हातकणंगले दि.०७ : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत राजू शेट्टी यांच्याविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२५ अन्वये राजू शेट्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.भरारी पथक क्र.३ प्रमुख घोडके यांनी याबाबतची फिर्याद दिली होती.
हातकणंगले येथील हेरलेमधील ग्रामपंचायतीसमोर २ तारखेला झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ‘सीमेवर आमची पोरं जातात, देशपांडे-कुलकर्ण्यांची नाही. कुलकर्णी, देशपांडे, जोशी आडनावाच्या व्यक्ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत. शेतकर्यांचीच मुले सैन्यात असतात’, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
राजू शेट्टींच्या या वक्तव्याबद्दल विविध संघटनांनी शेट्टी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. अनेक संघटनांनी निवडणूक आयोग तसेच निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तक्रार दाखल केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी राजू शेट्टी यांना शुक्रवारी नोटीस बजावली. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर आपला खुलासा २४ तासांत सादर करावा,असेही या नोटीस मध्ये स्पष्ट उल्लेख होता.
राजू शेट्टी यांना शुक्रवारी नोटीस दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा खुलासा अपेक्षित होता. रात्री उशिरापर्यंत शेट्टी यांनी नोटीस ला उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे अखेर राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले. त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.