटे मारुन मारून वैतागले असुन मुजोर बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना ऊडवा ऊडवीची ऊत्तरे देत असुन शेतकऱ्यांची अवहेलना करत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे तरी याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आठ दिवसांत प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत नसता बँकेसमोर आपण उपोषणाला बसणार असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुधीर घुमरे यांनी दिला आहे यावेळी संजय गव्हाणे, जितेंद्र कदम, संदीप गरकळ, मुकुंदा बडे, दत्ता सातपुते आदी उपस्थित होते.

बीड: प्रामाणिकपणे दरवर्षी कर्जफेड केली म्हणुन कर्जमाफीत बसत नाही , ‘काका मुळीक’ यांची कथा आणि व्यथा

लिंबागणेश दि.२८:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल ऊसतोड मजुर काका मुळीक ,त्यांना कोरडवाहू ६ एकर जमिन, ऊसतोड मजूर असल्यामुळे ४ महिने ऊस तोडण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना सोलापूर येथे दरवर्षी नित्यनेमाने जातात.
त्यांना दोन मुले ,मोठा मुलगा दत्ता वय २० वर्षे १२ वी झालेली सध्या पाटोदा पीव्हिपी कालेजमध्ये शिकत आहे. शेतीमध्ये वडिलांना मदत करतो. दुसरा मुलगा विकास वय १८ वर्षे लिंबागणेश येथील भालचंद्र महाविद्यालयात शिकतोय.

काका मुळीक ,दत्ता मुळीक (बापलेक) मो.नं ९०२१२१८८२६―

उडीद १० दिवसांपुर्वी पेरले, ५० टक्के उगवले ५० टक्के उगवले नाही. बि-बियाण्यासाठी उडीद पिशवी १५०० रुपये, खत १ क्विंटल २५०० रुपये , टक्टरने पेरणी १५०० रूपये. बैल बारदाना नाही.दोबार खर्च करण्याची ताकद नाही. म्हणुन बापलेक दुसऱ्यांदा तुट पडलेल्या जागी पेरणी करत आहोत.

डॉ.गणेश ढवळे,सामाजिक कार्यकर्ते:―

सोलापूर येथील सिद्धेश्वर साखर कारखान्यावरुन परतलेल्या काका मुळीक यांच्या कडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ८० हजार रुपये कर्ज होते.परंतु नियमित दरवर्षी प्रामाणिकपणे कर्ज फेडले असल्यामुळे त्यांचे कर्ज कर्जमाफीत बसत नसल्याचे बँक मॅनेजरने सांगितले. प्रामाणिकपणे शेतीच्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची ही व्यथा आहे. त्यांनी सोयाबीन लावलेले उगवलेच नाही. जिल्हाधिकारी बीड आणि श्रीकांत निळे, तहसिलदार बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी पाठवून तात्काळ स्थळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

आ.बाळासाहेब आजबे यांनी पाटोदा मधून जाणारा पैठण-पंढरपूर हायवेचे आडवलेले काम तात्काळ चालू केले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.बाळासाहेब आजबे यांची पाटोदा तहसीलमध्ये मॅरेथॉन आढावा बैठक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा

आ.आजबे यांच्या प्रयत्नाने पाटोदा शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम सुरू झाल्याने जिथे विषय गंभीर तिथे आमदार बाळासाहेब आजबे खंबीर असाच प्रत्यय पाटोदेकराना आला

पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण जग परेशान झाले असताना आष्टी मतदारसंघातील प्रशासनाच्या चांगल्या निर्णयामुळे , तर लोकप्रतिनिधीच्या उत्तम नियोजनामुळे मतदारसंघातील जनतेला आतापर्यंत त्रास झाला नाही. यामुळे सामान्य लोक जरी कोरोना बाबत गंभीर घेत नसले. तरी आष्टी मतदारसंघातील प्रशासन व लोकप्रतिनिधी गंभीर आहेत. यामुळे बुधवार दिनांक 13 मे रोजी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाटोदा तहसील मध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ तास आढावा बैठक घेतली. त्यात विविध विषयावर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यास कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे , शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून कृषी दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर भाव फलक लावावे तसेच कोणताही कृषी दुकानदार अधिक भावाने बी बियाणे विकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा कृषी सेवकांनी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना बी बियाणे ची माहिती द्यावी अशा सूचना कृषी विभागाला केल्या आहेत. तर विद्युत तारा खाली आल्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वीच सर्व व तांत्रिक अडचणीचे कामे तात्काळ करून घ्यावेत ज्या गावातील डीपीचे प्रॉब्लेम असतील त्या गावातील सर्वे करून सर्व डीपी बदलून देणे यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही अश्या सूचना महावितरणला केल्या आहेत.

तर आरोग्य विभागाणे आतापर्यंत खूप छान काम केले आहे व आता बाहेरगावावरून जास्त लोक येऊ लागल्यामुळे आपल्या तालुक्यातील आरोग्य विभागाला गालबोट लागूनये म्हणून पहिल्या पेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सामान्य लोकांना व तुमच्या विभागाला कसल्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ मला फोन करा मी सहकार्य करेल तसेच पोलीस प्रशासनाने आतापर्यंत खूप छान काम केले आहे मात्र आता रात्र वैऱ्याची असल्यामुळे इथून पुढेही पोलीस प्रशासनाने खूप जागरूक रहाणे काळाची गरज आहे व आपले पोलिस प्रशासन चांगले काम करील यांची मला खात्री असून पाटोदा तालुक्यातील अतिशय गंभीर विषय असलेला पाटोदा शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम चार पाच दिवसापासून बंद असल्यामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांना खूप त्रास होत होता यामुळे राष्ट्रीय कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे व सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी आवाज उठवल्यामुळे ही गोष्ट वर्तमानपत्राच्या माध्यमातून आष्टी मतदार संघाचे दबंग आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कानावर गेल्यानंतर तात्काळ आमदार महोदयांनी गुत्तेदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्या अडचणीची विचारपूस करून रस्त्याचे बंद काम पडलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अडचणी सोडवत तात्काळ शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर हायवेचे काम चालू करायला लावले आहे. यामुळे भयभीत अवस्थेत असलेल्या शहरातील व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तालुक्यातील संपूर्ण व्यापारपेठ मध्ये एकच चर्चा होत आहे आमदार असावा तर असाच यामुळे जिथे विषय गंभीर तिथे आमदार बाळासाहेब आजबे खंबीर असाच प्रत्येय पाटोदा तालुक्यातील व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांना आला असून पाटोदा तहसिल मधील आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मॅरेथान आढावा बैठकीमुळे माञ पाटोदा तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.

निसर्गरम्य परिसरातील अंधारेश्वर मंदिराचे रूप पालटले ; पंकजा मुंडे यांनी मंजूर केलेल्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून झाले काम

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
परळी पासून जवळच डोंगरांच्या कुशीमध्ये असलेल्या निसर्गरम्य अशा अंधारेश्वर मंदिराच्या समोरील सभागृहाचे काम, सुशोभीकरण, रंगरंगोटी आदी पूर्ण झाले असून तत्कालीन पालकमंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी मंजूर करून दिलेल्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून हे काम करण्यात आले आहे. यामुळे अंधारेश्वर मंदिराचे रूप पालटून गेले आहे.
तालुक्यातील मालेवाडी दत्तवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जाज्वल्य असे अंधारेश्वराचे जुने पुरातन मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात व डोंगराच्या एकदम कुशी मध्ये आहे. परळीपासून अगदी जवळच असलेले हे ठिकाण अतिशय रम्य असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अंधारेश्वराच्या दर्शनासाठी परळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर जातात. अंधारेश्वर मंदिर परिसर हा अतिशय निसर्गरम्य असून चांगला पर्यटनाचा आनंद या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर भाविकांना अंधारेश्वराच्या दर्शनाचाही लाभ होतो. मालेवाडी व दत्तवाडी या दोन गावांच्या काही अंतरावर मधोमध एकांतात असलेले हे ठिकाण अनेक भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. याठिकाणी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सन अठरा-एकोणीस मध्ये तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर करून दिला होता. या निधीतून मंदिर व सामाजिक सभागृहाच्या कामाला प्रारंभ झाला. हे काम आता पूर्ण झाले असून रंगरंगोटी ही झालेली आहे. त्यामुळे या मंदिराला नवे देखणे रूप मिळाले आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे तीर्थक्षेत्र निधीतून साकारलेले मंदिर अधिकच आकर्षक बनले आहे. या मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून निधी मंजूर करून दिल्याबद्दल मालेवाडी चे सरपंच सौ.वैशाली भुराज बदने, मालेवाडी दत्तवाडी येथील गावकरी व भाविकांनी आभार व्यक्त केले आहेत.


पाटोदा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील ऊसतोड मजुरांना मोफत किराणा किट वाटप कोण करणार ? नगराध्यक्ष म्हणतात निधी आलाच नाही– डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यायाचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी ग्रामविकास विभागामार्फत ऊसतोड मजुरांची किराणा व जिवनोपयोगी वस्तू खरेदी साठी १ कोटी ४३ लाख रू विशेष बाब म्हणून मंजूर केला आहे. दि.०५/०५/२०२० रोजी अजित कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी तो संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांना वितरणासाठी ग्रांमपंचायतकडे वर्ग केला आहे.
परंतु पाटोदा नगरपालिकेच्या हद्दीतील मंगेवाडी, बेलेवाडी , गितेवाडी , बांगरवाडी ,घोलपवस्ति, गांधनवाडी येथिल एकुण ५० ऊसतोड मजूर कुटुंबातील लोकांना मोफत किराणा किट वाटप करण्यात येणार नाही,कारण तशी तरतूद नसल्याचे पाटोदा नगराध्यक्ष गणेश नारायणकर यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना सांगितले.

गणेश नारायणकर ,नगराध्यक्ष- पाटोदा नगरपालिका

पालकमंत्री मुंडे साहेब यांनी ग्रामिण भागातील ऊसतोड मजुरांना मोफत किराणा किट वाटप करण्यासाठी निधि वितरीत केला आहे.नगरपालिका हद्दीतील ऊसतोड मजुरांसाठी दिलेला नाही.तसे कुठलेही शासन परिपत्रक आम्हाला मिळाले नाही, प्रशासनाने निधि दिला तर आम्ही तात्काळ वितरीत करू.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते –

पाटोदा येथिल सामाजिक कार्यकर्ते मा.दत्ता हुले यांनी पाटोदा नगरपालिकेच्या हद्दीतील वरील गावातील ऊसतोड मजुरांची विचारपूस केली असता तर यांना मोफत किराणा किट वाटप करण्यात येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर नगराध्यक्ष गणेश नारायणकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी निधि वितरीत करण्यात आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांतील ऊसतोड मजुरांवर अन्याय न करता सामाजिक न्याय मंत्री असलेल्या पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांनी त्यांना न्याय देऊन नगरपालिकेच्या कुठल्याही निधीतून त्यांना मोफत किराणा किट वाटप करण्यासाठी निधि वितरीत करण्यात यावा.अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व मा.दत्ता हुले ,ढाळेवाडीकर यांनी पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांना ई-मेल व्दारा केली आहे.

औरंगाबाद: ६ स्वस्त धान्य दुकाने निलंबित , १७ दुकानदारांना निलंबनाची नोटीस

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजू धान्यापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्फत योग्य नियोजन आणि समन्वयाच्या माध्यमातून गावखेड्यांपर्यंत धान्य पोहचविल्या जात आहे. अन्नधान्यापासून गरीब व गरजू वंचित राहू नये म्हणून सामाजिक संस्था देखील हिरीरीने सहभाग घेत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत एकूण 1802 स्वस्त धान्य दुकाने असून, त्यापैकी औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 199 तर ग्रामीण भागांमध्ये 1603 स्वस्त धान्य दुकाने आहेत. याअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना, अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी (केशरी) योजनेच्या लाभार्थ्यांना नियमितपणे प्रतिव्यक्ती 05 किलो धान्य दिले जाते. यामध्ये 03 किलो गहू 2 रुपये दराने तर 02 किलो तांदूळ 03 रुपये प्रति किलो या दराने दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 05 किलो केंद्र शासनाचा मोफत तांदूळ दिलेला आहे. एप्रिल महिन्याचे नियतन आणि केंद्र शासनाचा मोफत तांदूळ औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पात्र कार्डधारकांना वितरित करण्यात आलेला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे अन्नधान्य पोहोचावेत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानावर एका शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, शिक्षक यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी श्री चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना असे निर्देश दिले आहेत की सर्व पात्र कार्डधारकांना शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीतच धान्याचे वितरण करावे. धान्य शासनाने ठरवून दिलेल्या दरा नुसार आणि लाभार्थींना देय असलेले सर्व धान्य द्यावे, लाभार्थ्यांना पावती द्यावी पात्र कार्डधारकांच्या आणि लाभार्थ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार, औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पुरवठा निरिक्षक यांचे भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 06 स्वस्त धान्य दुकाने निलंबित करण्यात आले असून 17 स्वस्त धान्य दुकानदारांना निलंबनाची नोटीस देण्यात आलेली आहे. निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये किरण जगधने लोहगाव पैठण, मुक्तद्वार ग्राहक संस्था, गुलमंडी, औरंगाबाद शहर, आर.बी. रेशवाल, संघर्षनगर, औरंगाबाद शहर, चेअरमन दाक्षायणी ह. संस्था, बाभुळगांव (नांगरे), तालुका गंगापूर, श्रीमती आशाबाई संतोष गवळी, लिंबेजळगाव तालुका गंगापूर व श्री. अंबादास येडूबा खरात, कायगाव तालुका सिल्लोड या स्वस्त धान्य दुकानांचा समावेश आहे.

माहे मे आणि जून महिन्यासाठी शासनाने जे लाभार्थी प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी नाहीत आणि ज्यांना नियमितपणे अन्नधान्य मिळत नाही अशा केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दराने प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य याप्रमाणे गहू तीन किलो व तांदूळ दोन किलो गहू आठ रुपये दराने आणि तांदूळ बारा रुपये दराने वितरित करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. हे वितरण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक 28 एप्रिल पासून सर्व केशरी कार्डधारकांना अन्नधान्याचे वितरण सुरू झाले आहे.
बिगर कार्डधारकांना शासनाकडून कुठलेही प्रकारचे धान्य प्राप्त झालेले नाही तथापि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आजपर्यंत 76 सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून 2 लाख 62 हजार 192 फुड पॅकेट्स तर 1 लाख 44हजार 812 लोकांना जेवण दिले आहे तसेच 1 लाख 12 हजार 871 किराणा किटचे वितरण सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. तसेच भारतीय अन्न महामंडळाकडून ओ.एम.एस.एस. या दराने गहू प्रति क्विंटल 2100 रुपये आणि तांदूळ प्रति क्विंटल 2200 रुपये या दराने विविध सामाजिक संस्थांनी भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदळाची खरेदी केली असून ती गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेली आहे. यामध्ये दुवा फाउंडेशन औरंगाबाद, मातृभूमी प्रतिष्ठान, प्रबोधन गोरेगाव मुंबई, डॉ. वेणू प्रकाश चॅरिटेबल सोसायटी, औरंगाबाद यांचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेचा व महानगरपालिका यांचा समन्वय ठेवून स्थलांतरित मजूर आणि कामगार वर्गासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 45 कॅम्प तयार करण्यात आले असून आतापर्यंत 9542 लोकांना नियमितपणे सकाळचा नाश्ता चहा आणि दुपारचे आणि रात्रीचे जेवण पुरविण्यात आलेले आहे.