पाटोदा:आठवडा विशेष टीम―हाताला काम-धंदा नसल्याने अनेक तरुणांचे लग्न जमणे अवघड होत चालले आहे अश्या परिस्थितीत आपल्याला विधानसभेला निवडुन दिल्यास संपुर्ण मतदारसंघात प्रत्येक झेडपी गटात, प्रसंगी इतर जिल्ह्यातही वधु-वर परिचय मेळावे घेऊन तरुणांचे लग्न जुळवण्याचे काम प्राधान्याने केले जाईल असं वक्तव्य आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील इच्छुक उमेदवार श्री. चांगदेव गिते यांनी केलं. ते काल पत्रकारांशी बोलत होते.
बीड जिल्हा हा कायम दुष्काळाच्या छायेत असतो त्यातल्या त्यात आष्टी-पाटोदा-शिरूर हे तिन्ही तालुके अत्यंत दुष्काळी पट्ट्यात येतात. सोबतच रोजगारांचे इतर साधनं उपलब्ध नसल्याने अनेक तरुणांना रोजगार नाहीत अन मागच्या काळात वरून स्त्री-भ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या कमालीची घटलेली असलेली असल्याने अनेक तरूणांचे विवाह खोळंबळे आहेत. अनेक तरुण लग्नाचे वय पार करत आहेत व ही समस्या गंभीर बनत आहेत. त्यामुळे आपल्याला आमदार केल्यास तरुणांना बँका मार्फत, सरकार मार्फत व्यवसायासाठी कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करेन. संपुर्ण मतदारसंघात नौकरी महोत्सव आयोजित केले जातील. कारण ज्या तरुणांना नौकरी नाही किंवा जे काही आर्थिक अडचणीमुळे व्यवसाय करू शकत नाहीत अश्यांना मुली देण्यास पालक धजावत नाहीत. त्यामुळे या प्रश्नात जातीने लक्ष घालुन हा प्रश्न प्राध्याण्याने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ही श्री.गिते म्हटले. भविष्यात ही अशी परिस्थिती उदभवू नये याकरीता मुलींच्या जन्मदर वाढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करेन व आपल्या भागात छोटे-मोठे उद्योग उभारले जातील जेणेकरून ज्याचा विवाह जुळत नाही त्याला प्राधान्याने काम दिलं जाईल व लग्न जुळण्यासाठी प्रयत्न केले जातील. एकुणच आमदार होण्यासाठी गिते यांनी कंबर कसली असुन अनेक मुद्द्यासह आता एका गंभीर पण तितक्याच दुर्लक्षित व कोणी बोलायला तयार नसलेल्या मुद्द्याला हात घातला आहे. आमदार होण्यासाठी आता सार्वजनिक प्रश्नासोबत वयक्तिक प्रश्नाकडे ही गिते यांनी लक्ष घातल्याचे दिसुन येत आहे.