नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या घडीपुस्तिकेचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या हस्ते प्रकाशन

आठवडा विशेष टीम―

नागपूर दि. १ मार्च : नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते  करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनांची माहिती देणाऱ्या चित्रफितीचेही अनावरणही श्री. कपूर यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र विमानतळ  विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी सोमवारी मिहान येथे आयोजित बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.  यावेळी त्यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांच्यासह नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांचे जिल्हा माहिती अधिकारी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत विविध विषयांवरील माहितीच्या लघुपटांच्या सीडीचे अनावरण श्री. कपूर यांच्या हस्ते करण्यात आले.  सामाजिक न्याय विभागाने तृतीयपंथी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांच्या चित्रफितींचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेणार्‍या  घडीपुस्तिकेचेही यावेळी प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी या दोन्ही उपक्रमांची निर्मिती केली आहे. या बैठकीला गोंदिया जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, भंडारा जिल्हा माहिती अधिकारी शैलजा दांदळे, माहिती समन्वयक अनिल गडेकर उपस्थित होते.
००००