अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी कोरोनामुक्त होऊन २८ दिवस पूर्ण झाल्यानंतर ना. मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय प्लाझ्मा दान करत आपल्या नेतृत्वास आदर्श शुभेच्छा दिल्या आहेत.अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात ना. मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून नुकतीच प्लाझ्मा थेरपी लॅब यशस्वीरीत्या सुरू झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा संकलित करून तो कोरोना बाधित असलेल्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. प्रशांत जोशी यांच्या रूपाने प्लाझ्मा थेरपी साठी प्लाझ्मा दान करणारे पहिले दाते स्वारातीला मिळाले आहेत.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली प्लाझ्मा थेरपी अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध झाल्यानंतर आज त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी स्वेच्छेने प्लाझ्मा दान केल्याने दोन गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत मिळेल असे स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख म्हणाले.यावेळी डॉ. देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. शिवाजी बिराटे, डॉ. चव्हाण, रक्तपेढीचे प्रभारी डॉ. विनय नाळपे, डॉ. आरती बर्गे, डॉ. नारायण पौळ, डॉ. सुजित तुमोड, जगदीश रामदासी, सय्यद मुश्ताक, किरण चव्हाण, परमेश्वर मोरे आदी उपस्थित होते.स्वेच्छेने प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्या कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची २८ दिवसानंतर तपासणी करून प्लाझ्मा घेतला जातो, पुढील एक वर्षापर्यंत त्याद्वारे गंभीर कोरोना ग्रस्त रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी द्वारे उपचार करता येतो.
मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान केल्याचा आनंद – प्रशांत जोशी
कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर माझ्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज प्लाझ्मा दान करताना मला आनंद होतो आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या रक्तदान आणि प्लाझ्मा दान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी प्लाझ्मा दान केला असून, आणखी कोरोनामुक्त झालेल्या बांधवांनीही पुढे येऊन प्लाझ्मा दान करत कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ द्यावे असे प्रशांत जोशी यांनी म्हटले आहे.
अधिकाधिक दात्यांनी पुढे यावे – डॉ. सुधीर देशमुख
प्लाझ्मा दान करण्याचे दायित्व पालकमंत्री ना. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक श्री. जोशी यांनी दाखवले, त्याबद्दल त्यांचे आभार. हा बीड जिल्ह्यातील पहिलाच प्लाझ्मा असून, कोरोनामुक्त झालेल्या अधिकाधिक सदृढ लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा, प्लाझ्मा थेरपी द्वारे कोरोना ग्रस्त रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे; असे डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे.