मुंबई दि.२७:ऋषिकेश विघ्ने― भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या ‘टीम’ मध्ये पंकजाताई मुंडे यांचा समावेश झाला असून त्यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समावेशाने आता राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे नेतृत्व अधिक झळाळून निघणार आहे. दरम्यान, या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष नड्डा यांचे आभार मानले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या नव्या कार्यकारिणीत पंकजाताई मुंडे यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पंकजाताई मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील एक धडाडीच्या व आक्रमक नेत्या म्हणून पाहिले जाते. उत्कृष्ट वक्त्या, संघटन कौशल्य व काम करण्याची हातोटी या गुणांमुळे समाजातील सर्व जाती धर्मात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सन २०१३ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. या काळात तत्कालिन काॅग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात त्यांनी काढलेली ‘एल्गार’ यात्रा चांगलीच गाजली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ मध्ये ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि याचाच परिणाम म्हणून २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली. दोन वेळा आमदार राहिलेल्या पंकजाताई मुंडे यांनी भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले. ग्रामविकास, जलसंधारण, महिला बालविकास व रोजगार हमी योजना आदी खात्याच्या माध्यमातून लोक कल्याणाच्या अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या. केवळ राजकारणातच नाही तर सामाजिक कार्यातही तितक्याच धडाडीने काम करणा-या पंकजाताई मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्यांच्या घटना विरोधात मोठी जनजागृती केली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचित पिडित घटकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत तसेच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून गोरगरिबांचे संसार उभा केले.
आता पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिल्याने इथेही त्यांच्या नेतृत्वाची चूणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. पंकजाताई मुंडे यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्रातील तमाम भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून बीड जिल्हयात परळीसह ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
नेतृत्वाचे मानले आभार
या निवडीबद्दल पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, सह सरचिटणीस व्हि. सतीश यांचे आभार मानले आहेत.