बीड: आष्टी तालुक्यातील मंगरूळ गावातील माय-लेकरावर बिबट्याचा हल्ला

आष्टी:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे तूर काढत असताना माय-लेकावर बिबट्याने हल्ला चढवला. यात दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.२८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली.

शिलावती बाबा दिंडे (वय ४२) व अभिषेक बाबा दिंडे (वय १२) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेही माय-लेक आष्टीपासून जवळच असलेल्या मंगरूळ शिवारात तुरीचे पीक काढत होते. त्याचवेळी बिबट्याने हल्ला चढवला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली व जखमींना आष्टीच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ.मोराळे हे उपचार करत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी बिबट्याने पंचायत समिती सदस्य पतीचा बळी घेतला. त्यानंतर शिरूर तालुक्यातील महिलेवर हल्ला केला. यात महिला जखमी झाली, त्यानंतर आष्टी तालुक्यात 10 वर्षीय बालकाचा बळी तर वनविभागाच्या कर्मचार्‍यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यापाठोपाठ माय-लेकरावर हल्ल्याची ही घटना असल्याचे समोर आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


आष्टी तालुक्यातील किन्ही गावच्या त्या बारा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

आष्टी दि.२७:अशोक गर्जे
आष्टी तालुक्यातील किन्ही येथे बारा वर्षीय मुलगा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे पाहुणा म्हणून आला होता होता.आज दुपारी साडे अकराच्या सुमारास मुलाला नरभक्षक बिबट्याने उचलून नेले. गावातील नागरिकांनी मुलाचा शोध घेतला असता बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचे कळाले. सदरील घटना अत्यंत दुर्देंवी आहे.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी ,शेतमजुरांनी एकटे न राहता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधुन घरी परतावे. रात्री घराबाहेर झोपु नये. लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी.