बीड (प्रतिनिधी) दि.४ :-राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ५६ कोटी ३६ लक्ष रुपयाच्या १८ रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर तालुक्यातील मातोरी येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमास आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संतेाष हंगे, रमेश पोकळे, पंचायत समिती सभापती सुवर्णा चौधर, पं. स. सदस्य प्रकाश खेडकर, सरपंच अभिमान जरांगे, वैजनाथ मिसाळ, आप्पा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, शिरूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ५६ कोटी ३६ लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या १८ रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामामुळे या भागातील रस्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याने यापुढील काळात या भागातील गावांना पक्का रस्ता मिळणार आहे. ज्या गावांची रस्त्याची मागणी आहे त्या गावांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता मंजूर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
शासन नागरिकांसाठी विविध योजना राबवित असून या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळण्यासाठी अधिकारी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रस्ते, नाल्या, अंगणवाड्या, दवाखाने यासारखी विविध कामे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून करण्यात येत असून तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पुर्ण झाल्यास बऱ्याच गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास आश्रुबा खरमाटे, बाबुराव केदार, रामराव बडे, शिवाजी पवार, किसन खरमाटे, मयुरी खेडकर, सविता बडे, रेखा जरांगे, देविदास गरकळ यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी तसेच मातोरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.