पावसाळी नुकसानभरपाई पंचनामे थोतांड, फोटो काढण्यापुरतेच विहीर ढासळली, सोयाबीन उगवलीच नाही, सख्खा भावंडाची कथा आणि व्यथा― डॉ.गणेश ढवळे

बीड दि.२३:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल किसन आणि संजय नाईगडे या दोन सख्या भावंडावर निसर्गाने आभाळंच कोसळलं आहे,त्यातच नुकसान भरपाईचे पंचनामे केल्याच्या लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या वर्तमानपत्रातील बातम्या पाहून त्यांच्या जखमेवर मिठ चोळल्याची भावना बोलून दाखवली.

कीसन बाजीराव नाईगडे–

१० दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील विहीर ढासळली,५-७ वर्षांपूर्वी १ लाख रू.खर्च करुन विहीर खोदली. आता या दुष्काळात बि-बियाणे आणि खताला ऊसनवारीने पैसे आणलेत,आज व्याजाने पैसे काढून विहीरीचा खर्च परवडणारा नाही. मधी पेपरमधी बीडचे आमदार आणि आधिकारी येऊन गेल्याचं कळलं,पण आमच्याकडे कोणी फीरकलंच नाही.

संजय बाजीराव नाईगडे–

८-१० दिवस झाले , दोन एकरात महाबीजचे सोयाबीन पेरलं होतं, एकरी ५०००रु प्रमाणे १०हजार रु.खर्च झाला. सोयाबीन उगवलंच नाही. आता या दुष्काळात दुबार पेरणी साठी पैसे आणायचे कोठून ?? आम्ही शासनाने सांगितल्याप्रमाणे तक्रार दाखल केली पण सध्या काय करायचं,पंचनामे करायला कोणी आलं नाही.

डॉ.गणेश ढवळे―

बीडचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांनी तहसिलदार श्रीकांत निळे, उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत पाली,चौसाळा आणि लिंबागणेश भागातील पावसाळी नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामे केल्याचा फोटो वर्तमान पत्रात छापून गवगवा केला परंतु ख-या गरजू शेतक-यांचे झालेले नुकसान याविषयी त्यांना कल्पनाच नाही. नुकसान झालेल्या शेतक-यांच्या नुकसानीचे पोकळ पंचनामे करत पेपरमध्ये पंचनामे केल्याचा डांगोरा पिटणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी आहे.
सोयाबीन न उगवल्यामुळे प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे खेडकर ओपीएस बीड कृषि अधिकारी पंचायत समिती बीड यांना लेखी तक्रार केली आहे. दोन दिवसात पंचनामे करून शेतक-यांना नूकसानभरपाई न मिळाल्यास लिंबागणेश येथिल तलाठी सज्जासमोर डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.