बीड जिल्ह्यात आज 113 जण कोरोना पॉझिटिव्ह ,पहा कुठले आहेत रुग्ण

बीड दि.७ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम―आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात ११३ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत.रुग्ण बीड अंबाजोगाई ,परळी ,केज ,गेवराई ,आष्टी ,माजलगाव ,धारूर व शिरूर कासार या तालुक्यातील आहेत.आजच्या अहवालात पाटोदा तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही.सहवासित रुग्णाची संख्या जास्त आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो घराबाहेर पडूच नका.

बीड: कोविड-१९ लढ्यात रुग्णालयातील खरेदीसाठी खर्चीत १५ कोटींची व रुग्णांची हेळसांड – डॉ गणेश ढवळे

अनागोंदी कारभार प्रकरणाची चौकशी स्वतंत्र कमिटी गठीत करून करण्याची मागणी

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी व रोग निवारणासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत. केवळ बीड जिल्हा शासकीय रूग्णालय व स्वाराती अंतर्गत इतर ठिकाणी रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयाच्या परिसरात 30 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यासाठी दिला आहे.विशेष म्हणजे औषधी खरेदी,कोरोना प्रादुर्भावावरील साहित्य, कोविड रूग्णालय सुरू करणे, वैद्यकीय साहित्य,साधन,यंत्र सामुग्री त्याचबरोबर पॉझिटिव्ह रूग्णांना श्‍वास घेण्यासाठी ऑक्सीजन प्लँट व पाईपलाईन. त्याचबरोबर विद्युतीकरण व इतर गोष्टीसाठी अंदाजे 15 कोटीच्याजवळ खर्च केला आहे. मात्र एवढा खर्च होऊनही लाईट गेली, व्हेन्टीलेटर बंद पडले आणि तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला.यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दुपारी उठून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी पत्रकबाजी केली.एवढेच नव्हे तर जिल्हा रूग्णालयात काय खरेदी केली,काय सुविधा पुरविल्या हे उघडपणे सांगण्यात डॉ.अशोक थोरात कमी का पडत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात कोट्यावधी रूपयांचा खर्च कशावर झाला? केवळ कागदोपत्री दाखविल्या का? या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी व चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैद्यकीय कमिटी स्थापन करून जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून खर्च झालेल्या ठिकाणची पाहणी करावी अशी मागणी करत असताना राजकीय पुढार्‍यांनाही आवाहन केले आहे की पुढार्‍यांनो कोरोनाबाधित रूग्णांच्या संवेदना ओळखा डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालू नका अशी भावनात्मक हाक जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णावर उपचारासाठी अथवा या आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी व शासनाकडून करोडो रूपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कशावर किती खर्च झाला याची माहिती पाहिली तर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जणू काही जिल्हा रूग्णालय बांधल्यापासून विद्युतीकरण झाले नाही असे भासवून विद्युतीकरणावर 52 लाख 81 हजार रूपये, ऑक्सीजन प्लँट,पाईनलाईन 5 कोटी 18 लाख 47 हजार रूपये,कोरोना वार्डातील अधिकारी,कर्मचारी निवारणीसाठी इमारतीचे विद्युतीकरण 3 लाख 19 हजार,प्रयोगशाळेची सुधारणा 28 लाख,जिल्हा शासकीय रूग्णालयातील अनेक वार्डचे कोविड कक्षात रूपांतरावर लाखो रूपयांचा खर्च केला आहे.त्यामुळे एकंदरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरातांनी चालवलेला हा सावळा गोंधळ आणि रूग्णांची हेळसांड झालेली पाहता सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.कोट्यावधी रूपये खर्च करून पॉझिटिव्ह रूग्णांची हेळसांड होतेय कशी? विद्युतीकरणावर लाखो रूपये खर्च करून लाईट जाते कशी? रूग्णाचा तडफडून मृत्यू होतो कसा? ही जिल्ह्यासाठी आणि डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालणार्‍या राजकीय पुढार्‍यासह इतर जणांना रूग्णांची हेळसांड, रूग्णांचा मृत्यू यांच्या संवेदना दिसून येत नाहीत का? त्यामुळे अशोक थोरातांनी कोरोना संदर्भात जो खर्च दाखविला आहे त्या सर्व खर्चाची विभागीय आयुक्त मा.सुनिल केंद्रेकर यांनी चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लँट,पाईपलाईन, विद्युतीकरण यासह ज्या ठिकाणी खर्च दाखविला आहे त्याची चौकशी,तपासणी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणाहून एक कमिटी पाठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्तांना मा.राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केलेल्या ईमेलद्वारे केली आहे.

Coronavirus बीड जिल्ह्यात आज(दि.२०) ९ जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.२०:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.२० रोजी पाठवलेले ७७ स्वॅब पैकी ६८ स्वॅबचा कोविड-१९ कोरोना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.तर ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

आज कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची माहिती―

  • २ व्यक्ती – २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला – रा.झमझम कॉलनी, बीड
  • १ व्यक्ती – २६ वर्षे महिला – रा. शहेनशहा नगर, बीड
  • ४ व्यक्ती – ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा – रा.बशिरगंज, बीड
  • २ व्यक्ती – ३१ वर्षे महिला, ८ वर्षे मुलगा – रा.चिंचपूर ता.धारूर (औरंगाबादहून आलेले)

होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा कीट वाटणार की ग्रामपंचायतची भरती करणार ? ऊसतोड मजुरांचा सवाल ! – डॉ ढवळे

पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची संघटीत गुन्हेगारी मोडीत काढा

जिल्हाधिकारी यांचा वचक राहीला नाही, १४ दिवस झाले सरपंच, ग्रामसेवक फिरकलेच नाहीत ―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश दि.०७:आठवडा विशेष टीमबीड तालुक्यातील मौजे बेलगांव येथिल साखर कारखान्यावरून गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करुन देणे सोडाच आज दि.७/०५/२०२० रोजी वार गुरुवार दुपारी १२ वाजेपर्यंत कुणीही भेटायला आले नाहीत, आठवड्यापूर्वी पालकमंत्री मुंडे यांनी घोषणा केलेले मोफत कीराणा कीट ८ दिवस झाले तरी आमच्यापर्यंत पोहोचले नाही ,होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा किट वाटणार आहात कि ग्रांमपंचायतची भरती करणार असा संतप्त सवाल ऊसतोड मजुरांनी केला आहे.

विशाल काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

मो.नं.९३५९२१११८६

आम्ही जवाहर कारखान्यावरुन येऊन १४ दिवस झाले, सरपंच, ग्रामसेवक भेटलेच नाहीत, ग्रां.पं.शिपाई बापु थोरात यांनी सांगितले सरपंचांनी गावठाणा बाहेर रहायचे सांगितले आहे. आज १४ दिवस झाले आम्हाला सरपंच, ग्रामसेवक भेटायला आलेच नाहीत. तलाठी दोन वेळेस आले पण इथं लाईट, पिण्याचे पाणी काहीच सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही म्हणाले तुमचं तुम्ही बघा.

सविता काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

आम्हाला पिण्याच्या पाण्याची, लाईटची कसलीही सोय केली नाही, १४ दिवस झाले २ कीलोमीटर डोंगरातुन तलावाखालच्या झ-यातुन पाणी आणावे लागते ,ऊन्हातान्हात लहान लेकरांचे हाल होत आहेत, १४ दिवसात धान्य दिले नाही, लाईटची सोय नसल्याने विंचू काट्याची भिती वाटते. पालकमंत्री मुंडे साहेबांनी मोफत किराणा किट देऊ म्हणलेले आठवड उलटुन गेला.अजुन काहीच दिले नाही. आम्हाला आमच्या गावातील घरी जाण्याची परवानगी द्यावी.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश

पालकमंत्री मुंडे साहेबांनी ऊसतोड मजुरांना मोफत किराणा किट देण्याची घोषणा होऊन आज ८ दिवस झाले, दि.५ तारखेला अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना लेखी आदेश ५ तारखेला दिले आहेत. परंतु सरपंच, ग्रामसेवक, आणि तलाठी हे त्यांच्या संघटनेच्या जोरावर संघटीत गुन्हेगारी करत आहेत ती पालकमंत्र्यांनी मोडीत काढावी.
दि. २३/०४/२०२० रोजी जिल्हाधिकारी बीड तथा अध्यक्ष राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण यांनी ग्रामसेवक, तलाठी यांनी मुख्यालयी रहावे अन्यथा राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचा कनिष्ठ स्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांना धाक राहीला नाही त्यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केली जाते.त्याबद्दल राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.आणि २ दिवसांच्या आत मोफत किराणा किट वाटप करण्यात यावे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य , कार्यकारीणी आधिकारी , जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अन्नपुरवठा व पुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


#CoronaVirus : लॉकडाऊन कालावधीत कोविड-१९ संदर्भात राज्यात आतापर्यंत ९१ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.०३:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९१ हजार २१७ गुन्हे दाखल झाले असून १८ हजार ४८ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८२ हजार ८९४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६३० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

  • या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ५१ हजार ७१९ वाहने जप्त करण्यात आली.
  • परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

  • या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७३ घटनांची नोंद झाली असून यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने ५१ पोलीस अधिकारी व ३१० पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या २८पोलीस अधिकारी व २८१ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.


बीड: पोखरी येथिल भोसले दलित वस्ती मुलभूत सुविधा पासून वंचित,जीव धोक्यात घालून पाणी शेंदतात― डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल भोसले दलित वस्ती एकुण २५ घरे असुन १०० मतदार आहेत.बहुतांशी लोक ऊसतोड मजूर म्हणून वर्षातुन ४महीने ऊसतोडणी मजूर म्हणून बाहेर गावी असतात, रस्ते, पिण्याचे पाणी या. मुलभुत सुविधा पासून भोसले वस्ती वंचित आहे.

शिल्पा भोसले :

वस्ती वर रस्ता , पिण्याचे पाणी , अंगणवाडी, समाज मंदीर या मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याचे पाणी १ ते दीड कीलोमीटर अंतरावरील भिमा भोसले , रमेश शिंदे , कल्याण भोसले यांच्या बोअर वरुन आणावे लागते.आम्हाला दारात नळयोजना हवी.

दिलीप भोसले :

दारिद्रय रेषेखालील योजनांचा लाभ श्रीमंत उचलतात त्यांचीच नावे यादित आहेत.पाठीमागे रमाई घरकुल आवास योजनेच्या नावाखाली सर्वे करण्यात आला.प्रत्येकी १००रु व्यक्तिमागे घेतले .नंतर कळाले गावपुढा-याने सर्वे केलेलीं यादि फाडून टाकली.समाजमंदिराची पडझड झाली असुन वारंवार सरपंच , ग्रामसेवक निवडणूक कालावधीत केवळ करतो हे आश्वासन देतात परंतु नंतर सोयीस्कररीत्या विसरतात.

चंद्रभागा भोसले :

६५ वर्ष वय माझे आहे तेव्हापासून या विहीरीतील पाणी सांडपाणी म्हणून वापरतात.या विहीरीला चहुबाजूंनी कठडा नाही.ऊसतोड मजुर बाहेरगावी गेल्यानंतर लहान मुले , वयस्कर बाई माणसाला पाणी शेंदावे लागते. या विहीरीला चहुबाजूंनी संरक्षक भिंत बांधावी आणि वयस्करांसाठि घरोघरी नळ द्यावे एवढंच गा-हाणं आहे

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड:

जीव धोक्यात घालून पाणी शेंदणाऱ्या महिला ,मुलांबाळाचा त्रास कमी व्हावा यासाठी घरपोच नळयोजना हवी.

सोयगाव: चक्क विहिरीत आढळले गावठी दारूचे रसायन ; घोसला शिवारातील घटना ,पोलिसांचा छापा

सोयगाव,दि.२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
घोसला ता.सोयगाव शिवारातील एका कोरड्याठाक विहिरीत तब्बल २५ कॅन गावठी दारू गाळपचे रसायन शनिवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी लॉकडाऊनचं गस्तीत जप्त करून नष्ट केले आहे.या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली असून अद्याप रसायनाची किंमत हाती आली नाही.
लॉकडाऊनची गस्तीत असलेल्या पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार घोसला शिवारात एका कोरड्या विहिरीत हजारो रु किमतीचे गावठी दारू गाळप करण्याचे रसायन लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळावर छापा घातला असता,त्या कोरड्याठाक असलेल्या विहिरीत तब्बल २५ कॅन गावठी दारू गाळपचे रसायन शनिवारी हस्तगत करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर पाटील व प्रकाश पाटील सरपंच,निमखेडी पोलीस पाटील भगवान शिंदे यांच्या समक्ष हे रसायन नष्ट करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात छुप्या मार्गाने गावठी दारू गाळप करून विक्री करण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी हे रसायन लपवून ठेवल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,विनोद कोळी आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

लॉकडाऊन काळात ही डॉ राहूल धाकडे यांची अविरत रूग्णसेवा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रांत सतत अग्रेसर असणारे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉ.राहूल धाकडे यांनी कोरोना या जिवघेण्या संकटात व लॉकडाऊन काळात दररोज आपला दवाखाना सुरू ठेवला.रूग्णांना तत्पर व आपुलकीने आरोग्य सेवा दिली.त्याबद्दल रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी धन्यवाद देवून डॉ.राहुल धाकडे यांचे आभार मानले.

लॉकडाऊन कालावधीत डॉ.राहूल धाकडे यांनी मोबाईल,मेसेजद्वारे नियमीत रुग्णाला वैद्यकिय सल्ला देवून शहरात हजारो रुग्णांची सेवा केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.कोरोना हे जिवघेणे संकट आल्यापासून साथजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून अनेक नामांकित डॉक्टर बांधवांनी आपले दवाखाने बंद ठेवणेच पसंत केले. पुणे,मुंबई,औरंगाबाद, लातूर अशा शहरात चांगले डॉक्टर घरात बसले.मात्र ज्यांच्या अंगी सामाजिक संवेदना आणि आरोग्य सेवा भिणलेली आहे.अशांनी माञ आपला जिव धोक्यात घातला.पण,रूग्णसेवा केली.त्यापैकीच डॉ.राहूल धाकडे हे एक आहेत. संकटकाळात एक ही दिवस त्यांनी दवाखाना बंद ठेवला नाही.रोज ओपीडी सुरू ठेवली.असंख्य रुग्णांवर उपचार केले.खरे तर संकट सर्वांना सारखेच.पण, धन्वंतरीचे दूत म्हणून अशावेळी लोकांना तपासणे,आरोग्य सेवा देणे हा कर्तव्याचा भाग समजून डॉ.राहुल धाकडे हे काम करीत आहेत.डॉ.राहूल धाकडे हे सर्वपरिचित असून गावचे भुमीपूत्र आहेत.अतिशय कष्टातून, आई-वडिलांच्या पुण्याईने पुढे आले.सर्व परस्थितीची जाणिव असल्याने या संकटात त्यांनी आपला दवाखाना सुरू ठेवून रुग्ण सेवा केली.सोशल डिस्टन्स पाळून व मास्क बांधून, सॅनिटायझर वापरून दररोज बहुतांश रुग्णांची तपासणी केली.मागील 10 वर्षांपासुन वैद्यकीय क्षेत्रात ते ह्रदयरोग,छातीविकार तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.आशा आयसीयुचे ते संचालक आहेत.कोरोना संकट व लॉकडाऊन काळात त्यांनी अतिदक्षता तज्ञ म्हणून संपुर्ण जबाबदारी सांभाळली.अंबाजोगाई शहरात ते माता रमाई महोत्सव,आशा आयसीयुच्या वर्धापन दिनी प्रबोधनपर उपक्रम राबवितात.साहित्य,नाट्य व सांस्कृतिक क्षेत्राशी ते निगडीत आहेत.त्यांच्या योगदानाचे सर्वञ कौतूक होत आहे.त्यामुळे डॉ.धाकडे हे देवदुताची भुमीका बजावत असल्याचे उमेश जोगदंड,सामाजिक कार्यकर्ते विशाल जगताप आणि प्रवीण पोटभरे यांचेसह अनेकांनी स्वत: सोशल मिडियावर पोस्ट करून सांगितल्याचे दिसून येते.

*रूग्णसेवा आमचे कर्तव्य..!*

रूग्णांची सेवा हे तर आमचे कर्तव्यच आहे.तसेच रूग्ण हा आमच्यासाठी ईश्वर ही आहे.कोरोना या संकटामुळे लोक घाबरले आहेत.मग,अशावेळी आम्ही नाही.तर कोण येणार मदतीला.? आमच्या कुटुंबात बहिण आणि पत्नी या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत त्यांनी या काळात अनेक गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा दिली.मी देखील अनेकांचे तत्पर निदान केले.योग्य औषधोपचार केले.तर काहींचे ह्रदयविकार दुर करून त्यांचे प्राण वाचविता आले याचे समाधान आहे. *――डॉ.राहुल धाकडे,अंबाजोगाई.*

महाराष्ट्र दिनी जिल्हा काँग्रेसच्या ३५ महिला कार्यकर्त्यांसह ५१ जणांचे रक्तदान

अंबाजोगाई:रणजित डांगे― महाराष्ट्र दिनानिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवार,दिनांक 1 मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह चौथ्या टप्प्यात 35 महिला भगिनींसह 51 जणांनी रक्तदान करून महाराष्ट्र दिन साजरा केला अशी माहिती शिबिराचे आयोजक तथा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने आज पुन्हा चौथ्यावेळी शुक्रवार,दिनांक 1 मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी नगरसेवक मनोज लखेरा,काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,सुनिल व्यवहारे, धम्मा सरवदे,राणा चव्हाण, गणेश मसने हे उपस्थित होते.या शिबिरात नगरसेविका ज्योती धम्मपाल सरवदे, माजी नगरसेविका उषाताई गणेश मसने,सुनील व्यवहारे,गणेश मसने, अशोक देशमुख,मीरा गाडे आरती सोलंकर,गंगा कांबळे,सत्यभामा फकिरे, श्रुती तांबारे,तनुजा आदमाने,ऋतुजा भारती, वसुंधरा भारती,सविता माने,कल्पना पवार,शुभांगी सूर्यवंशी,सुजाता नावंदर, रेखा वेडे,आशा देशमुख, अंजली साखरे,अश्विनी गाढे सविता कचरे,सारिका लाड, अलका पवार,सत्वशीला लाड,सविता मसने,मंगल लोंढाळ,सविता पवार,स्वाती आदमाने,अर्चना वारकड, लता राऊत,उषा दळवी,वर्षा राऊत,अनुराधा राऊत, महादेवी खोगरे,सुरेखा राऊत,तुकाराम भंडारे, रणजीत खोगरे,अस्लम शेख,प्रणित कोंबडे,सुनील रसाळ,अभय पवार,ज्ञानेश्वर जाधव,शाम पवार,रोहन वाघमारे असे एकूण 51 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर प्रसंगी
मेडीसीन विभागप्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार, प्रभारी अधिकारी डॉ.विनय नाळपे हे उपस्थित होते.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी सुजीत तुम्मोड,शशिकांत पारखे,तंत्रज्ञ सय्यद मुश्ताक,उबेद मिर्झा,शेख अन्वर,परिचर श्रीराम कुंजटवाड यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर आणि मास्कची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

*रक्तदान करून महाराष्ट्र दिन साजरा-राजकिशोर मोदी*

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने चौथ्या टप्प्यात 51 जणांनी रक्तदान करून महाराष्ट्र दिन साजरा केला आहे.येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला तसेच राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसुलमंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच आवाहन केले आहे.त्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसने 3 एप्रिल,10 एप्रिल आणि 14 एप्रिल आणि 1 मे रोजी चौथ्या टप्प्यात असे चार वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केले.या शिबिरात 35 महिला-भगिनींसह एकूण 51 जणांनी रक्तदान केले. त्या सर्व रक्तदात्यांचे आभार.पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने असे मिळूण एकूण 500 काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करतील अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.


स्वातंत्रसेनानी ,सनदी अधिकाऱ्यांच्या थेरला गावात पाणीटंचाईच्या झळा, जलशुद्धीकरण प्रकल्पच नाही― डॉ.गणेश ढवळे

पाटोदा:आठवडा विशेष टीम―स्वातंत्रसेनानी , सनदी अधिकारी , घरोघरी नोकरदार ,उच्चपदस्थ राजकारणी अशी प्रसिद्धी मिळालेल्या पाटोदा तालुक्यातील मौजे थेरला गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी मालकीच्या बोअरवेल धारकांच्या मनधरण्या कराव्या लागतात, बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पं.स.कडे पाठवल्यचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे उपसरपंच गणेश राख यांनी सांगितले.

विठ्ठल राख :

गावामध्ये एक पाण्याची टाकी आहे परंतु तेवढ्याने भागत नसल्याने ३ कि.मी.अंतरावरील रोहतवाडी तलावावरुन गावात सिमेंट निर्मित टाकीमध्ये पाणी सोडण्यात येते.त्याटाकीतून ग्रामस्थ पाणी शेंदुन आपापल्या प्लास्टीकच्या टाकीमध्ये पाणी साठवून आवश्यकतेनुसार नेण्यात येते.सकाळी मात्र याठिकाणी पाणी शेंदण्यासाठी जत्रा भरते. सांडपाण्याची जरी चिंता मिटली तरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, खाजगी बोअरवेल मालकांची मनधरणी करुन मिळवावे लागते.

गणेश राख ( उपसरपंच ,थेरला (ता.पाटोदा):


दररोज रोहतवाडी तलावावरुन गावातील टाकीत पाणी सोडण्यात येत आहे , परंतु उन्हाळ्याचा भविष्यात विचार करता नागरी वस्ती आणि तलावाच्या खाली बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव सादर केला आहे. आणि जिल्हा प्रशासनाकडे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मागणी करण्यात आली आहे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश:

बीड जिल्हयात सर्वांत जास्त स्वातंत्र सैनिक , सनदी अधिकारी , नोकरदार, राजकिय पुढारी असलेल्या गावात जलशुद्धीकरण प्रकल्प नसावा ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सकाळी पाण्याच्या टाकितून पाणी शेंददाना शारीरिक अंतर राखणेच अवघड आहे. शासनाने लवकरात लवकर जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करणे अत्यावश्यक झाले आहे. या पाणीटंचाई संदर्भांत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री , ग्रामविकास मंत्री व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.

थेरला येथील पाण्याची समस्या

बीड: अंजनवती येथिल होम क्वारंटाईन ऊसतोड मजुरांना बैलांच्या चाऱ्यासाठी खडकी येथे परगावात ऊसतोडणी साठी जावे लागते

बीड:आठवडा विशेष टीम― कोरोना मुळे साखर कारखान्यावर राहिलेल्या ऊसतोड मजुरांना शासनाने त्यांची गावी पोहचवले खरे परंतु त्यांना होमक्वारंटाईन केल्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवत आहेत. बीड तालुक्यातील मौजे अंजनवती येथिल होम क्वारंटाईन ऊसतोड मजुरांना बैलांच्या चाऱ्यासाठी खडकी येथे परगावात ऊसतोडणी करण्यासाठी जावे लागत असल्याचे समजते.

सरपंच, सुनिल येडे :

“तलाठी वनवे , ग्रामसेवक हावळे लक्ष देत नाहीत, मी तरी काय करू ?? वरीष्ठ अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांना सांगितले ते म्हणतात लेखी तक्रार दाखल करा.आता माझ्या गावातील लोकांची मी कशी तक्रार करू

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :

“मा.राहुलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच , ग्रामसेवक , तलाठी यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री , आरोग्य मंत्री , ग्रामविकास मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे केली आहे.”

ऊसतोड मजुरांसाठी दिलेला निधीचा योग्य वापर आणि तलाठी ,ग्रामसेवक मुख्यालयी रहात नसतील तर लेखी तक्रार करा― डॉ.गणेश ढवळे

बीड दि.२१:आठवडा विशेष टीम―ऊसतोड मजूर गावी परतले असुन त्यांची काळजी घेण्यासाठी मा.राहुलजी रेखावार साहेब यांनी तलाठी, ग्रामसेवक यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असुन १४ वर्मा वित्त आयोगाच्या आरोग्य विषयक योजनेतून कोरोनाच्या संकटकाळी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे ,तो योग्य मार्गाने खर्च होत आहे का??यांची काळजी दक्ष नागरिकांनी घ्यावी आणि काही काळंबेरं असल्यास जिल्हाधिकारी यांना … Read more

बोरखेड मध्ये पाण्यासाठी रात्री जागुन काढाव्या लागतात तर दिवसा उडते झूंबड ,पाण्यासाठी सोशल डिस्टन्सची ऐसीतैसी―डॉ.गणेश ढवळे

सरपंच ग्रामसेवक ,तलाठी बेफिकीर

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―उन्हाळा वरचेवर कडक चालला असुन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर घराबाहेर न निघणारे गावकरी पाण्यासाठी मात्र जिवावर उदार होऊन सामाजिक अंतराचे भान न राखता पाणी मिळवण्यासाठी झगडताना दिसतात याच वेळी सरपंच , ग्रामसेवक ,तलाठी हे कोरोनाच्या नावाखाली गावातील ईतर मुलभूत सुविधांकडे कानाडोळा करताना दिसतात, कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत ईतर पिण्याचे पाणी, शौचालय , आणि जिवनावश्यक गोष्टिकडे प्रशासनाने दुर्लक्ष करु नये .

सविस्तर वृत्त असे की ,बीड तालुक्यातील मौजे बोरखेड येथिल ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी दमछाक होत असुन कधी दुपारी रखरखत्या ऊन्हात तर कधी मध्यरात्री सुद्धा पाण्यासाठी ताटकळत राहुन रात्र जागुन काढावी लागते.

यादव मल्हारी बोराडे : दिवसातून केवळ १-२ तास पाणी सुटते , त्यामुळे गर्दि जमा होते , कधी भर दुपारी उन्हात तर कधी सगळी रात्र पाण्यासाठी जागुन काढावी लागते पाण्याची समस्या वरचेवर अवघड होत चालली असुन विहिरीतच पाणी कमी असल्यामुळे पाण्याच्या टाकीत पाणी चढत नाही.गोलंग्रीच्या तलावा वरुन ही पाईपलाईन आणली आहे.

पल्लवी शिंदे :मी अकरावीत शिक्षण घेत असुन बोरखेड येथिल होस्टेलला राहते. ऐअर वांल काढल्यानंतर हे पाणी सुटले आहे , विहीरीत कमी पाणी असल्यामुळे टाकीतून पाणी पुरवठा होत नाही. इथं ज्याची लाठी त्याची म्हैस या म्हणीप्रमाणे जे जास्त घागरी नंबरला लाऊन ठेवतात त्यांनाच जास्त पाणी मिळते, ईतरांना फार तर एक-दोन घागरी पाणी मिळते.

गयाबाई घोडके :आमच्या सारख्या म्हता-या माणसाला पाण्याचा जास्त त्रास होत आहे, मला संधिवात असल्यामुळे घागर घेऊन चालता येत नाही.८-१० दिवस नळाला टाकीचे पाणी येत नाही,

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत ग्रामस्थांच्या पिण्याचे पाणी, शौचालय आदि.गोष्टिकडे सरपंच , ग्रामसेवक ,तलाठी कानाडोळा करताना दिसतात, कागदोपत्री घोडे नाचवून वरिष्ठांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करतात. संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसुन त्यांना या अडचणींचा सामना करावा लागत नाही त्यामुळे मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड तथा अध्यक्ष आपत्ती निवारण व्यवस्थापन व निवारण प्राधिकरण यांनी दि. २३ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी मा.राहुलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाद्वारे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.