अंबाजोगाई:रणजित डांगे― येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.श्रीनिवास रेड्डी यांनी लॉकडाऊन कालावधीत तत्पर रूग्ण सेवेसोबत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोना संकटकाळी मदत केल्यामुळे गोरगरीब कुटूंबांना दिलासा मिळाला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या ‘लॉकडाऊन’ मुळे हातावर पोट असलेल्या मजूर,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा समाजघटकांना डॉ.श्रीनिवास रेड्डी यांनी मदतीचा हात दिला आहे.
शहरातील प्रशांतनगर भागातील रेड्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मंगळवार,दिनांक 5 मे रोजी गरजू कुटुंबांना नगरसेवक संजय गंभीरे,डॉ.श्रीनिवास रेड्डी यांचे हस्ते जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.परळी वेस,मंगळवार पेठ येथील अनेक गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आलेल्या कीट्स मध्ये 15 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे.मागील अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहर व तालुक्यातील माता आणि बालके यांना डॉ.श्रीनिवास रेड्डी यांनी रेड्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून तत्पर व जलद आरोग्य सेवा दिलेली आहे व ते सध्या ही देत आहेत.घरातून चांगुलपणाचे संस्कार व वारकरी सांप्रदायाचा प्रभाव रेड्डी परीवारावर आहे.सामाजिक बांधिलकी जोपासत बालरोग तज्ञ डॉ.श्रीनिवास रेड्डी यांनी लॉकडाऊन कालावधीत तत्पर रूग्ण सेवेसोबत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोना संकटकाळी मदत केल्यामुळे गोरगरीब कुटूंबांना दिलासा दिला आहे.रेड्डी हॉस्पिटलच्या रूग्णसेवेबद्दल पालक व बालक हे समाधानी व आनंदी आहेत.डॉ.श्रीनिवास रेड्डी हे सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेऊन विविध सामाजिक उपक्रमात कायमच सहभागी होतात.कोरोना साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून डॉ.श्रीनिवास रेड्डी यांनी समाजासमोर चांगला आदर्श ठेवला आहे.सफाई कामगार,घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजूंना लोकांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ‘सोशल डिस्टन्सिंगचा’ नियम पाळून करण्यात आले.
*कोरोनाला घाबरू नका.गाफील राहू नका.*
कोरोना संकट अजून टळलेले नाही,सहज घेऊ नका.बरेचसे लोक विनाकारण घराबाहेर निघत आहेत.हे अजून किती दिवस सुरू राहील हे आत्ताच सांगता येणार नाही.त्यामुळे घरीच रहा.प्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घ्यावा.सुरक्षित रहा.या काही शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही काही गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत निरीक्षण केले त्यानुसार नियमीत हँडवॉश,सॅनिटायझर वापरल्याने व बाहेरील पदार्थ (कुरकुरे,चॉकलेट,गाड्यावरील पदार्थ) लॉकडाऊनमुळे बंद झाले.त्यामुळे बालकांमधील बरेचसे आजार कमी झाले.तसेच छोट्या-छोट्या कारणांसाठी हॉस्पिटलला ही येणे बरेचसे कमी झाले.यामुळे सर्वांना हे तर समजले की,आपल्या आजाराचा उपचार आपल्या जवळच आहे.त्या अनुषंगाने कोरोना संकटाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचाव्यात या अनुषंगाने हे सांगत आहे.आम्ही आपल्या सेवेत कायम कार्यरत आहोत.सर्व अत्यावश्यक सेवा 24 तास चालू आहेत.कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे.त्यामुळे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संसर्ग टाळा,गर्दीच्या ठिकाणी (सुपरमार्केट,बँक, हॉस्पिटल,क्लिनिक,भाजी मार्केट) लॉकडाऊन असताना किंवा त्यानंतरही अनावश्यक जाऊ नका अगदी ओ.पी.डी.ला देखील येताना गर्दी नसेल याची खात्री करून आणि वेळ घेऊन या म्हणजे आपला त्रास वाचेल.गर्दीच्या ठिकाणी जर कोरोनाबाधित पेशंट असेल तर तो पुढील संपर्कात येणाऱ्या सर्वांना बाधित करू शकतो आणि पुढे झपाट्याने समाजात पसरू शकतो.म्हणून अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका.सध्या त्रास नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली जुनीच औषधी चालु ठेवा.आपल्या जवळच्या मेडिकल मधून औषधी घ्यावेत.तीच औषधी मिळत नसतील तर पर्यायी औषधी घ्यावेत.गरज असल्यास डॉक्टरांशी फोनवर चर्चा करावी.डॉक्टरांना दाखवणे गरजेचे वाटले तर सध्या ऑनलाईन कन्सल्टेशन ही पर्यायी उपलब्ध आहे.त्याचा उपयोग करावा.सर्दी,ताप, खोकला,दम लागणे अशी लक्षणे असतील तर सध्या फक्त सरकारी दवाखान्यात तपासणी उपलब्ध आहे.ती करून घ्यावी.काही असेल किंवा नसेल तरी ही आपण दुस-यांच्या संपर्कात जाणे टाळावे जेणेकरून आपले इन्फेक्शन दुस-याला होणार नाही याची खबरदारी घ्यावी.मास्क नियमीत वापरा.आपण 100/-रूपये अगदी कुठेही खर्च करतो.त्याऐवजी कापडी 3 थरांचा,2 मास्क तयार करून घ्या आणि तो कायम वापरा.आज वापरलेला मास्क चांगला गरम पाण्याने धुवून घ्या तोपर्यंत दुसरा मास्क वापरा.बाहेरून आणलेली प्रत्येक वस्तू स्वच्छ धुवून घ्या.जास्तीत-जास्त वेळा हात साबणाने स्वच्छ धुवा.लहान मुले,वृद्ध व्यक्ती आणि जुनाट आजार असलेल्या घरातील व्यक्तींची विशेष काळजी घ्या.मित्रांनो कोरोना रोगाला घाबरू नका.पण,गाफील ही राहू नका.
*-डॉ.श्रीनिवास रेड्डी (रेड्डी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,अंबाजोगाई.)*