सक्तीची विजबिल वसुली, अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळांच्या अनुदानासाठी शेतक-यांचे बैलगाडीसहीत चक्काजाम आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रझाकारी पद्धतीने कृषिपंपाची विजतोडणी करून कोरोना कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ व तात्काळ विजजोडणी करण्यात यावी तसेच मांजरसुंभा महसुल मंडळातील २३ गावे खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासुन वगळण्यात आली असून त्या गावातील शेतक-यांना अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय मांजरसुंभा येथील राधिका हाॅटेल समोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, , प्रदेशउपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे,भाजपा तालुकाध्यक्ष बीड स्वप्निल गलधर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा बीड बाळासाहेब मोरे,भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष बीड, सौ. वैशालीताई चौरे,उपसरपंच कोळवाडी तुळशीदास महाराज शिंदे, युवा नेते मसु जाधव, सरपंच पालसिंगन विक्रम खंडागळे,सरपंच हिंगणी अंकुश गोरे,उपसरपंच चाकरवाडी, हनुमान चाळक, चेअरमन सेवा सोसायटी सात्रा पोपटराव हावळे, सरपंच बोरखेड बाळासाहेब गावडे, अशोक घोडके, दत्ता जगदाळे, माजी सरपंच शहाजी आण्णा घोडके, बाळासाहेब ढास,नाना चव्हाण, काशिनाथ मांडवे,संभाजी कदम, महादेव नाईकवाडे,विष्णु सुरवसे महाराज, आजिनाथ घरत, दादासाहेब वाघमारे,राहुल खोसे,कल्याण कागदे, आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष बीड माजी सैनिक अशोक येडे, भाजपा युवा नेते अशोकदादा रसाळ,शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक, ऑल इंडीया पॅथर मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, वंचित बहुजन आघाडीचे सहसचिव शेख युनुस च-हाटकर, वंचित नेते संदिप जाधव,आदिंनी आवाहन केले आहे.

जिल्हाप्रशासनाने शब्द न पाळल्यामुळे चक्काजाम आंदोलन
____
३० नोव्हेंबर रोजी बिंदुसरा तलावातील जलसमाधी आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता निकम, व उपअभियंता ग्रामिण गुंजाळ यांनी फोनवरून अधिक्षक अभियंता महावितरण कोलप यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन प्रति रोहीत्र २५,००० रू भरून विजजोडणी करण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु महावितरणच्या आधिका-यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे दि.६ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते परंतु ६ डिसेंबर रोजी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन व” हाय अलर्ट “मुळे पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढु नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे या भुमिकेतुन तूर्तास स्थगित करून दि.९ डिसेंबर गुरूवार रोजी सकाळी ११:३० वाजता मांजरसुंभा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून महावितरण व महसुल प्रशासनातील आधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतरच चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात येईल असे निवेदन महावितरण, महसुल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

केज: चंदनसावरगांव पासून ३ कि.मी. परिसरातील कन्टेनमेंट झोन आणि त्यापुढील ४ कि.मी. परिसरातील बफर झोन शिथील

बीड, दि.३:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील चंदनसावरगांव येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे गावापासून ३ कि.मी. परिसरातील गावे कन्टेनमेंट झोन आणि त्यापुढील ०४ कि.मी. परिसरातील गांवे बफर झोन जाहीर करुन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही. तसेच शासनाचे नियमानुसार मधील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याचे कळविले असल्याने चंदनसावरगांव पासून ३ किलोमीटर परिसरात चंदनसावरगांव, भाटूंबा, केकतसारणी, कुंभेफळ, बनकरंजा हा परिसरातील कन्टेनमेंट झोन व ४ कि.मी. परिसरातील आनंदगांव सारणी, जवळबन, ढाकेफळ, जानेगांव, होळ, कळंबअंबा, मानेवाडी व उंदरी हि गावे ७ किलोमिटर परिसरात येत असुन त्या ठिकाणीचे बफर झोन शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.


सोलापूर: रुग्णसेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

सोलापूर:आठवडा विशेष टीम― रुग्णसेवा न देणाऱ्या खासगी दवाखान्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खासगी दवाखान्यांना भेट देऊन रुग्ण सेवा देतात की नाही याची पाहणी केली. तसेच रुग्ण व डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर होते.
कोविड-नॉन कोविड रुग्णांची सोय व्हावी, यासाठी खासगी दवाखान्यांना पालकमंत्री भरणे यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तसेच ज्या दवाखान्यामध्ये अधिसूचित नियमानुसार डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व जीवरक्षक प्रणाली उपलब्ध नाही अशा दवाखान्यांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करु, असे आदेश श्री.भरणे यांनी दिले. या भेटीदरम्यान उपस्थित डॉक्टर, त्यांच्या वेळा व ओपीडी रजिस्टर याबाबत चौकशी केली. हॉस्पिटलच्या अडचणी समजून घेतल्या. काही खासगी दवाखान्यांनी उत्तम काम केल्याबद्दल अभिनंदनही केले. सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित असून सोलापूर कोरोना मुक्त करण्यासाठी सर्व दवाखान्यांची मदत लागणार आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास दवाखान्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.भरणे यांनी शहरातील जोशी हॉस्पिटल व लॅब, केळकर हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, यश क्लिनीक, धांडोरे हॉस्पिटल, उत्कर्ष हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, सोलापूर सहकारी रुग्णालय व आश्वनी हॉस्पिटलना भेटी दिल्या.

कोरोनासह सर्व साथरोगांचे निदान आता यवतमाळ जिल्ह्यात – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ:आठवडा विशेष टीम― सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण मानवजातीला संकटात टाकले आहे. या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा उपचाराबाबत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र कोणत्याही रोगाच्या योग्य उपचारासाठी त्याचे निदान त्वरीत होणे गरजेचे आहे. आतापर्यंत कोरोनाचे नमुने तपासणीकरीता आपण दुसऱ्यावर अवलंबून होतो. मात्र नमुने तपासणीच्या अत्याधुनिक मशीन वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाल्यामुळे कोरोनासह सर्व साथरोगांचे निदान आता यवतमाळातच होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. टी.सी.राठोड आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अडचणींचा सामना करून अखेर ही प्रयोगशाळा यवतमाळात सुरू करता आली, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घटनेचे आपण साक्षीदार आहोत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत विदेशातून मशीन आणणे, विविध स्तरावर परवानगी घेणे, हे सर्व जोखमीचे काम होते. त्यातच या मशीन सिंगापूरला अडकल्या. त्यामुळे ही प्रयोगशाळा यवतमाळ येथे सुरू होणार की नाही, याबद्दल मनात शंका निर्माण होत होती. मात्र जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात संपूर्ण यंत्रणेने आलेल्या अडचणींवर मात करून हे शक्य करून दाखविले. यासाठी संपूर्ण प्रशासन अभिनंदनास पात्र आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुरुवातीला दुबई, मरकज आणि आता मुंबई-पुणे येथून आलेल्या लोकांमुळे वाढली आहे. या बाधित असलेल्या लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविल्यानंतर रिपोर्ट यायला उशीर लागत होता. त्यामुळे सदर लोक पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळत नव्हते. यादरम्यान पॉझिटिव्ह असलेले लोक कुठे कुठे फिरले असेल, किती लोकांच्या संपर्कात आले असतील, याचा अंदाजच लागत नव्हता. मात्र आता कोरोनाची लक्षणे असलेले नमुने इतरत्र पाठविण्याची गरज नाही. तसेच त्याचे निदान यवतमाळ येथे होणार असल्याने उपचार मिळण्यास मदत होईल. केवळ कोविडचे नमुनेच नाही तर या प्रयोगशाळेत सर्व साथींच्या रोगांचे तसेच एचआयव्ही, चिकनगुनीया, डेंग्यू आदींचे नमुने तपासणी करून निदान करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आपल्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अतिशय चांगले आहे. आरोग्य विभागामुळे सर्वांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कोरोना विरुद्धच्या या युद्धात सर्वांनी प्रशंसनीय काम केले असले तरी ही लढाई संपली नाही. सर्व योद्धे व नागरिकांच्या सहकार्याने ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासन आणि प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच यवतमाळला मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉपकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांचे त्यांनी आभार मानले.

तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात एमआरआय मशीन आणि त्याकरीता बांधण्यात येणाऱ्या सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात एमआरआय मशीनकरीता शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्व सुविधांनी उपयुक्त असलेली ही इमारत लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, तबलिगी लोकांचे नमुने १ एप्रिलला तपासणीकरीता पाठविले मात्र त्याचा रिपोर्ट ८ एप्रिलला प्राप्त झाला. हे रिपोर्ट एक-दोन दिवसातच मिळाले असते तर एवढा संसर्ग झाला नसता. आठ दिवसाच्या विलंबामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला. येथे प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यासाठी खनीज विकास निधीतून ३.५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. प्रयोगशाळा जरी कार्यान्वित झाली असली तरी जास्त कोरोनाबाधित रुग्ण येऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रयोगशाळेविषयी माहिती देताना डॉ. गुजर म्हणाले, ही प्रयोगशाळा मायक्रोबॉयलॉजी विभागांतर्गत कार्यान्वित राहणार आहे. वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी १३ मशीनचा एक संपूर्ण सेट आहे. २४ तासात जवळपास १२५ ते १५० चाचण्या करता येऊ शकतात. येथे कार्यरत डॉक्टर आणि स्टाफचे नमुन्यांच्या निदानाबाबत नागपूर एम्स येथे प्रशिक्षण झाले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह यांनी तर आभार डॉ. गुजर यांनी मानले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, डॉ. हिवरकर, डॉ. बाबा येलके, डॉ. गवार्ले, डॉ. धकाते, डॉ. विजय डोंबाळे, आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या 72 दिवसांत प्रशांत शिंदे यांची सामाजिक बांधिलकी ; 7200 गरजूंना केली सर्वोतोपरी मदत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― एकिकडे कोरोना आणि त्यामुळे झालेले लॉकडाऊन गोरगरीब,गरजू लोकांना मरण यातना देत आहे.तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या मागील 72 दिवसांत एक देवदूत म्हणून पुढे आलेल्या प्रशांत शिंदे यांनी 7200 गरजूंना सर्वोतोपरी मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

येथील दत्तकृपा मोबाईल शॉपी व मित्र परिवार यांच्या कडुन सामाजिक जाणिवेतून लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून गेल्या 72 दिवसांत 7200 गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे येत विविध माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे.पोलीस बांधवांना मास्क,सॅनिटायझर वाटप केले.त्याच सोबत पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांना व अत्यावश्यक सेवेत असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांना मोफत चहा,पाणी,नाष्टा,जेवण,फळेदेणे तसेच गोरगरीब लोकांना भाजीपाला,अन्नधान्य कीट वाटप करणे.शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या गरीब,गरजू,मनोरूग्ण यांना शोधून त्यांना खिचडी,पोहे,पोळी- भाजी,भोजन देणे हे कार्य लॉकडाऊन कालावधीत 21 मार्च ते 1 जून या तब्बल 72 दिवस सुरू होते. हे कार्य लॉकडाऊन शिथील होईपर्यंत सुरूच राहणार आहे असे हॉटेल अमरजाचे संचालक चंद्रकांत आबा शिंदे,दत्तकृपा मोबाईल शॉपीचे संचालक प्रशांत शिंदे यांनी सांगितले होते.त्यानुसार त्यांनी हे सेवाकार्य केले.त्याचा समारोप 1 जून रोजी झाला.यासोबतच “रकदान हेच जीवदान” हे वाक्य डोळ्यांसमोर ठेवून प्रशांत शिंदे यांनी स्वता:हून अनेकदा रकदान ही केले आहे.शिंदे यांच्या या कार्याला डॉ.धनाजी खाडे,अमित जाजू यांचे ही आर्थिक सहकार्य लाभले आहे.समाजात काही माणसे ही संकटाला घाबरणारी असतात.तर काही जण हे संकटातून मार्ग काढून यश मिळवणारी असतात.कोणता ही हेतू,स्वार्थ किंवा दृष्टिकोन डोळ्यांसमोर न ठेवता कोरोनाच्या संकटात अगदी निस्वार्थी भावनेने प्रशांत शिंदे यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे.या लोककार्यात त्यांचे बंधू दिपक शिंदे,चुलते सुधाकर शिंदे,शेख रशीदभाई,कुलदीप परदेशी,
गौरव कांबले,श्रीकांत धायगुडे,ईश्वर वाघमारे, दिपक गादेलवाड,नईम कुरेशी,अनिकेत थिटे,अक्षय परदेशी,ऋषिकेश आंधळे, पत्रकार अतुल जाधव,सय्यद सादेक,सौरभ चौधरी,योगेश सुकटे,निकी साहू,साईराज देवकर,बापू कुडगर,सय्यद सोहेल,ग्रामीण भागातील शेतकरी बांधव यांचेसह प्रशांतदादा शिंदे मिञ मंडळाचे सहकार्य लाभत आहे.प्रशांत शिंदे यांनी सलग 72 दिवस सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.


बीड: गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू– जिल्हाधिकारी

बीड दि.०३:आठवडा विशेष टीम― गेवराई तालुक्यातील सिरसदेवी कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आला आहे. यामुळे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केलीआहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आल्याने या गावामध्ये कन्टेनमेंट झोन. (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारीप्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.


कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रूपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत

मुंबई दि.३:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत प्राप्त झाली आहे. २८ हजार ८०० टेस्टिंग किटसह, व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, आदी संसाधनांचा यात समावेश आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे आभार मानले.
हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली असून यात ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटस, तसेच ५ कोटी रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सिजन सकेंद्रक (oxygen concentrators) यांचा समावेश असलेली वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे बिझिनेस ॲन्ड कम्युनिकेशन हेड श्री. प्रसाद प्रधान यांनी पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी महापालिका आणि खासगी रुग्णालयांना ही स्वछता आणि आरोग्यविषयक साधने मदतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे.

कोविड विषाणूच्या विरोधात लढतांना आतापर्यंत राज्यातील जनतेने तसेच राज्यातील उद्योजक, व्यापारी वर्ग, स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्ती-संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सहकार्याच्या या हजारो हातांमुळे कोरोना विषाणू विरोधात लढतांना शासनाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागास आरोग्य विषयक संसाधने उपलब्ध करून दिल्याने कोविड योद्धे म्हणून लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नक्कीच मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ला त्यांनी मनापासून धन्यवाद दिले आहेत.

#CoronaVirus औरंगाबाद जिल्ह्यात २ जूनला ‘६२’ जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 1085 कोरोनामुक्त, 480 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद दि.०२:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 480 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 62 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1649 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (1), किराडपुरा (2), चंपा चौक (1), कटकट गेट (1), नारळीबाग (1), गणेश कॉलनी (1), जवाहर नगर (3), भीम नगर (2), हमालवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), नाथ नगर (2), ज्योती नगर (1), फजलपुरा परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-3 सिडको (1), एमजीएम परिसर (1), रोशन गेट (1) , विशाल नगर, गारखेडा परिसर (1), एन-सहा संभाजी कॉलनी (7), समता नगर (6), अंहिसा नगर (1), मुकुंदवाडी (1), विद्या निकेतन कॉलनी (1), न्याय नगर (1), बायजीपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (4), विजय नगर (2), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (1), नेहरु नगर (1), जुना मोंढा नाका परिसर (1), सिडको वाळूज महानगर (1), तक्षशील नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), राजा बजार (1), कोतवाल पुरा (1), भाग्य नगर (1), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला आणि 35 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1085 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 02, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 06 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1085 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत पाच, खासगीत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 02 जून रोजी मध्यरात्री एक वाजता शहागंज येथील 54 वर्षीय पुरूष, पहाटे चार वाजता पिसादेवी रोड, गौतम नगर येथील 69 वर्षीय स्त्री, सकाळी 7 वाजता कैलास नगर येथील 56 वर्षीय पुरूष, दुपारी 2.30 वाजता गणेश कॉलनीतील 61 वर्षीय पुरूष, दुपारी 3.30 वाजता बायजीपुरा येथील 55 वर्षीय महिला या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या 64 वर्षीय पुरूष रुग्णाचा 1 जून रोजी रात्री 11.30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 68, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 15, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 84 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.


औरंगाबाद जिल्ह्यात १०२२ कोरोनाबाधित, आज ६० रुग्णांची वाढ

औरंगाबाद दि.१८:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद शहरात आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1022 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1), रोशन गेट (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 33 पुरुषांचा समावेश आहे.

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या मदनी चौकातील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा 17 मे रोजी सायं.सहा वाजता, पैठण गेट येथील 56 वर्षीय महिला रुग्णाचा 18 मे रोजी मध्यरात्री 12.30 वाजता आणि बुड्डी लेन येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा एकूण तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मागील चोविस तासात शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत घाटीमध्ये 31, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 34 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
सध्या घाटीत 72 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत असेही कळवले आहे.