अहमदनगर: काँग्रेस(आय) चे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठा धक्का बसला असून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस कुणाची वर्णी लावणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात टीकास्त्र सोडल्यानंतर विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचे राजकीय सुत्रांमार्फत समजते आहे.