बीड: कोविड-१९ लढ्यात रुग्णालयातील खरेदीसाठी खर्चीत १५ कोटींची व रुग्णांची हेळसांड – डॉ गणेश ढवळे

अनागोंदी कारभार प्रकरणाची चौकशी स्वतंत्र कमिटी गठीत करून करण्याची मागणी

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी व रोग निवारणासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत. केवळ बीड जिल्हा शासकीय रूग्णालय व स्वाराती अंतर्गत इतर ठिकाणी रूग्णांच्या उपचारासाठी रूग्णालयाच्या परिसरात 30 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यासाठी दिला आहे.विशेष म्हणजे औषधी खरेदी,कोरोना प्रादुर्भावावरील साहित्य, कोविड रूग्णालय सुरू करणे, वैद्यकीय साहित्य,साधन,यंत्र सामुग्री त्याचबरोबर पॉझिटिव्ह रूग्णांना श्‍वास घेण्यासाठी ऑक्सीजन प्लँट व पाईपलाईन. त्याचबरोबर विद्युतीकरण व इतर गोष्टीसाठी अंदाजे 15 कोटीच्याजवळ खर्च केला आहे. मात्र एवढा खर्च होऊनही लाईट गेली, व्हेन्टीलेटर बंद पडले आणि तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला.यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर दुपारी उठून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांनी पत्रकबाजी केली.एवढेच नव्हे तर जिल्हा रूग्णालयात काय खरेदी केली,काय सुविधा पुरविल्या हे उघडपणे सांगण्यात डॉ.अशोक थोरात कमी का पडत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात कोट्यावधी रूपयांचा खर्च कशावर झाला? केवळ कागदोपत्री दाखविल्या का? या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी व चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैद्यकीय कमिटी स्थापन करून जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून खर्च झालेल्या ठिकाणची पाहणी करावी अशी मागणी करत असताना राजकीय पुढार्‍यांनाही आवाहन केले आहे की पुढार्‍यांनो कोरोनाबाधित रूग्णांच्या संवेदना ओळखा डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालू नका अशी भावनात्मक हाक जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णावर उपचारासाठी अथवा या आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन,लोकप्रतिनिधी व शासनाकडून करोडो रूपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कशावर किती खर्च झाला याची माहिती पाहिली तर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जणू काही जिल्हा रूग्णालय बांधल्यापासून विद्युतीकरण झाले नाही असे भासवून विद्युतीकरणावर 52 लाख 81 हजार रूपये, ऑक्सीजन प्लँट,पाईनलाईन 5 कोटी 18 लाख 47 हजार रूपये,कोरोना वार्डातील अधिकारी,कर्मचारी निवारणीसाठी इमारतीचे विद्युतीकरण 3 लाख 19 हजार,प्रयोगशाळेची सुधारणा 28 लाख,जिल्हा शासकीय रूग्णालयातील अनेक वार्डचे कोविड कक्षात रूपांतरावर लाखो रूपयांचा खर्च केला आहे.त्यामुळे एकंदरीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरातांनी चालवलेला हा सावळा गोंधळ आणि रूग्णांची हेळसांड झालेली पाहता सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.कोट्यावधी रूपये खर्च करून पॉझिटिव्ह रूग्णांची हेळसांड होतेय कशी? विद्युतीकरणावर लाखो रूपये खर्च करून लाईट जाते कशी? रूग्णाचा तडफडून मृत्यू होतो कसा? ही जिल्ह्यासाठी आणि डॉ.अशोक थोरातांना पाठीशी घालणार्‍या राजकीय पुढार्‍यासह इतर जणांना रूग्णांची हेळसांड, रूग्णांचा मृत्यू यांच्या संवेदना दिसून येत नाहीत का? त्यामुळे अशोक थोरातांनी कोरोना संदर्भात जो खर्च दाखविला आहे त्या सर्व खर्चाची विभागीय आयुक्त मा.सुनिल केंद्रेकर यांनी चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लँट,पाईपलाईन, विद्युतीकरण यासह ज्या ठिकाणी खर्च दाखविला आहे त्याची चौकशी,तपासणी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणाहून एक कमिटी पाठवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्तांना मा.राहुलजी रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केलेल्या ईमेलद्वारे केली आहे.

लिंबागणेश ग्रामपंचायतीसाठीचा लाखोंचा खर्च कागदोपत्रीच, पिण्याचे पाणी नाही शौचालय नाही; कारवाईची मागणी

बीड दि.०६:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश ग्रांमपंचायतीसाठी ५ लाख रु ईमारत दुरुस्ती व कार्यालयीन खर्च कागदोपत्री दाखवणा-या ग्रांमपंचायतीला पिण्याचे पाणी व शौचालयच नाही, शासकीय पोलिस चौकी , अंगणवाडी , तलाठी भवन व पशुवैद्यकीय दवाखाना यांना सुद्धा पिण्याचे पाणी, शौचालय नाही , कागदोपत्री लाखोंचा खर्च, कारवाईची ग्रामस्थांची मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

सविस्तर वृत्त असे की,कोट्यवधी रुपयांची विकासकामांची वल्गना करणा-या तसेच ग्रांमपंचायत दुरूस्तीखर्च कागदोपत्री दाखवणा-या ग्रांमपंचायतीला शुद्ध पिण्याचे पाणी व शौचालयच नाही, बहुतांश शासकीय इमारती म्हणजेज पोलिस चौकी , अंगणवाडी , तलाठी भवन तसेच पशूवैद्यकिय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना शौचालय व पिण्याच्या पाण्याची वानवाच आहे.

५ लाख रुपये ग्रामपंचायत ईमारत दुरुस्ती तसेच, एसी, टी.व्ही ची सोय मात्र पिण्याचे पाणी व शौचालय नाही

सन २०१७-१८ च्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रांमपंचायत इमारत दुरुस्तीच्या नावाखाली २ लाख ९५ हजार आणि सांऊंड सिस्टीम खरेदी ५५ हजार रुपये खर्च दाखवला आहे. मात्र एवढा खर्च दाखवुनही ग्रांमपंचायतिला पिण्याचे पाणी आणि शौचालय उपलब्धच नाही.

सन १९/११/२०१८ मध्ये ग्रांमपंचायत ईमारत दुरुस्ती म्हणुन स्वप्निल गलधर यांच्या नावे १ लाख ७० हजार रू ( व्हाऊचर नं. FFC-2018-19/P/20 , Account type B ,Account no.60224575036 ,Cheque no. 080176. , Cheqe date 19/11/2018 १४ वा वित्त आयोग)दिला आहे. नियमाप्रमाणे २५-१५ अंतर्गत केलेल्या कामाचा चेक , सरपंच, ग्रामसेवक अथवा ठेकेदाराच्या नावे जाणे अपेक्षित आहे, ईतर तिस-या त्रयस्थ व्यक्तीच्या नावे चेक देणे म्हणजेच सरपंच पतीच्या नावाने चेक देणे नियमात बसत नाही, परंतु जर सरपंचपती खाजगीत बोलताना मी ग्रांमपंचायत इमारतीसाठी वाळू पुरवली असे कारण सांगत असतिल तर त्यांना वाळुची अधिकृत ठेकेदारी , वाळूची रांयल्टी भरलेल्या पावत्या आदि.गोष्टी दाखवाव्या लागतील.
सन २०१९-२० मध्ये ग्रांमपंचायत आराखडा आणि कागदोपत्री खर्च
१)ग्रांमपंचायतीला एसी / टी.व्ही. , सी सी टी.व्ही बसवणे अंदाजित किंमत १ लाख ५० हजार रुपये.
म्हणजेच एकुण ग्रांमपंचायत कार्यालयासाठी ५ लाख रू खर्च करणा-या ग्रांमपंचायतीला स्वत:चे शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

लिंबागणेश पोलिस चौकीला पिण्याचे पाणी व शौचालय उपलब्ध नाही , तक्रारी नंतर शौचालय सांगाडा , परंतु वापरात नाही–

लिंबागणेश पोलिस चौकी मधे एकुण ५ कर्मचारी आहेत, त्यांना भाडेतत्त्वावर ग्रांमपंचायतने एक १०बाय १२ ची खोली दिली आहे, परंतु शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही. याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि. ०१/६/२०१५ तसेच दि. २६/०१/२०२० रोजी ग्रामसभेने सर्वानुमते पोलिस चौकीला पिण्याचे पाणी, शौचालय उपलब्ध करून देणे तसेच नविन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी असा ठराव घेण्यात आला होता.दि. १७/०२/२०२० रोजी पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन ,त्या नंतर दि २४/०२/२०२० रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे राज्यमार्ग मांजरसुंभा ते पाटोदा रास्तारोको आंदोलन आणि ग्रांमपंचायतीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली होती, त्यांनंतर कारवाईच्या भितीपोटी केवळ शौचालय सांगाडा आणून बसवला आहे, अजुनही अर्धवट काम राहीलेले असल्याने वापरात नाही, दि. १६/०३/२०२० रोजी स्मार्ट बीड
दै.पुण्यनगरी मध्ये पोलिस चौकीला मिळाले शौचालय या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध तसेच दि. १६/०३/२०२० दै.मराठवाडा साथी मध्ये लिंबागणेश ग्रांमपंचायतीवर कारवाईचा इशारा देताच पोलिस चौकीला शौचालय मिळाले अशी बातमी प्रसिद्ध झाली होती.
दि.०३/०४/२०२० रोजी पुन्हा एकदा लेखी तक्रार ई-मेलद्वारे करयात आली आहे,त्याविषयी चौकशी चालू आहे.

“अंगणवाडी क्र.१ आणि क्र.२ पिण्याचे पाणी व शौचालय उपलब्ध नाही ,शौचालयाचे दार तुटल्याने शौचालय वापरात नाही”– अंगणवाडी सेविका

अंगणवाडी क्र.१ आणि क्र २ चर्या अंगणवाडी सेविकांनी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही तसेच वाटर प्युरीफायर दिले नाही, मात्र अंगणवाडी साहित्य व आवश्यक वस्तु पुरवल्या म्हणून ४ लाख ८३ हजार रुपये निधी कागदोपत्री खर्च झाला असे दाखवले आहे.मात्र अंगणवाडी सेविकांना याविषयी काहीही माहिती नसल्याचे डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना सांगितले.

तलाठी भवन पिण्याचे पाणी व शौचालय उपलब्ध नाही

लिंबागणेश येथिल ८ लाख रुपये किंमतीचे तलाठी भवन बांधलेले आहे, मात्र शौचालय आणि पिण्याचे पाणी यांची सोय नसल्यामुळे तलाठी तलाठी भवनामध्ये मुक्कामी राहण्यासाठी तयार नाहीत असे तलाठी पगारे यांचे म्हणणे आहे.

सरकारी पशूवैद्यकिय दवाखाना पिण्याचे पाणी शौचालय नाही, नविन ईमारत उदृघाटनाच्या प्रतिक्षेत ; केवळ शोभेची वस्तू

सरकारी पशूवैद्यकिय दवाखान्यात पिण्याचे पाणी व शौचालय उपलब्ध नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी अमोल मोहळकर यांनी सांगितले

ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा व स्वच्छता, शौचालय यावर दाखवलेला कागदोपत्री खर्च

सन २०१७-१८:―
ग्रांमपंचायतीने १४ व्या.वित्त आयोगाच्या निधीतून पाणीपुरवठा व स्वच्छता , शौचालय यासाठी दागवलेला खर्च खालिल प्रमाणे
१) मेडीक्लोर खरेदी करणे ६५ हजार रुपये
२) पिण्याचे पाणी ३,लाख४हजार ७४१ रुपये
३)वाटर प्युरीफायर ४५ हजार रुपये

सन२०१८-१९―
१) अंगणवाडी साहित्य पुरवठा , गस ,कपाट ,वाटर प्युरीफायर,कुकर ८८हजार ४२१ रुपये.
२) पाणीपुरवठा नविन पाईप लाईन २ लाख ९९ हजार
३) पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती, हातपंप वर्गणी , विद्युत देयक १ लाख ८३ हजार ९३८
४) पाणी शुद्धीकरण यंत्र आर.ओ.यंत्र
२ लाख ९८ हजार रुपये.

सेनिटरी नपकिन व डिस्पोजेबल मशिन

सेनिटरी नपकिन व डिस्पोजेबल मशिन खरेदी केल्याचे दाखवून ९० हजार रुपये निधी उचलण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांना या विषयी विचारले असता असे कुठलेही मशिन आम्ही पाहिले नसल्याचे सांगितले आहे.

सन २०१९-२०―
१)स्वच्छता व साफसफाई १ लाख ५० हजार रुपये
२) शौचालय दुरूस्ती २ लाख रुपये
३) पाणी पुरवठा १ लाख रुपये
४) अंगणवाडी साठी आवश्यक साहित्य, पाणीपुरवठा २ लाख ४१ हजार ०८५ रुपये
५)मुतारी, पाण्याच्या टाक्या आवश्यक साहित्य ३ लाख ९हजार १५४ रुपये.

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर―

लिंबागणेश ग्रांमपंचायतने ग्रांमपंचायत , अंगणवाडी , नविन पशूवैद्यकिय दवाखाना ईमारतीमधे कागदोपत्री खर्च दाखवुन आवश्यक साहित्य व पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता आदि.गोष्टींवर लाखों रूपयांचा खर्च केवळ कागदोपत्री दाखवला आहे, व मुलभूत सुविधा पिण्याचे पाणी, शौचालय उपलब्ध करून दिलेच नाही. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,अध्यक्ष जिल्हा परिषद बीड जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.