दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगचे काम तात्काळ थांबवावे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

मुंबई / नागपूर, दिनांक १ जुलै २०२४
नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, महापरिनिर्वाण दिनी आणि बुद्ध पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने जगभरातून लोक दीक्षाभूमीवर येतात. या परिसरात 10 लाखांच्यावर लोक येत असतात. याठिकाणी कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना स्मारक समितीने येथे अंडरग्राऊंड पार्किंगचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. राज्य सरकार आणि समितीने लोकांच्या भावनेशी खेळू नये. अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी लोक भावनेचा आदर करुन येथील अंडरग्राउंड पार्किंगचे काम तात्काळ थांबविण्याकरिता विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. 

दिक्षाभूमी येथील बांधकामाचे आणि घडलेल्या घटनेकडे सरकारचं लक्ष वेधत डॉ. राऊत पुढे म्हणालेत, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याकडून सूचना घ्यायला हव्या होत्या. त्यानंतर बांधकाम सुरु करायला पाहिजे अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी स्मारक समिती आणि सरकारचे कान टोचले.


पावणेचार एकरची जागा दीक्षाभूमीला द्या

दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंग झाल्यास दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे याठिकाणी पार्किंग करू नका. पार्किंगच हवी असले तर या परिसरात पुढे पावणेचार एकरची जागा आहे. ती जागा दीक्षाभूमीला देण्याची मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे. या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जावू शकते.


डॉ. राऊत यांनी आक्रमक पणे विषय मांडल्याने पार्किंगच्या कामाला राज्य सरकारची स्थगिती

राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड पार्किंगच्या मुद्दा लावून धरला होता. दरम्यान, याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तात्काळ येऊन दिक्षाभूमी येथील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा केली.

घरोघरी सर्वेक्षण करुन मतदारयादी अद्यावत करावी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

छत्रपती संभाजीनगर दि.29– विधानसभानिवडणूकीच्या पार्श्वभमीवर दि.1 जुलै 2024 च्या आर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनिरिक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या कालावधीत 1 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदार यादी अद्यावत करण्याचे काम बीएलओने घरोघरी जाऊन सर्वेक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पैठण येथे आढावा बैठकीत दिले.

पैठण तालुक्यातील निवडणूक विषयक तसेच कृषी विभागाची आढावा बैठक दुर्गा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस तहसिलदार सारंग चव्हाण नगरपालिका मुख्यधिकारी संतोष आगळे, तालुका कृषी अधिकारी श्री.सिरसाठ यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व मंडळधिकारी उपस्थित होते.  

बीएलओने घरोघरी जाऊन 85 वय वर्षावरील मतदारांची नोंद तसेच 100 वय वर्ष असणाऱ्यां मतदारांची विशेष नोंद गृह मतदानासाठी करुन घ्यावी. मतदारांना नजीकच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी याची काळजी बीएलओने घेणे आवश्यक आहे. यादीतील दुबार नोंद वगळणे, मतदाराचे मतदान यादीतील नावात असलेला बदल, फोटो याविषयीच्या नोंदी अचूक करण्याची प्रक्रिया जबाबदारीने पार पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी बीएलओनां दिले.

जल पुनर्भरण कामाचा आढावा

  पैठण तालुक्यामध्ये एकाही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ नये  यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम सक्रीय पणे राबविणे आवश्यक असून यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांनी तालुक्यातील प्रत्येग गावाचे सर्वेक्षण करुन विहिरीचे, बोरवेल जलपुनर्भरण करण्याबाबतचे मोहिम राबवावी. यासाठी रोहियो अंतर्गत त्याच बरोबर नाविन्य पूर्ण उपक्रम राबवून लोकसहभागातून जास्तीत जास्त जलपुनर्भरणाचे काम करावे. याबाबतचा आढावा 10 दिवसानंतर घेण्यात येणार असल्याचे श्री.स्वामी यांनी सांगितले.

प्रत्येक गावामध्ये पाणी व्यवस्थापन, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ ‘एक पेड माँ के नाम’ तसेच इतर विभागाच्या योजनाचा समन्वयाने अंमलबजावणी करावी. याबरोबरच प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा  वाढीसाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

 

 आपेगाव पालखी सोहळ्याला जिल्हाधिकारी यांची शुभेच्छा भेट

संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ पैठण तालुक्यातील आपेगाव येथून मार्गस्थ होणाऱ्या पालखीस आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सपत्नीक पूजा करुन भेट दिली. यावेळी मार्गस्थ होणाऱ्या पालखीस  स्वत:सहभागी होऊन अंभग गायन आणि पाऊली व फुगडी खेळत शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापुरकर यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले.

अमृत वृक्ष आपल्या दारी’आणि एक पेड माँ के नाम अभियानात समन्वयाने वृक्ष लागवड करावी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर दि.29 – वन महोत्सवात ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबविण्याचेनिर्देश देण्यात आलेले आहेत.  जागतिक तापमानाची वाढती समस्या नियंत्रणात ठेवणेसाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. जिल्ह्यात 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवड सप्ताह साजरा करण्यात येणार असून उद्ष्टि पूर्ण करण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने वृक्ष लागवडीचे उद्ष्टि पूर्ण करण्योच निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

वृक्ष लागवडीचे नियोजन आणि उद्ष्टि पूर्ती आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, सामाजिक वनीकरन विभागाच्या विभागीय वनधिकारी र्किती जमदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महेश झगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, पर्यटन विभागाचे उपसंचालक संजय जाधव, शिक्षणधिकारी प्राथमिक माध्यमिक तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते.

प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक संस्था, विविध शाळा-महाविद्यालय यांचा सहभाग घेऊन ‘एक पेड माँ के नाम’ योजनेतंर्गत वृक्ष लागवडीमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच स्मृती वनसारखे उपक्रम राबवून जास्तीत जास्त वृक्षाची लागवड व जतन करावे. ही जबाबदारी प्रत्येकाने आस्थेवाईक प्रमाणे पार पाडावी. तसेच शासकीय तसेच खाजगी मालकीचे क्षेत्र, शेत बांधावर, रेल्वेदुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेऊन अमृत वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सहभागी होण्याचे अवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

ज्या शासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांना वृक्ष लागवड करावयाची आहे व त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, मात्र त्यांच्याकडे रोपे निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद उपलब्ध नाही, अशा यंत्रणांना वनमहोत्सव कालावधीत उपलब्ध जागेच्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी आवश्यक रोपांचा मोफत पुरवठा नजीकच्या रोपवाटिकेतून रोपांच्या उपलब्धतेनुसार केला जाईल. असे विभागीय वनधिकारी किर्ती जमदाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होण्याकरिता व या कार्यात त्यांचा अधिकाधिक सहभाग मिळवण्यासाठी वृक्षलागवड करू इच्छिणारी शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांना वन महोत्सव कालावधीत मागणीनुसार मोफत रोपांचा पुरवठा उपलब्धतेनुसार करण्यात येणार आहे. 

पोलीस व संरक्षण बल यांना वन महोत्सव कालावधीत उपलब्ध जागेनुसार वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांचा मोफत पुरवठा नजीकच्या रोपवाटिकेतून त्यांची मागणी असल्यास करण्यात येईल. 

शासकीय यंत्रणा, संस्था यांना लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी उपवनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे कडे मागणी  पत्राद्वारे हमीपत्रासह नोंदवावी. असे आवाहन श्रीमती जमदाडे यांनी केले.

परळीत गोळीबार; सरपंच जागीच ठार, १ जखमी

परळी(प्रतिनिधी) दि.२९: शहरातील बँक कॉलनी भागात आज रात्री झालेल्या गोळीबारात परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला तर ग्यानोबा गित्ते जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. बँक कॉलनी परिसरात ही थरारक घटना घडली.

दरम्यान, गोळीबार कोणी केला याबाबत अद्याप पोलिसांकडून याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून परळी पोलीस पुढील तपास करित आहेत. जखमी ग्यानोबा गित्ते यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गर्भपातासाठी शासनाच्या मंजुरीनंतरही एसओपीची अंमलबजावणी का नाही ?

अॅड.. सोनिया गजभिये यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर दि. २५/६ : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आता २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपात करण्याच्या मानक मार्गदर्शक कार्यपद्धतीस (एसओपी) राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य शासनाने हायकोर्टाला मागील सुनावणीत दिली होती. पीडितेने दाखल केलेल्या याचिकेवर राज्य शासनाने एसओपी आरोग्य विभागासह इतर सर्व संबंधित विभागांना पाठविली नसल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हायकोर्टाने सरकारी वकिलांना विचारणा केली की, राज्य शासनाने ३ जून रोजी एसओपी जारी केली असताना या एसओपीची अंमलबजावणी आजपर्यंत का करण्यात आली नाही? एसओपी पोलीस विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व आरोग्य विभाग, सरकारी रुग्णालये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासह सर्व संबंधित विभागांना पाठवावी, असे आदेश हायकोर्टाने दिले. हायकोर्टाने येत्या १६ जुलैपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

 
       २६ आठवडे सहा दिवसांचा गर्भ नष्ट करण्यासाठी महिलेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टाने दाखल याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्याचे आदेश हायकोर्टाच्या रजिस्ट्रीला दिले होते. तसेच २० ते २४ आठवड्यांपलीकडील गर्भ राहिल्यास तो नष्ट करण्यासाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करावी, असे आदेशही राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध प्रशासन विभागाला दिले होते. यानुसार राज्य शासनाने एसओपी तयार करून या अंतर्गत २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपात करण्यास मान्यता दिली आहे.

       दरम्यान लग्नाचे आमिष देऊन युवतीला गर्भवती केल्याप्रकरणी हायकोटनि मेडिकल बोर्डासह डीन व जिल्हा आरोग्याधिकारी यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. सावनेर येथील बावीस वर्षीय युवतीचे डब्ल्यूसीएलच्या एका कर्मचारी युवकासोबत प्रेमसंबंध होते. युवकाने तिला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे युवती गर्भवती राहिली. तिने ९ जून २०२४ रोजी तपासणी केली असता २६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे तिला समजले. गर्भ नष्ट करण्यासाठी फिर्यादी युवतीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

      मेडिकल बोर्डाने युवतीला गर्भपात करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे हायकोर्टाने याचिका निकाली काढत तत्काळ सर्व संबंधित विभागांना एसओपी पाठविण्याचे आदेश दिले. युवतीतर्फे अॅड. सोनिया गजभिये, राज्य शासनातर्फे अॅड. देवेंद्र चव्हाण, अॅड. आशिप कडूकर व केंद्र सरकारतर्फे अॅड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.

हायकोर्टाची विचारणा:

तत्काळ सरकारी रुग्णालयांसह सर्व संबंधित विभागांना एसपीओ जारी करा

मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?

सत्य हे सत्यच असते ते काही काल लपवून,झाखुन ठेवले जाते. किंवा दहशत खाली भिती पोटी पोटात दडलेले असते, ते जास्त काल बंद करून ठेवले म्हणजे ते असत्य होत नाही, म्हणुन सविस्तर वाचण्या अगोदर वाचकाची आणि मराठा,बौध्द समाजाची जाहिर माफी मांगतो,कारण काहीना सत्य वाचणे ऐकणे जमत नाही, त्यांचा रक्तदाब लगेच वाढतो मग ते शिवीगाल, हातपाय तोडण्याची भाषा करतात,म्हणुन सत्य समजून घ्या आणि चूक असल्यास चर्चा करुण दुरुस्त करण्यास तयार रहा,ही नम्र विनंती!.
   एक मराठा लाख मराठा,मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा सांविधान सन्मान मोर्चा यांनी आपण खुप जागृत आहोत हे दाखवून दिले,आता पुढे काय?.त्यांने समाजात प्रबोधन करून काय परिवर्तन घडविलेे?. खरच हे सर्व आपल्या विचारधारेशी प्रामाणिक आहेत काय?.2024 च्या लोकसभा निवडणुकित सर्व मोर्चाकरी कोणाच्या बाजूने गेेले हा निकाल जाहीर झाल्यावर माहीत झालेच.

  खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर जास्त लोक रस्त्यावरती उतरले.तेच सेना,मनसे, भाजपा,कॉंग्रेस आणि रॉका ह्या पक्षाला मतदान करत होती?.पाथर्डी च्या वेळेस सुद्धा तेच आणि ऑटोसिटीच्या समर्थानासाठी तेच होत आहे.दलाल,भडवे आणि चमचे सर्वात पुढे असतात.जे मनुवादी,हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढतात आणि तोंडावर आपटतात. त्यांनांच जातीचा जास्त पुळका येतो.या पेक्षा अशा लोकांनी एकच काम करावे मोर्चे बिर्चे काही काढायचे नाही.फक्त आंबेडकरी पक्षात निस्वार्थी काम करायचे,जर मोर्च्याची येवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी एक काम जरुर करावे आंबेडकरी पक्षाला मतदान करा म्हणुन मोर्चे काढावे आणि आपली खरी ताकत मतपेटीत दाखवावी. हे जर जमत नसेल तर शेळी होऊन शंभर दिवस जगा!.उगाच वाघ,सिंह असल्याचा दिखाऊ पणा करू नका,त्याला कोणीच घाबरत नाही. सरकार तर बिलकुल नाही, पण समाजा समाजात तिरस्कार निर्माण होणारे काम करू नका.मोर्चा आंदोलनात ज्या प्रमाणे सर्व मतभेद विचारभेद विसरून संघटित शक्ती दाखविली जाते,त्याच प्रमाणे मतदान पेटीत खरी संघशक्ति दाखविली असती तर काय झाले असते?. 

   जनांआंदोलनात बहुसंख्येने कार्यकर्ते आणि नेते दलाली,चमकेगिरी मोठया प्रमाणात करतात. जनआंदोलनातील चमकेगिरी बंद झाली पाहिजे.सर्व ठिकाणी ती फालतुगिरी दिसते. संविधान सन्मान मोर्चा मध्ये आलेल्या अनेक स्वयंघोषित नेत्याना वारंवार संयोजक सांगत होते की स्टेज तुटण्याच्या मार्गावर आहे.कृपया खाली उतरा पण चमकुगिरी करणारे आणि स्वताला मोठे स्वयंघोषित नेते समजणारे स्टेज वरुन खाली उतरत नव्हते,अशी पोस्ट सोशल मिडियावर त्यावेळी फिरली,संविधान सन्माना करीत मोर्चे काढणारे राजशिष्टाचार मानत नसतील तर?.हिच शिस्त आपल्या लोकांना अगोदर पासून नाही, त्यामुळे जोपर्यंत पोस्टर वरील नावे आणि स्टेज वरील गर्दी कमी होणार नाही तोपर्यंत आपण आपला उद्देश् सफल करु शकणार नाही.हे ही समाजाने लक्षात ठेवले पाहिजे.चमकोगिरी करणाराना समाजाने धडा शिकवला पाहिजे.काम करणाऱ्याना स्टेज ची गरज नसते.हे लक्षात घेतलेले बरे तुमच्या कामातुन तुमचे कार्य कळत असते. स्टेज वर उभे राहुन नाही.स्टेज वर कमितकमी शंभर लोक नेते म्हणुन उभे होते.स्टेज तुटला असता तर? सर्व मीडियानी त्यांची दाखल घेतली असती ज्यांना कोणती ही शिस्त नाही.ते देशात संविधानाचा सन्मान कसा करतील?.म्हणून मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.

  आंबेडकरी पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा?.ज्याला भारतीय संविधानातील प्रत्येक कलम,पोट कलम तोंड पाठ असले पाहिजे.त्यांनी त्यांचे काटेकोर पणे पालन केले पाहिजे.रिडल्स ते आंबेडकर भवन आम्ही लाखोंच्या संख्येने एक दिवस संघटित होऊन रोडवर मैदानात एकत्र आलो.पुढे काय झाले?.आंबेडकर भवनाच्या वेळी सर्वांनी ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढला कायदेशीर मार्गाने काढलेला होता की भावनिक मार्गाने काढला होता?.
  मुंबई ही भारताची नव्हे जगाची औधोगिक जागतिक कीर्तीची महानगरपालिका आहे. सर्व मतभेद विसरून लाखोंचे मोर्चे काढणारे मराठे आणि बहुजन,बौद्ध कसे समोरे गेेले?. शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक बनविन्या करीता पालिकेवर कोणाचे लोक प्रतिनिधी जास्त गेले पाहिजे होते?.कोणत्या विचारधारेची माणसं तिथे पाहिजे होती?.यांचे उत्तर विकाऊ समाजाच्या दिखाऊ मोर्चे करांनी दिले पाहिजे.हेच खरे समाज परिवर्तन होते काय?. त्या बाबतचे नियोजन कोणते?.
एक मराठा लाख मराठा म्हणणारा मराठ क्रांती मोर्चा हा विकाऊ समाजाचाच होता. कारण त्यांना त्यांच्या जातीतील साखर सम्राट,शिक्षण सम्राट यांनी सरकारी कायदे कानुन मोडून कसे साम्रराज्य उभे करून शेतकऱ्याची आणि विद्यार्थी पालकाची कशी लूटमार केली हे सत्य का दिसत नाही.कारण प्रत्येक निवडणूकीत यांनी त्यांना फुकट मतदान केले नाही.मताचा योग्य मोबदला घेऊनच त्यांनी मतदान केले. म्हणुन नवद टक्के मार्क भेटून ऍडमिशन का भेटले नाही?.कोणत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले नाही.त्याविरोधात तेव्हा का संघटित झाले नाही.हे त्या शिक्षण सम्राटांना विचारले पाहिजे होते.त्याला आरक्षण घेणारे कसे काय जबाबदार होते,आहेत.शिक्षण संस्था मराठ्याची,शिक्षण संचालक मराठे,शिक्षक मराठे,शिक्षण मंत्री मराठे आणि विद्यार्थी पालक मराठे तरी न्याय मिळाला नाही?. खरेच या देशात संविधानाची अंमलबजावणी होते काय?. त्यांची प्रामाणिक पणे अंमलबजावणी झाल्यास कोणीच शिक्षण आणि रोजगारा पासुन वंचित राहणार नाही.म्हणुन विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडा आणि टिकाऊ पणा स्विकारा त्यात सर्वच समाजाचे भले होईल.
  आंबेडकरी समाजाने बहुजन समाजाचे नेतृत्व स्विकारण्या लायक बनावे.तर इतर बहुजन समाज तुमच्या जवळ येईल.कारण रिपब्लिकन पक्षाचा कोणता ही गट असो. अथवा बसपा तुम्हांला तुमच्या पक्षाच्या नावाने नाही तर बाबासाहेबांच्या नावाने सर्वजन ओळखतात. कारण पक्षाचे अध्यक्ष वारले तरी पक्षाचा मृत्यु कधीच होत नाही. अध्यक्षामुळे पक्षाची ओळख नसून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित पक्षाची ओळख आहे.म्हणून सर्व पक्ष एकमेकांचे भाऊ भाऊ असावे. वडिलांची संपत्ती सर्व आपसात वाटून घेतात.नंतर एक मेकांना मदत करतात.जर आपला भाऊ कुठे कमी पडत असेल तर सर्व भावांनी त्याला मदत करायला हवी!. दुश्मनी नको कारण तो व्यक्ति कसाही असो पन तो त्याच्या भागातील लोकांना मदत करत आहे.आणि राहिला प्रश्न आपल्या भावाच्या विरोधात राहून आपला पक्ष त्या भागात नव्याने स्थापना करण्याचा तर नवीन पक्ष स्थापन करुन तो मजबूत करायला दहा वर्ष लागतील म्हणून अगोदरच जो पक्ष त्या ठिकाणी मजबूत आहे त्याला मदत करा.दहा वर्ष उगीचच कशाला वाया घालवायची आणि इतर पक्षानां या फुटीचा फायदा घेऊ द्यायचा,जरी तो व्यक्ति आंबेडकरी विचारांचा दुसऱ्या पक्षाचा असेल.तो वैचारिक गुलाम असेल अशोक चव्हाण आणि नरेंद्र मोदी सारखा असेल.
   आपला पक्ष बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित आहे. राजकारणात आपण अशी तोडजोड करु तर आपले राजकारण ठिक आहे अन्यथा एकमेकांना विरोध करत प्रत्येक पंचवार्षीक निवडणूकीत आपले अपयश समाजाला अन्याय अत्याचार सहन करण्यास भाग पडेल.आपला विकास आणि कल्याण करण्यासाठी इतर पक्षाच्या कोणत्या प्रलोभनाला बळी पडू नका.आणि याचा फायदा इतर पक्षाला होईल असे वागू नका.सर्वच समाजाने विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडून विचारधारेवर चालणारा समाज, संस्था,संघटना आणि पक्ष निर्माण करण्यासाठी वाचन बंद्ध व्हा.तरच पुढील इतिहास विकाऊ समाजाचा दिखाऊ मोर्चा नव्हता तर सामाजिक,राजकीय क्रांती, परिवर्तन घडविणारा मोर्चा होता.असे मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा आणि संविधान सन्मान मोर्चा बाबत लिहल्या जाईल.मराठा,बहुजन आणि बौद्ध समाजातील सर्वच कार्यकर्ते नेते नालायक नाहीत.काही प्रामाणिक आहेत.त्यांना सर्व समाजाने योग्य साथ द्यावी.विभागा विभागात लोकशाही पद्धतीने निवडणूका घेऊन कार्यकर्ते नेते निवडा.आणि आम्ही खरेच संविधान प्रेमी आहोत.संविधाना चा सन्मान करणारे आहोत हे सिद्ध होईल.आणि मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.हे मान्य करा 

सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403859,

पेनेक्स फाऊंडेशन तर्फे ‘पालखी केअर’ उपक्रम; पालखी मिरवणुकीत वारकऱ्यांना देणार मोफत वैद्यकीय सेवा

पुणे(प्रतिनिधी): पेनेक्स फाउंडेशनतर्फे तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी मिरवणुकीत विनामूल्य वैद्यकीय सेवा करण्यासाठी ‘पालखी केअर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.

डेक्कन, शनिवार पेठ आणि पुणे स्टेशनसह पालखी मार्गावर येणाऱ्या पेनेक्स फाउंडेशनच्या क्लिनिकमध्ये ही सोय उपलब्ध करण्यात येणार असून या उपक्रमामुळे वारकऱ्यांना अत्यावश्यक वैद्यकीय सहाय्य मिळणे सोपे होईल. यावेळी फिजिओथेरपीसह पायदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी आणि टाचदुखी अशा वेदनांवर आराम देणारे उपचार आणि औषधे यांचा समावेश असेल. अनेक दिवस पायी प्रवास केल्याने वारकऱ्यांना शारीरिक वेदना जाणवतात. अशावेळी ह्या उपक्रमातून वारकऱ्यांना मदत करण्याचे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीण भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्यसेवेची नियमित उपलब्धता असतेच असे नाही, यासाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे. बहुतांश वारकरी पालखीसोबत पायी चालतात आणि अनेकदा त्यांना शारीरिक ताण सहन करावा लागतो. विमामूल्य आणि योग्य वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या प्रवासात मदत करणे, त्यांच्या आरोग्याशी तडजोड न करता त्यांच्या भक्तीसेवेत हातभार लावणे हे पेनेक्स फाउंडेशन ध्येय आहे.

याचा वारकऱ्यांना लाभ तसेच या उपक्रमाद्वारे मदत व्हावी हेच ध्येय आहे.

शाखा :
डेक्कन
पुणे स्टेशन
शनिवार पेठ

संपर्क – ९०६७७५३३५५ / ९०६७५७३३५५

लोककल्याणकारी राज्यकर्ते – राजर्षी शाहू महाराज

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1894 मध्ये संस्थानचा राज्यकारभार स्वीकारला. राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती, गरजा व त्यांची दुःखे जाणून घेतली. सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांचे दुःख निवारण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. अज्ञान, अंधश्रद्धा नि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याखेरीज आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली. गावोगावी शाळा काढल्या, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, पुरोहित शाळा सुरू केल्या. त्याकाळी अस्पृश्यांना विद्येचा अधिकार तर नव्हताच; पण देवालये, चावड्या, सार्वजनिक पाणवठे आदी ठिकाणीही प्रवेश करण्यास त्यांना मनाई होती. महाराजांनी अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न स्वतःपासून केला. अस्पृश्य तरुणांना मोटार ड्रायव्हिंगच्या कोर्सला पाठवून आपल्या, महाराणी साहेबांच्या, चिरंजीव आक्कासाहेब व युवराज यांच्या गाडीवर नेमले. पट्टेवाले, शिपाई, डगलेवाले पोलीस, स्वतःचे शरीर-रक्षक अस्पृश्य नेमले. थोडेसे शिक्षण झालेल्यांना त्या मानाने कारकून, रजिस्ट्रारच्या जागा दिल्या. महात्मा फुले यांचा अस्पृश्योद्धाराचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरविला.

 

 

खुद्द महाराजांच्या राजवाड्यातही ही सुधारणा अप्रिय वाटत होती. आपल्या राजवाड्यातील खासगी देवालयातील ब्राह्मण पुजाऱ्यास महाराजांनी काढून टाकले. पूजा-अर्चा, धार्मिक विधी प्रत्येक ठिकाणी मराठा पुरोहितांकडून चालू केले. राजवाड्यातही सर्वांना मराठा पुरोहितांकडून विधी करवून घ्यावेत, अशी सूचना केली. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही’ असेच प्रजेला वाटते.शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

 

 

राजर्षी शाहूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे.

 

अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919 मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.

 

त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले. 

 

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारले. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये “दलितांचा नेता” व “भारतीय अग्रणी नेता”म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.

 

कुशाग्र बुध्दिमत्ता, प्रभावित करणारं व्यक्तिमत्व, कलेविषयी अगाध प्रेम, थोर समाज सुधारक, बहुजन समाजाचा उध्दारकर्ता, कुशल प्रशासक, स्वच्छ प्रतिमा असलेला राज्यकर्ता म्हणुन कोल्हापूर संस्थानांचे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी दैदिप्यमान राज्य कारभार केला. ज्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद घेवूनच देशभर त्यांची 150 वी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

— प्रविण बागडे, नागपूर

धोकादायक वर्गखोल्या ; विद्यार्थ्यांचे जीव गेल्यावरच लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाला जाग येणार का? सीईओ अविनाश पाठक यांना निवेदन – डॉ.गणेश ढवळे

बीड:- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा तालुक्यातील ३४९ शाळांच्या ५९२ वर्गखोल्या अत्यंत धोकादायक असुन ४६८ शाळांमधील ८५६ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असुन ग्रामीण भागातील ७७२ शाळांना वीजपुरवठा नाही तर थकीत वीज बिलामुळे ६२० शाळांमधील वीजपुरवठा खंडित केला असुन विद्यार्थ्यांचे संगणक,ई लर्निग,वीज उपकरणे बंद असल्याने डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असुन तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर , शेख युनुस च-हाटकर,शेख मुबीन यांनी अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री ,शालेय शिक्षणमंत्री, पालकमंत्री बीड यांना केली आहे.

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २४७४ शाळा असुन यात २४१५ शाळा प्राथमिक तर ५९ शाळा माध्यमिक आहेत.जिल्ह्यात ११ तालुक्यातील ३४९ शाळांच्या ५९२ वर्गखोल्या धोकादायक असुन मोठा पाऊस अथवा वादळवारे आल्यास धोका निर्माण होऊ शकतो.जिल्हा परीषदेच्या शाळांच्या ईमारतीची दुरावस्था असुन कुठे भिंती कुजलेल्या अवस्थेत तर कुठे छत उघडे पडलेले तर कुठे दरवाजे, खिडक्या मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून शाळा, वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच वेळेवर निधी उपलब्ध न झाल्याने शालेय मुलांची अडचण होत असुन दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण?? लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे त्यामुळे तातडीने धोकादायक शाळांच्या दुरूस्तीसाठी निधी देण्यात येऊन तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील तालुका निहाय मोडकळीस आलेल्या शाळा खालिल प्रमाणे आहेत.
आष्टी तालुका ८० शाळांमधील ११९ वर्गखोल्या, अंबेजोगाई तालुक्यातील १६ शाळांमधील ३० वर्गखोल्या, बीड तालुक्यातील २८ शाळांमधील ३७ वर्गखोल्या,धारूर तालुक्यातील १७ शाळांमधील ३० वर्गखोल्या,केज तालुक्यातील १९ शाळांमधील २२ वर्गखोल्या, गेवराई तालुक्यातील ६२ शाळांमधील १२५ वर्गखोल्या, माजलगाव तालुक्यातील १३ शाळांमधील २६ वर्गखोल्या, परळी तालुक्यातील ४६ शाळांमधील ८८ वर्गखोल्या, पाटोदा तालुक्यातील ३१ शाळांमधील ४० वर्गखोल्या, शिरूर तालुक्यातील २४ शाळांमधील ३२ वर्गखोल्या, वडवणी तालुक्यातील १३ शाळांमधील ४३ वर्गखोल्या एकुण ३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असुन त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे.

वायकर वस्ती येथे छत पडलेल्या वर्गात ज्ञानार्जन

बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत पिंपळवाडी केंद्र अंतर्गत वायकर वस्ती येथील शाळेच्या एका वर्गाचे छत पुर्णपणे कोसळले असुन सध्या ज्या वर्गात मुलं ज्ञानार्जन करत आहेत त्या वर्गातील छत पडण्याच्या अवस्थेत असुन मुलांच्या जिवीताला धोका असुन शेतकरी ऊसतोड मजुरांच्या लेकरांनी पावसाळ्यात शाळा उघड्यावर कशी शिकायची असा संतप्त सवाल पालक दादु पवार,सुशीला बहिरवाळ, अमोल बहिरवाळ यांनी केला आहे.

शाळांमधील वीजबील थकीत असल्याने ४९७ शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित असुन तातडीने वीज पुरवठा करण्यात यावा

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ७७२ शाळांना वीजपुरवठाच नाही तर जिल्ह्यातील ४९७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे १ कोटी ३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन कट करण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे संगणक,ई लर्निग,एल ई डी टीव्ही, डिजिटल बोर्ड तसेच वीजेची उपकरणे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच
बहुतेक शाळात अंधार आहे.अनेक शाळांच्या मागील भागात गवत आणि झाडेझुडपे असतात त्यातुन कधी विंचु तर कधी सापही शाळेत येतात. अंधार असल्याने अनेकदा दिसत नाहीत.वीज असेल तर अशा प्रकारचा धोका होणार नाही.शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था; शेळके वस्तीवरील ग्रामस्थ अडचणीत – डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील बेलगाव गावातील शेळके वस्तीवरील रस्ता ग्रामस्थांनी स्वखर्चाने केलेला आहे. उन्हाळ्यात पवनचक्की प्रकल्प धारकांनी याच वस्ती रस्त्यावरून जड वाहनाने साहीत्याची वाहतूक केल्याने रस्ता खचला आहे.सध्या पावसाळ्यात याठिकाणी मोठ्ठ मोठे खड्डे पडल्यामुळे गुडघाभर पाणी साचत असुन चिखलातुन ये जा करताना गावात जाण्यासाठी शाळकरी मुले, भाजीपाला उत्पादक, महिला वृद्ध यांना दवाखाना, बाजारहाट तसेच शेतक-यांना खत बि – बियाणे वाहतूक करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. पवनचक्की अधिकारी फोन सुद्धा उचलत नाहीत.त्यामुळे आमच्या रस्त्याची तातडीने सोय करण्यात यावी.अशी मागणी किसन शेळके,आप्पासाहेब शेळके,भरत शेळके, दामोदर जोगदंड, बाबासाहेब जोगदंड, अतुल शेळके, श्रीराम शेळके, राजेंद्र शेळके,शरद शेळके मोहन शेळके यांनी केली आहे.

विद्युत पोल पडुन दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?? :- किसन शेळके

पवनचक्की धारकांनी त्यांच्या वाहनांच्या सोयीसाठी सुरक्षित ठिकाणी असणारा विद्युत पोल य वाहतुकीच्या मार्गावरील बांधावर उभा केला असुन पावसाळ्यात वाहत्या पाण्याने बांधाची माती वाहून गेली असुन वादळी वाऱ्यासह पावसाने पोल पडण्याची शक्यता असुन भविष्यात दुर्घटना घडुन पशु अथवा माणसाचा बळी गेल्यास जबाबदार कोण?? असा प्रश्न मोहन शेळके यांनी उपस्थित केला आहे.

पवनचक्की धारकांच्या मनमानी कारभाराला महसूल व पोलीस प्रशासनाचे पाठबळ:- डॉ.गणेश ढवळे

बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू असुन पवनचक्की प्रकल्प उभारताना स्थानिक दलाला मार्फत अडाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करून पवनचक्की प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करताना भुलथापा देत नियमांची पायमल्ली करून प्रकल्प उभारण्यात येत असल्याच्या लेखी तक्रारींचे प्रमाण वाढले असुन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सुद्धा महसूल व पोलीस प्रशासन अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने ऊभे राहण्याऐवजी कंपनीची पाठराखण करत कंपनीचीच बाजु घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पुढारी आणि महसूल अधिकारी यांच्या संगनमताने पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.

महावितरण मधील ऑपरेटर्स देणार आझाद मैदानावर येथे १० ऑक्टोबर पासून धरणे ; ऑपरेटर्स संघटना करणार नेतृत्व

औरंगाबाद दि.3: महावितरण मधील ऑपरेटर कर्मचारी उच्च वेतन वाढीच्या मागणीसह उपकेंद्रांच्या इतर मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे १० ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन करणार आहेत. हा प्रश्न १६ वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर महावितरण प्रशासन सातत्याने वेळ काढू पणा करीत आहे. अनेक सरकारे बदलली, परंतु प्रश्न सुटले नाहीत. प्रश्नांची दखल घेत नसल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेने लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातील महावितरण ऑपरेटर्स कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे १० ऑक्टोबरला प्रचंड धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस नवनाथ पवार यांनी कळविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे तीन कंपन्यांमध्ये विभाजन झाले. एक सूत्रधार कंपनी म्हणून या तिन्ही कंपन्यावर नियंत्रक म्हणून काम करते. मंडळ विभाजनापूर्वी ३३ के. व्ही. उपकेंद्रात काम करणारे ऑपरेटर्स बढतीने अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रात जात होते. परंतु मंडळ विभाजनानंतर अतिउच्च दाबाची सर्व उपकेंद्रे महापारेषण कंपनीत समाविष्ट करण्यात आल्यामुळे ३३ के. व्हि. उपकेंद्रांच्या ऑपरेटरचे पदोन्नती चॅनल नष्ट झाले. मंडळ विभाजन करताना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात कोणत्याही पदाचे वेतन, भत्ते, पदोन्नतीवर विभाजनाने कोणताही परिणाम होणार नाही, असे नमूद केलेले असूनसुद्धा ऑपरेटर कॅडर वर आर्थिक अन्याय होत आहे. उशिराने व कमी वेतनाच्या पदावर सध्या ऑपरेटरांना पदोन्नती देण्यात येते.
याशिवाय नोकरीस लागताना समान मूळ वेतनाच्या पदावरील कर्मचाऱ्यांपैकी तांत्रिक कर्मचाऱ्यांना पहिल्या जि. ओ. नंतर कमी वेतन दिले जावे, अशी मानवनिर्मित वेतन तफावत करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता ज्या कामात जास्त धोका असतो, ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन व इतर भत्ते जास्त असतात. परंतु महावितरण मध्ये नेमके याच्या उलट आहे. धोकादायक काम करणाऱ्या ऑपरेटर व तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन कमी आहे. तर खुर्चीवर बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत जास्त पगार मिळतो. असा दुजाभाव कंपनीकडून करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुधाकर जायभाये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या सर्व कारणांमुळे तांत्रिक कामगरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेने गेली पाच वर्षे वीज प्रशासनासह, ऊर्जामंत्री व मुख्यमंत्री कार्यालयात सातत्याने पत्र व्यवहार करून न्याय देण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या धरणे आंदोलनात संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी, केंद्रीय कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्रभरातील ऑपरेटर्स, तांत्रिक कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर जायभाये, उपाध्यक्ष विश्वास साळुंके, कार्याध्यक्ष सुधीर इंगळे, उपसरचिटणीस खेमराज तिवाडे, उपसरचिटणीस राजेश बडनखे, कोषाध्यक्ष राजेश्वर क्षीरसागर, महेश अहिरे, रामनाथ नागरगोजे, सादिक शेख, नितीन सोनकुसरे, माधव गोरकवाड, लक्ष्मण वाघ, महादू कड, प्रफुल्ल शेरकी, यशवंत गंबरे, सुनील बोयनर, राजेंद्र कुंभार, अशोक भुसेवार, हरिदास नागरे, कु. शितल शिवपुजे, किरण पोवार, आनंद कोटकर या केंद्रीय कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. अशी माहिती जेष्ठ कामगार नेते अनिल पुरी यांनी दिली आहे.

==================
तत्कालीन वीज मंडळात एकाच दिवशी नोकरीस लागलेले, एकाच वयाचे, एकाच कॅटेगरीच्या दोन ऑपरेटर पैकी जो आजच्या महापारेषण कंपनीत जाऊ शकला, त्याचे वेतन तब्बल १८ ते २२ हजार रुपयांनी जास्त आहे. हा फरक वर्षा गणित वाढत जात आहे. त्यामुळे महावितरण मधील ऑपरेटर वर्गाचे प्रचंड आर्थिक शोषण होत आहे. हक्काची उच्च वेतनाची पदे नष्ट केल्यामुळे व पदोन्नतीची पदे निर्माण न केल्यामुळे हे आर्थिक नुकसान होत आहे.
=================
कंपनीचे खाजगी करणं धार्जिणे धोरण
१ एप्रिल २०१९ नंतर कार्यान्वित करण्यात आलेल्या सर्व नवीन उपकेंद्रात केवळ कंत्राटी ऑपरेटर भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे कायम ऑपरेटरच्या पदोन्नतीच्या जागा कमी झाल्या असून आतापर्यंत २१० उपकेंद्रे खाजगी कंत्राट दाराकडून चालविण्यात येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली उपकेंद्रे खाजगी कंत्राटदारांना चालवायला दिल्याने औद्योगिक सुरक्षा धोक्यात आली आहे. कंपनीच्या खाजगीकरण धोरणांमुळे कर्मचारी वर्ग प्रचंड नाराज आहे.

सोयगाव तालुक्यात पहिली कापूस वेचणी ,नवरात्र उत्सवात शेतकऱ्यांना लक्ष्मीदर्शन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात मे अखेरीस आणि पाच जूनपर्यंत लागवड केलेल्या कापूस पिकांची पहिली वेचणी सुरू झालेली असून पहिल्याच वेचणीत शेतकऱ्यांना लक्ष्मीदर्शन होत आहे,परंतु कापसाच्या भावाबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याने होत असलेले लक्ष्मीदर्शन डोळ्यांचे पारणे फेडण्याइतपत असल्याचे चित्र आहे..
सोयगाव तालुक्यात यंदाच्या खरिपाच्या हंगामात ३४ हजार ७०८ हेक्टर वर कपाशी ची लागवड करण्यात आलेली आहे, परंतु सप्टेंबर महिन्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीच्या व सततच्या पावसाच्या नुकसानीत ऐन कापूस बहाराच्या कालावधीत कपाशी पिकांचे ६० टक्के नुकसान झालेले आहे,यासाठी महसूल आणि कृषी विभागांनी पंचनामे मोहीम हाती घेतली आहे,परंतु पंचनाम्या नंतरही सोयगाव तालुक्यात नुकसान भरपाई मिळणार नसल्याची शक्यता आहे… झालेला अतिवृष्टीचा पाऊस हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसचा झाला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांच्या पहिल्याच वेचणीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे त्यामुळे पहिल्या वेचणीत भरगच्च असलेला कापूस घरात आणण्याची शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे..

वेचणी साठी येतोय मोठा खर्च-

कपाशी पिकांच्या संगोपनासाठी झालेला खर्च आणि त्यानंतर पुन्हा वेचणी साठी प्रति किलो आठ रु याप्रमाणे भाव द्यावा लागत असून,मजूरांना खुशामत करावी लागत आहे.. दरम्यान पहिल्याच वेचणीचा कापूस घरात आणतांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येत असून मात्र विक्री साठी चा हमीभाव अद्यापही जाहीर झालेला नसल्याने खासगी व्यापारी पहिल्याच वेचणीचा कापूस मनमानी भाव देऊन खरेदी करत आहे…

यंदाच्या वर्षात शिमग्याच्या आधीच कपाशीचे सीमोल्लंघन

सोयगाव तालुक्यात यंदा शिमग्याच्या आधीच कपाशी पिकांची उत्पन्न येत असल्याने कपाशी पिकांनी शिमग्याची आधीच गावात सीमोल्लंघन केले आहे.. मात्र हमी भाव नसल्यानें शेतकऱ्यांचे लक्ष्मी दर्शन अपूर्ण राहण्याची शक्यता आहे
चौकट–सोयगाव तालुक्यात कपाशी उत्पन्नात मराठवाड्यात अग्रेसर आहे परंतु सोयगाव तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून कपाशीचे शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यात कापसाच्या विक्रीसाठी जावे लागते, त्यातही भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात जळगाव जिल्ह्यात कापूस विक्री करावा लागतो….
गाडीभर कपाशीच्या पहिलेच उत्पन्न आलेला शेतकरी समाधान गव्हांडे यांचे शी संपर्क साधला असता,पहिल्याच वेचणीत गाडीभर उत्पन्न मिळाले परंतु शासकीय खरेदी केंद्रा अभावी हा कापूस व्यापाऱ्याला द्यावा लागनार असल्याची प्रतिक्रिया समाधान गव्हांडे यांनी दिली आहे…

लक्ष्मी दर्शन पण भाव नाही

सोयगाव तालुक्यात कपाशीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना लक्ष्मीदर्शन झाले आहे परंतु शासनाने अद्यापही हमीभाव जाहीर केलेल्या नसल्याने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची कोंडी होत आहे….

पाचोरा येथे सेवा पंधरवाडा पंतप्रधानांच्या जन्मदिवशी रक्तदान पिशव्यांचे संकलन

पाचोरा दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा जन्म दिवस ते राष्ट्रपिता म.गांधी यांची जयंती म्हणजे १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर हा कालावधी संपुर्ण देशात सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. पंधरवाड्याची सुरूवात आज पाचोरा येथील भाजपा कार्यालयात रक्तदान शिबीराने आयोजित करण्यात आली.

यानंतर 25 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने वृक्षारोपण तर त्यानंतर २ आक्टोंबर पर्यंत स्वच्छता अभियानाने पंधरवड्याची सांगता करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिवशी ७५ रक्त पिशव्या संकलन करण्यात आले.प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे सेवा पंधरवाडा तालुका संयोजक सुनिल पाटिल युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील शहराध्यक्ष समाधान मुळे यासह एकूण 75 दात्यांनी रक्तदान केले .शिबिराला खा.उन्मेष पाटिल जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा पाटिल विधास सभा क्षेत्र प्रमुख हिमंत निकुंभ बाजार समिती सतिश शिंदे ता सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटिल रमेश वाणी परेश पाटिल युवा मोर्चा ता अध्यक्ष मुकेश पाटिल समाधान मुळे गणेश पाटिल सैनिक आघाडीचे भरत पाटिल दिपक माने व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन अनिल चांदवाणी अॅड राजा वासवाणी राकेश कोळी बाळू धुमाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रप्रेमी रक्तदाते उपस्थीत होते.
रेडप्लस ब्लड बॅंकचे डॉ.भरत गायकवाड डाॅ.कैलास कैलास पेखले सीमा सावळे अंतिम मालाकार पायल कुंभारे प्रतिक्षा तूल प्राजक्ता टेंभरे यांनी संकलन केले.

लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक; शांततेची परंपरा कायम राखत प्रशासनाला सहकार्य करा – स.पो.नि. शेख मुस्तफा यांचे आवाहन

लिंबागणेश(डॉ गणेश ढवळे):कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पुर्वपदावर आल्यामुळे यावर्षी मोठ्याप्रमाणात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे सुतोवाच असुन गणेशोत्सवात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करावेत मात्र याचवेळी लिंबागणेशकरांनी शांततेची परंपरा कायम राखावी कुठलेही गालबोट लागु देऊ नये उत्सव शांततेत साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो. नि.शेख मुस्तफा यांनी आज दि.२५ ऑगस्ट गुरूवार रोजी लिंबागणेश येथील हनुमान मंदिरात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.शेख मुस्तफा यांनी लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी……उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेख मुस्तफा बोलत होते,गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलीस अधिक्षक बीड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध सुचना करताना जबरदस्तीने कोणाकडुनही वर्गणी मागु नये,सर्व नियम कायद्यांची माहिती देऊन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट दिसुन आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे संपर्क साधावा,महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, ईतर स्वच्छतेबाबत काळजी घेतानाच ध्वनी प्रदुषणाबाबतही काळजी घ्यावी तसेच मंडळाचे ठिकाणी दाखविण्यात येणारे देखावे आक्षेपार्ह अगर सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गणेशमंडपामुळे रहदारीस अडथळा होणार नाही,गणेश मंडळाचे ठिकाणी स्वयंसेवक नेमुन मंडळांच्या पदाधिका-यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे. आदि सुचना करण्यात आल्या याचवेळी पदाधिका-यांनी मांडलेल्या समस्या संदर्भात माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना बाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बैठकीत नेकनुर पोलीस स्टेशनचे सफौ. निकाळजे,पो.हे.राऊत,पोलीस नाईक मुंढे,पोलीस अंमलदार ढाकणे,ग्रामसेवक राठोड,उपसरपंच शंकर वाणी,माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे ,सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, विक्की आप्पा वाणी,गणपति मंदिर विश्वस्त,चिंतामण जोशी, पुजारी श्रीकांत जोशी,जीवन मुळे,श्रीकृष्ण कानिटकर,गणेश थोरात,बाळकृष्ण थोरात ,बाळासाहेब जाधव,दादासाहेब गायकवाड,संतोष भोसले,विठ्ठल कदम,मोहन कोटुळे,विनायक मोरे,संतोष वाणी,सुरज कदम,औदुंबर नाईकवाडे,सौरभ कानिटकर,चेतन कानिटकर,गणपत दाभाडे,कचरू थोरात आदि उपस्थित होते.

राज्यासह देशातील विविध नोकरी विषयक जाहिराती – पोलीस भरती ,स्टाफ सलेक्शन सह इतर – पहा आजच्या नोकरी विशेष वर – २५ ऑगस्ट २०२२

[3d-flip-book mode=”fullscreen” id=”28945″ ][/3d-flip-book]

मांजरसुंभा-पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ डी वर मोटारसायकल स्वार अपघातात जागीच ठार

पाटोदा(प्रतिनिधी): आज दिनांक १४ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता मांजरसुंभा ते पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ -डी वर सासवड फाट्यावर मोटारसायकल स्वार मुकींद पवार रा. हिंगणी हवेली तालुक्यातील.गेवराई जि.बीड हे पाटोदा येथुन होंडा मोटारसायकल (क्रमांक एमएच.एच.-४२ ए.डी.९६६५) गावी जात असताना सासवड फाट्यावर कंटेनर (क्रमांक एम.एच.४६ बीड.बी.४६८)ड्रायव्हर सुनिल लक्ष्मण नाकाडे रा.जाटदेवळा ता.पाथर्डी जि.अहमदनगर मांजरसुंभाकडुन पाटोद्याकडे जात असताना अपघात होऊन अपघातात मुकींद पवार जागीच ठार झाले. नेकनुर पोलीस व मांजरसुंभा महामार्ग पोलीस प्रशासन यांनी स्थळ पंचनामा केला.