ताई, ‘तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय…आम्हीच कमी पडलो’! नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
परळी दि. २२:आठवडा विशेष टीम― केवळ परळी शहरातीलच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी शहरांत रोजगार आणि कामधंद्यानिमित्त वास्तव्यास असलेल्या परळी मतदारसंघातील गरजू नागरिकांनाही पंकजाताई मुंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रेशन व जीवनावश्यक वस्तू पोहोच केल्या. या मदतीने भारावून गेलेल्या रहिवाशांनी ताई, ‘तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय…आम्हीच कमी पडलो’! अशा भावना व्यक्त केल्या.
कोरोनामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत आपल्या माणसांना मदत व्हावी यासाठी पंकजाताई मुंडे सध्या विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. साखर कारखाना परिसरात अडकून पडलेल्या लाखो ऊसतोड कामगारांना त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज सुरक्षितपणे घरी जाता आले आहे. प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाखाची मदत असो की गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील गरजूंना रेशनचे वाटप असो, त्यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.
बाहेरील गरजूंना रेशन
परळी मतदारसंघातील अनेक लोक मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी भागात रोजगार अथवा छोटे व्यवसाय करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवतात अशा रहिवाशांना सध्या कोरोनाचा फटका बसला आहे. संचारबंदीमुळे सर्व काही बंद आहे, त्यामुळे त्यांचेकडील असलेले अन्नधान्य संपले, अशा संकटकाळात त्यांनी पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधला आणि क्षणाचाही विलंब न करता पंकजाताईनी त्यांच्यापर्यत रेशन व आवश्यक वस्तू पोहोचविल्या. नागपिंप्री येथील दत्तू सांगळे, बाबूराव मुगले, ज्ञानेश्वर ढाकणे आदी सिन्नर येथे रहातात. मुंबईच्या जासई, उरण, पनवेल आदी ठिकाणी हाळम, हेळमचे हनुमंत दहिफळे, शिवाजी दहिफळे, ज्योतीराम गुट्टे, माधव होळंबे आदी १८ कुटुंब, पुण्याच्या औंध, सांगवी येथे वडखेल येथील वास्तव्यास असलेल्या २५ कुटूंबिय या सर्वांपर्यंत पंकजाताई मुंडे यांनी रेशन पोहोचविले.
ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच कमी पडलो!
पंकजाताई मुंडे यांनी पाठवलेली मदत मिळाल्यानंतर रहिवाशांना आपल्या भावना अनावर झाल्या. ‘ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच चुकलो, सरकार असताना तुम्ही आमच्यापर्यंत किती पोहोचवत होतात आणि आता सरकार नसतांनाही तुम्हीच देत आहात, आम्हीच कमी पडलोत’ अशा शब्दांत कुटूंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.