बिबट्याची चारही पिले गोरेवाडा प्रकल्पाकडे हस्तांतरित
अकोला,दि.१६(जिमाका)- येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मौजे पास्टूल येथे १५ दिवसांपूर्वी सापडलेले बिबट्याचे चार बछडे आज गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आले, अशी माहिती उपवनसंरक्षक वि.ग. माने यांनी दिली. इतके दिवस वाट पाहूनही त्यांची आई अर्थात मादी बिबट आलीच नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल १५ दिवस या चारही पिलांना ममतेने सांभाळलं. बकरीचे दूध पाजून त्यांचे संगोपन केले.
३० जून रोजी मौजे पास्टूल जवळ मोर्णा नदीच्या पात्रात बिबट्याची तीन पिले सापडली. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१ जुलै रोजी आणखी एक पिलू सापडलं. तिथल्या नागरिकांनी वनविभागाच्या पातूर वनपरिक्षेत्रातील खानापूर नियतक्षेत्राच्या भाग २ मधील अधिकाऱ्यांना पाचारण केलं. त्यावेळी ही पिले १५ दिवस ते तीन आठवडे इतक्या वयाची असावीत. त्यांची आई जवळपासच असावी, आणि ती परतेल अशा अपेक्षेने त्यांच्या आईची वाट पाहण्यात आली. पण ती आली नाही. मग त्यांना जंगलातच पण थोडं सुरक्षित स्थळी आणून ठेवण्यात आलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात ही पिले होती. पिलं खूप लहान असल्याने अन्य श्वापदांकडून धोका होताच, त्यांना जगवायचंही होतं आणि शिवाय त्यांची आई आलीच तर या पिलांना सुखरुप तिच्या हवालीही करायचं होतं.
प्रश्न होता या बछड्यांच्या संगोपनाचा. मग वन्यजीव विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली या चौघांची देखभाल सुरु झाली. त्यांना बकरीचे दूध देण्यात येत होतं. दिवसातून तीन वेळा. ६० टक्के दूध आणि ४० टक्के पाणी या प्रमाणात. दूध आधी उकळून घेऊन नंतर गार करुन पाजले जात होते. प्लास्टीकच्या बास्केटचा वापर त्यांच्या हाताळणीसाठी केला जातो. या चौघात दोन नर आणि दोघी मादी आहे.
बिबट्याची मादी ही नक्कीच तिच्या पिलांचा शोध घेत असावी, मात्र या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे तिला अडचण येत असावी, असे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले. ह्या परिसरात अन्य बिबट्यांचाही वावर आहे त्यामुळे या पिलांना अन्य श्वापदांपासून जीवाला धोका असल्याने त्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला,असेही उपवनसंरक्षक माने यांनी स्पष्ट केले.