दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगचे काम तात्काळ थांबवावे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी

मुंबई / नागपूर, दिनांक १ जुलै २०२४
नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, महापरिनिर्वाण दिनी आणि बुद्ध पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने जगभरातून लोक दीक्षाभूमीवर येतात. या परिसरात 10 लाखांच्यावर लोक येत असतात. याठिकाणी कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना स्मारक समितीने येथे अंडरग्राऊंड पार्किंगचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. राज्य सरकार आणि समितीने लोकांच्या भावनेशी खेळू नये. अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी लोक भावनेचा आदर करुन येथील अंडरग्राउंड पार्किंगचे काम तात्काळ थांबविण्याकरिता विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. 

दिक्षाभूमी येथील बांधकामाचे आणि घडलेल्या घटनेकडे सरकारचं लक्ष वेधत डॉ. राऊत पुढे म्हणालेत, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याकडून सूचना घ्यायला हव्या होत्या. त्यानंतर बांधकाम सुरु करायला पाहिजे अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी स्मारक समिती आणि सरकारचे कान टोचले.


पावणेचार एकरची जागा दीक्षाभूमीला द्या

दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंग झाल्यास दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे याठिकाणी पार्किंग करू नका. पार्किंगच हवी असले तर या परिसरात पुढे पावणेचार एकरची जागा आहे. ती जागा दीक्षाभूमीला देण्याची मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे. या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जावू शकते.


डॉ. राऊत यांनी आक्रमक पणे विषय मांडल्याने पार्किंगच्या कामाला राज्य सरकारची स्थगिती

राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड पार्किंगच्या मुद्दा लावून धरला होता. दरम्यान, याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तात्काळ येऊन दिक्षाभूमी येथील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा केली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.