साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारांचे केले पुण्यात वितरण
पुणे, दि.१५(आठवडा विशेष): महापुरुषांनी दिलेल्या समतेच्या शिकवणूकीच्या माध्यमातून समाजाचा विकास करण्यासाठी सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारांचे वितरण ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षि विठ्ठ्ल रामजी शिंदे कला महाविद्यालय येथे आयोजित भव्य कार्यक्रमात वितरित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा, ग्राहक मंत्री गिरीष बापट, राज्य मंत्री दिलीप कांबळे, खा.अनिल शिरोळे, आ.माधुरी मिसाळ, आ.गौतम चाबुकस्वार, आ.प्रशांत बंब, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यावेळी उपस्थित होते.
राज्यातील मातंग समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याऱ्या मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येकी रुपये २५ हजार शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व सपत्निक गौरव करण्यात येतो तर ६ संस्था यांना प्रत्येकी ५० हजार पुरस्कार शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येतो. हे पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी रुढी परंपरेविरुध्द व अस्पृश्यतेविरुध्द सामाजिक चळवळ उभारली भूमिहीन शेतमजुर व कामगारांसाठी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रह केले. त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अंत्यंत मोलाची कामगिरी केली आहे, त्यांचे हे कार्य विचारात घेऊन दरवर्षी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. १ व्यक्ती व १ संस्था यांना प्रत्येकी रुपये ५१ हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी ना पंकजाताई मुंडे यांनी, महापुरुष सर्व समाजाचे आहेत असे सांगितले. महापुरुषांच्या समतेच्या शिकवणूकीचा अंगिकार सर्वांनी करावा असे आवाहन केले.
सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जम्मू काश्मीर येथे सैन्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पुरस्कार प्राप्त मान्यवर, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.